Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

नवनीत

जी व न द र्श न
दान-दया-धर्माचे मूळ

अपरिग्रह (संग्रह न करण्याची वृत्ती) जनसेवा, प्राणिमात्रांच्या कल्याणाची, हिताची भावना दान-दया करायला प्रवृत्त करते. आचार्य कुंदकुंदांनी इ. सनापूर्वी सुमारे दोनशे वर्षे अनेक ग्रंथ लिहिले. त्यात ‘मूलाचार’ हा मौलिक ग्रंथ लिहिला. त्यात धर्माची, आचरणाची अगदी प्राथमिक मूल्ये सांगितली. त्यात ते म्हणतात-
दइदूण सव्वजीवे दमिदूण य इंदियाणि तह पंच।
अठ्ठविह कम्मरहिया णिव्वाणमणुत्तरं जाय।।
सर्व जिवांवर दयाभाव आणि पंचेंद्रियांचं दमण (नियंत्रण) केल्याने आठ कर्माचा नाश होतो व तुम्ही मोक्षाला जाता.
दान मुख्यत्वे चार प्रकारचे आहे. आहारदान, औषधदान, शास्त्रदान व अभयदान. मात्र कुठलंही दान देताना प्रदर्शनाची भावना असू नये. कुणी दहा हजार दिले तर मी पन्नास हजार देईन, त्याला खाली बघायला लावीन. त्याच्यापेक्षा आपण वरचढ आहोत ही वृत्ती असू नये. दान देताना किंवा दान दिल्यानंतर पश्चात्ताप, हळहळ करू नये. ते आनंदाने, शांत वृत्तीने, निरपेक्ष मनाने द्यावे. दान देताना मी फार काही मोठे काम करतोय हा अहंकार तर मुळीच असू नये. शीतलसागर महाराजांनी एक कथा सांगितली-
एका श्रीमंत सावकाराला त्याची आई म्हणाली, ‘बाळ, करोडो रुपयांचा तू व्यापार, उलाढाल करतोस; पण मी एक लाख रुपयांचा केवढा ढीग होतो हे पाहिलं नाही. एक लाख रुपये रचले तर केवढी लांब-रुंद बैठक होते हे बघून मला त्यावर बसायचं आहे.’ वृद्ध मातेची आज्ञा तत्काळ प्रत्यक्षात आली. माताजी त्यावर बसल्या. सावकाराला वाटलं, हे दृश्य लोकांनी बघावं आणि तो पैसा एखाद्या गरीब विद्वानाला, पंडिताला द्यावा. त्याप्रमाणे जाहिरात झाली. लोक, नातेवाईक जमले. विद्वान पंडिताला निमंत्रण गेले. ‘पंडितजी, माझी आई बसलेला हा पैशांचा ढीग मी तुम्हाला देऊ करतोय. असं दातृत्व, असा दानशूर कधी पाहिलात का?’ गर्वाने सावकार म्हणाला. पंडितजी दान घ्यायला आले होते; पण स्वाभिमानी होते. त्यांनी खिशातून एक रुपया काढून त्या ढिगावर टाकला, म्हणाले, ‘एक लाख एक रुपये मी तुम्हाला देतो आहे. दानी तर मी खूप पाहिलेत, पण असा त्यागी तुम्ही पाहिलात का?’ म्हणत पंडितजी निघून गेले.
लीला शहा

कु तू ह ल
ताम्रसृती व नीलसृती
ताम्रसृती आणि नीलसृती म्हणजे काय?
