Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

विरार-पनवेल उपनगरी सेवा..हार्बरवर फास्ट लोकल
एमयूटीपी-३ अंतर्गत प्रस्तावित

प्रतिनिधी - हार्बर मार्गावर फास्ट लोकल.. बोरिवली-विरारदरम्यान पाचवा व सहावा मार्ग.. विरार-दिवा-पनवेल उपनगरी सेवा.. मध्य व पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल.. हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार.. हे सध्या अनेकांना अशक्यप्रश्नय वाटेल. मात्र पुढील दशकात यापैकी बहुतांश बाबी प्रत्यक्षात उतरलेल्या असतील. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. भविष्यात मुंबईतील रेल्वे वाहतुकीबाबतची गरज लक्षात घेऊन एमयूटीपी-३ अंतर्गत हे प्रकल्प राबविण्याची शिफारस राज्य शासनाने नुकतीच एका पत्राद्वारे रेल्वे बोर्डाला केली आहे.

रिलायन्सच्या ४५० स्वेच्छानिवृत्ती कर्मचाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता
पनवेल/प्रतिनिधी - रसायनी येथील रिलायन्स इंडस्ट्रीमधून नाईलाजाने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ४५० कर्मचाऱ्यांची कंपनी व्यवस्थापनाकडून फसवणूक झाली असून, कामगार आयुक्तांनीही याप्रकरणी असमर्थता दर्शविल्याने हे कामगार हवालदिल झाले आहेत. कंपनीकडून झालेल्या अन्यायाविरोधात कामगार आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर स्वेच्छानिवृत्त कामगारांच्या समस्या आपण सोडवू शकत नाही, असे उत्तर मिळाल्यानंतर कामगारांच्या आशा मावळल्या आहेत.

हुसेन यांच्या आक्रमक पवित्र्याने मुख्यमंत्री भांबावले !
नवी मुंबई/ प्रतिनिधी

स्थानिक पातळीवर काम आम्ही करायचे, मात्र झालेल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादीने घ्यायचे. राज्यात आपण एकत्र सत्तेत आहोत. परंतु ठाणे जिल्ह्य़ात सर्व सत्ताकेंद्र राष्ट्रवादीकडे. अशा परिस्थितीत जिल्ह्य़ात पक्षांतर्गत भांडणे आहेत, म्हणून तुम्ही आमच्याकडे किती दिवस दुर्लक्ष करणार. सगळी सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीकडे असताना कांॅग्रेस कार्यकर्ता आजही तग धरून आहे, याचे तुम्हाला काही वाटत नाही का...असे एकामागोमाग एक प्रश्न करत कांॅग्रेसचे मीरा-भाईंदरमधील नेते व आमदार मुझ्झफर हुसेन यांनी काल मुख्यमंत्र्यांना भांबावून सोडले. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वसामान्य कांॅग्रेस कार्यकर्त्यांची भावना हुसेन बोलून दाखवित असल्याने त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी मात्र डोक्यावर घेतले.

ट्रक उलटून क्लीनर ठार
पनवेल/प्रतिनिधी: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळील टेंभुर्डे ब्रीज येथे बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात एका ट्रकचा क्लीनर ठार झाला. अमोल सोळुंके (३०) असे त्याचे नाव आहे. लातूरहून मुंबईकडे निघालेला ट्रक टेंभुर्डे ब्रीजजवळ पहाटे पाचच्या सुमारास आला असता, चालक संजय सोळुंके यांचे नियंत्रण सुटले आणि ट्रक नाल्यात कोसळला. या अपघातात क्लीनर अमोल सोळुंके जागीच मरण पावला. ट्रकचा चेंदामेंदा होऊनही संजय सोळुंके आश्चर्यकारकरीत्या बचावला. त्याच्यावर खांदा कॉलनीतील अष्टविनायक रुग्णालयात उपचार होत आहेत.

पनवेल-शिर्डी थेट रेल्वे सेवा
पनवेल/प्रतिनिधी: पनवेल आणि आसपासच्या परिसरातील साईबाबांच्या लाखो भक्तांना पनवेलहून रेल्वेने थेट शिर्डीला जाणे शक्य झाले आहे. पनवेल-कर्जत मार्गावरून धावणाऱ्या मनमाड- नाशिक- पुणे या सेवेचा विस्तार करण्याची मागणी पनवेल प्रवासी संघाने केली होती. रेल्वे प्रशासनाने ही मागणी नुकतीच मान्य केल्याने लाखो भक्तांची सोय झाली आहे. ही गाडी आता शिर्डी- सोलापूर अशी धावणार आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या पनवेल स्थानकात येण्या-जाण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शिर्डी- कोल्हापूर, रत्नागिरी- पुणे, पुणे- नागपूर, वास्को- हावडा (नागपूर मार्गे) या गाडय़ा तसेच ठाणे- लोणावळा मार्गे जाणाऱ्या गाडय़ा पनवेल- कर्जत मार्गे सोडाव्यात, यासाठी रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याची माहिती प्रवासी संघाचे सचिव श्रीकांत बापट यांनी दिली.

सेनेच्या वर्धापनदिनी वह्या वाटप
उरण - शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गरीब-गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. नागावच्या मराठी शाळेत आयोजित वह्या वाटपप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, पश्चिम उपविभागप्रमुख एस. के. पुरो, उरण तालुका महिला आघाडीप्रमुख श्रद्धा सावंत, उद्योगपती जितेंद्र नाईक व पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

वाजेकर विद्यालयात पदवी अभ्यास केंद्र
उरण - येथील तु. ह. वाजेकर एस. एस. सी. महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पदवी अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. एफ.वाय.बी.ए., बी.कॉम. या वर्गांना मान्यता मिळाल्याने बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही वर्गातील नापास विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारीसाठी वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन फक्त रविवारीच केले जाणार असल्याने नोकरी करणाऱ्या किंवा अर्धवट शिक्षण सोडलेल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच इच्छुकांनी २० जुलैपर्यंत महाविद्यालयातील केंद्र संयोजक प्रश्न. एस. एन. कोळेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाशीत भरदिवसा एकास लुटले
वाशी - दिवसभरात जमा झालेली रक्कम मालकाकडे घरी घेऊन जाणाऱ्या कॅटर्सकडील ४० हजारांची रोकड चोरटय़ांनी लंपास केली. फिर्यादी जॉन अल्बर्ट डिसोझा हे दुकानात जमा झालेली रक्कम सायंकाळी सहा वाजता मालकाकडे घरी घेऊन जात होते. यावेळी सेक्टर ९ येथील रस्त्याने पायी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जॉनच्या हातातील ही रक्कम खेचून चोरून नेली. या प्रकरणी जॉनने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वैद्यकीय तपासणी शिबीर
बेलापूर - दि असोसिएशन फॉर सीनिअर सिटिझन, सीबीडी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शनिवार, २७ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साडेदहा वाजता असोसिएशनच्या सीबीडी सेक्टरमधील कार्यालयात वैद्यकीय तपासणीसह दंतचिकित्सा शिबीरही होणार आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन अध्यक्ष पी. एम. मग्गू यांनी केले आहे.

पारितोषिक वितरण समारंभ
बेलापूर - वाशीतील इंडियन वुमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या वतीने पर्यावरण नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाचा बक्षीस समारंभ शनिवार, २७ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता असोसिएशनच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास टाटा सायन्स लिमिटेडचे संचालक डॉ. जे. जे. इराणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.