Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

नाशिकसह धुळे, नंदुरबारमधील अकरावीच्या प्रवेशक्षमतेत वाढ
गुणानुक्रमानुसार प्रवेशास प्राधान्य

प्रतिनिधी / नाशिक

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांचीही प्रवेशासाठी धावपळ सुरू होणार असली तरी उत्तर महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये, याकरिता शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील एकूण प्रवेश क्षमता गतवर्षीच्या तुलनेत साडे सहा हजाराने वाढवून एक लाख २४ हजार ६८० पर्यंत विस्तारण्यात आली आहे.

भूखंड वाटपाचे धोरण शंकास्पद
प्रतिनिधी / नाशिक

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योगासाठी भूखंड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असले तरी या भागातील वेगवेगळ्या कारणांनी रिक्त पडलेले भूखंड पाहिल्यावर औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड वाटप धोरणाबाबत कुणाच्याही मनात शंका उपस्थित होणे साहजिक आहे. अनेक भूखंडांवर अतिक्रमणांचा विळखा पडल्याने ५० ते १०० एकर जागा अडकून पडली असताना दुसरीकडे काही उद्योजकांनी या क्षेत्रात अलिशान घरकुले उभारून नियमांना पूर्णत: हरताळ फासला आहे. औद्योगिक विकास महामंडळाचा कारभार वरकरणी पारदर्शक असल्याचे भासविले जाते.

मिश्रासाहेब, एवढे कराच!
स. न. वि. वि.
आपण नाशिककरांच्या विश्वासास पात्र ठरल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! बदली रद्द झाल्यावर वृत्तपत्रातून आपली प्रतिक्रिया वाचली. जनतेच्या समर्थनामुळे आपली जबाबदारी वाढल्याची जाणीव आपणास आहे, हे वाचून एकूणच सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवण्यास थोडी जागा प्रत्यक्षात सापडली. यानिमित्ताने खूप वर्षांची व्यथा आपणासमोर मांडत आहे. गेली सुमारे २५ वर्षे नाशिकला येणारे यात्रेकरू, पर्यटक आणि सामान्य नागरिक व रहिवासी यांची लूट खुलेआम रात्रंदिवस रिक्षा भाडय़ाच्या स्वरुपात होत आहे.

पर्यावरणातील सापांचे महत्त्व
भारतात अंदमान, निकोबार बेटांसह सापांच्या सुमारे ५०० ज्ञात प्रजाती असून त्यात नव्याने भर पडणे सुरूच आहे. सापांमध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी हे तीन प्रकार आढळतात. देशात नाग (कोब्रा), किंग कोब्रा, फुरसे, मण्यार आणि घोणस हे पाच मुख्य विषारी साप आढळतात. समुद्री सापही विषारी असतात. विषाची मात्रा कमी असणाऱ्या सापांचा समावेश निमविषारी प्रकारात केला जातो. त्यात मांजऱ्या, हरणटोळ, गवत्या यांचा समावेश होतो. अशा सापांपासून मनुष्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. केवळ भक्ष्य मारण्यास या विषाचा वापर केला जातो.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील समस्यांचे सर्वेक्षण
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदारसंघातील केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही कित्येक वर्षांपासून अनेक असुविधा असून त्या दूर करण्यासाठी खासदार समीर भुजबळ यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कोणत्या गावांमध्ये कोणत्या समस्या आहेत, कोणत्या कामांची गरज आहे, याविषयीची ग्रामपंचायतनिहाय माहिती प्रश्नावलीच्या स्वरूपात मागविण्यात आली असून त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात कोटय़वधींची वीजचोरी
१४७ जणांकडून आठ लाख ३८ हजारांची वसुली
नाशिक / प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रात महावितरण कंपनीने वीज चोरीविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सोमवापर्यंत एक कोटी ३८ लाख ५० हजार रूपयांची वीजचोरी पकडण्यात आली असून तब्बल तीन हजार ६७४ ठिकाणी ही वीजचोरी उघडकीस आल्याचा माहिती नाशिक परिमंडलतर्फे देण्यात आली आहे.

धन्वंतरी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये
प्रवेश प्रक्रिया सुरू
नाशिक / प्रतिनिधी

दहावी आणि बारावी निकालाच्या पाश्र्वभूमीवर येथील धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये करिअर म्हणून निवडता येईल असे विविध पर्याय खुले करण्याच्या हेतूने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य अनिल बागूल यांनी दिली. दहावीच्या परीक्षेत जेमतेम पास झालेला व आर्थिक परिस्थिती नाजूक असलेला कलेश हा महिंद्रा अॅन्ड महिंद्रामध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. स्वतच्या भवितव्याबद्दल साशंक असलेला मयूरही सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रॅमर म्हणून नोकरी करीत आहे. देवळालीचा इब्राहिम हा होंडा कंपनीत नवनवीन गाडय़ांचा डिझाईन इंजिनिअर म्हणून काम पाहत आहे. स्वरूपा ही आज उत्तम इंटेरियर डिझायनर तर प्रियंका ही फॅशन डिझायनर म्हणून काम पाहत आहे. बारा वर्षांपूर्वी संस्थापिका सरोज धुमणे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धन्वंतरी इंजिनिअरिंगचे काम सुरू झाले. नियमित विद्यार्थ्यांबरोबर सातपूर, अंबड, गोंदे, सिन्नर येथील कंपन्यामध्ये काम करणारे आय.टी.आय. वा तत्सम तांत्रिक शिक्षण असणारे अनेक जण आपल्या अधिक चांगल्या भवितव्यासाठी धन्वंतरी कॉलेजमधून अभियांत्रिकी पदवी प्राप्त क रतांना प्रमोशन वा अन्य कंपनीत चांगल्या संधीचा फायदा घेत आहेत. करियर साध्य करण्यासाठी पूरब-पश्चिम प्लाझा, त्रिमूर्ती चौक, सिडको किंवा ०२५३-२३७२५७५, ९६०४०८५२९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बागूल यांनी केले आहे.

घंटागाडीत प्रथमोपचार साहित्य ठेवण्याची मागणी
नाशिक / प्रतिनिधी

घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना हॅण्डग्लोव्हज् आणि प्रथमोपचार साहित्य गाडीवरच उपलब्ध करून देण्याची मागणी येथील समृध्दी स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त विलास ठाकूर यांच्याकडे सत्यजित कळवणकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.राजीवनगर येथे कचरा गोळा करीत असताना घंटागाडीवरील कर्मचाऱ्याला नागरिकांच्या चुकीमुळे गंभीर स्वरूपात इजा झाली. मात्र त्याच्यावर प्राथमिक उपचार करता येण्याइतके साहित्य उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यास खासगी रूग्णालयात दाखल करेपर्यंत जखमेतून अखंडितपणे रक्तस्त्राव सुरू होता. यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून आयुक्तांनी नागरिकांना ओला, सुका कचरा, विघटनशील आणि अविघटनशील कचरा वेगळा द्यावा, कचऱ्यात ब्लेड, सुरी अशा धार असलेल्या वस्तू टाकू नयेत, याबाबत सूचना द्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. याशिवाय घंटागाडी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत हॅण्डग्लोव्हज् घालणे सक्तीचे करून दुखापत झाल्यास प्राथमिक स्वरूपात उपचार करता येईल, असे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही कळवणकर यांनी केली आहे.