कल्पना करा की, पोलीस चाच्यांच्या एका गाडीचा प्रत्येक सेकंदाला एक गोळी झाडत पाठलाग करीत आहेत. आता चाच्यांची गाडी पोलिसांच्या गाडीच्या तुलनेत अधिक वेगाने जात असली तर चाच्यांपर्यंत पोहोचणाऱ्या दोन गोळय़ांमधील कालावधी वाढलेला असेल. याउलट जर चाच्यांच्या गाडीची गती पोलिसांच्या गाडीपेक्षा कमी असेल तर हा कालावधी कमी झालेला असेल. प्रकाशकिरणांच्या बाबतीतही काहीसा असाच प्रकार घडतो. समजा एखादा तारा आपल्यापेक्षा दूर चालला असेल तर आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या त्याच्या प्रकाशकिरणांतील लहरींची तरंगलांबी वाढेल. सूर्यप्रकाशाच्या वर्णपटात लाल रंगाचा प्रकाश हा वाढती किंवा जास्त तरंगलांबी दर्शवत असल्याने, तरंगलांबीतील या प्रकारच्या बदलाला ताम्रसृती म्हटलं जातं. आता तारा हा जर आपल्यापेक्षा जवळ येत असेल तर त्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरींची तरंगलांबी आपल्याकडे पोहोचेपर्यंत कमी झालेली असते. निळा प्रकाश हा घटती किंवा कमी तरंगलांबी दर्शवित असल्यामुळे या बदलाला नीलसृती म्हटलं जातं. गतीमुळे प्रकाशकिरणांवर होणाऱ्या या परिणामाला डॉपलरचा परिणाम म्हणतात. तरंगलांबीतील या बदलाचं प्रमाण हे ताऱ्याच्या आपल्यासापेक्ष असणाऱ्या गतीनुसार कमी-जास्त होतं.
गतीप्रमाणेच गुरुत्वाकर्षण हेसुद्धा अशाच प्रकारचे तरंगलांबीतील बदल घडवून आणते. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या प्रकाशकिरणांना या गुरुत्वाकर्षणावर मात करण्यासाठी स्वत:कडची ऊर्जा वापरावी लागते. परिणामी त्यांच्या तरंगलांबीत वाढ होऊन ताम्रसृती घडून येते. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रकाशकिरणांच्या बाबतीत, प्रकाशकिरणांच्या मार्गक्रमणाला गुरुत्वाकर्षणाची मदत होत असल्याने, त्यांच्या तरंगलांबीत घट होऊन नीलसृती घडून येते. तरंगलांबीतला हा बदल गुरुत्वाकर्षणाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. गती किंवा गुरुत्वाकर्षणावर आधारलेली तरंगलांबीतील ही वाढ वा घट डोळय़ांना दिसू न शकणाऱ्या प्रकाशकिरणांच्या बाबतीतही घडून येते.
अरिवद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
व्ही. पी. सिंग
१९८० च्या दशकाच्या शेवटी भारतीय राजकारणात विश्वनाथ प्रताप सिंग नावाचा तारा उल्केच्या तेजासारखा तळपला आणि लुप्तही झाला. २५ जून १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला. मांडाच्या राजाने त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी दत्तक घेतल्याने राजघराण्याचे ते वारसदार बनले. कवी आणि चित्रकार असणाऱ्या व्ही. पी. सिंग यांनी वकिलीची, तसेच पुणे विद्यापीठातून बी.एससी. पदवी संपादन केली होती. विनोबांच्या भूदान चळवळीत आपली सारी जमीन दान करून नेहरू, शास्त्रीजींच्या आदरास ते प्राप्त ठरले. आमदार ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असा राजकीय कारकीर्दीचा त्यांचा पहिला टप्पा. संरक्षणमंत्रिपदी असताना बोफोर्स तोफा खरेदी प्रकरणावरून त्यांचे राजीव गांधींशी बिनसले. तेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडून चंद्रशेखर, देवेगौडा यांच्याबरोबर आघाडी करून ‘जनता दल’ या नव्या पक्षाची स्थापना केली. येथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा तिसरा टप्पा सुरू झाला. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असणाऱ्या सिंग यांच्या झंझावातापुढे काँग्रेस निष्प्रभ ठरली आणि ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. या काळात त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय म्हणजे ओ.बी.सीं.च्या राखीव जागांसाठी मागणी करणारा मंडल आयोग त्यांनी जारी केला. त्यातच गृहमंत्री सईद यांच्या मुलीचे अपहरण केल्यावर अतिरेक्यांची त्यांनी केलेली सुटका हा टीकेचा विषय झाला. त्यातच आणखी एक भर पडली ती म्हणजे अडवाणी यांची रामरथ यात्रा लालू प्रसाद यादवांनी रोखल्यावर भाजपने त्यांना दिलेला पािठबा काढला, तसेच पक्षातील चंद्रशेखर, देवेगौडा हे विरोधक तर होतेच. तेव्हा पंतप्रधानपदाचा राजीनामा देणे त्यांना भाग पडले आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपली. कर्करोगाने ग्रासलेल्या व्ही. पी. सिंग यांनी आत्मचरित्र लिहिले. २७ नोव्हेंबर २००८ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
पापकाचा शोध
तक्षशिला हे प्राचीन भारतातले आदर्श विद्यापीठ होते. विद्यापीठात पापक नावाचा हुशार विद्यार्थी होता. इतर विद्यार्थी आणि अध्यापक त्याला ‘पापक’ म्हणून हाक मारायचे, तेव्हा आपल्या अशुभ नावाची त्याला फार लाज वाटायची. चांगले नाव असेल तर विद्यार्थ्यांत व शिक्षकात आपल्या हुशारीबद्दल कौतुक होईल, असे त्याला नेहमी वाटे. एके दिवशी आपल्या आचार्याना तो म्हणाला, ‘गुरुदेव, माझ्या अशुभ नावामुळे मला शरम वाटते. मी पाप करीत नाही हे आपण जाणता. मग हे नावाने विडंबन का? आपण माझे नाव बदलून दुसरे चांगले नाव द्या.’ आपल्या प्रिय शिष्याचे बोलणे ऐकून गुरू म्हणाले, ‘बाळा, मी दुसरे नाव सुचवेन, पण त्यापूर्वी तू जवळपासच्या गावांत जाऊन तुझ्यासाठी एखादे शुभ नाव शोधून आण.’ ‘गुरुवर्य, आपली आज्ञा शिरसावंद्य’, गुरुचरणांना स्पर्श करून त्याने निरोप घेतला. फिरत फिरत तो जवळच्या गावात पोहोचला. लोक मृतदेह घेऊन स्मशानभूमीकडे जात होते. त्याने विचारले, ‘कोण मृत्यू पावले?’ ‘आमच्या गावातला अमरसेन’. पापक म्हणाला, ‘अमरसेन असून मृत्यू पावला. अशा व्यर्थ नावाचा काय उपयोग?’ तो पुढे निघाला. डोक्यावरून लाकडे वाहून नेणारी एक गरीब स्त्री त्याला दिसली. ‘माते, तुझे नाव काय?’ त्याने विचारले. तिने नाव सांगितले, ‘लक्ष्मी’. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. नाव लक्ष्मी आणि तुला झगडावे लागते आहे गरिबीशी! असे का? ती स्त्री म्हणाली, ‘मुला, हाक मारण्यापलीकडे नावाचा काय उपयोग?’ पापक दुसऱ्या गावात गेला. तिथे चोराला राजाचे सैनिक पकडून नेत होते. त्याचे नाव धर्मराज असल्याचे समजले. कंजूष शेटजीला गावकरी दूषणे देत होते. त्याचे नाव उदारधी होते. विद्याधर नावाचा एक अशिक्षित त्याला भेटला. बरीच गावे फिरून त्याच्या लक्षात आले, नावात काही तथ्य नसते. तो गुरूंकडे परत आला. त्यांनी विचारले, ‘एखादे चांगले नाव शोधून आणलेस ना?’ ‘गुरुजी, नावे अनेक सापडली; पण नावाने गौरव वाढतो असे मात्र कुठे दिसले नाही.’
माणसाला नावाने नव्हे, तर कर्तृत्वाने मोठेपणा प्राप्त होतो. जो कर्तृत्ववान आहे त्याचे नाव काही असले तरी जग त्याची वाखाणणी करणारच. ज्याच्या अंगी कर्तृत्व नाही, चारित्र्य नाही, त्याचे नाव काहीही असले तरी तो जगाच्या कुचेष्टेचा विषय बनणारच.
आजचा संकल्प- मी कर्तृत्वाने मोठे नाव मिळवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com