Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

मालेगाव महापालिकेची जकात ठेका
निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात
वार्ताहर / मालेगाव
महापालिका हद्दीत एक जुलैपासून वर्षभरासाठी जकात वसुलीचा ठेका निर्धारित रकमेपेक्षा कमी दराने सध्याच्या ठेकेदार कंपनीला देण्याचा घाट स्थायी समिती आणि पालिका प्रशासनाने घातल्याने नागरिकांकडू तीव्र आक्षेप घेतला जात आहे. दुसरीकडे निर्धारित रकमेपेक्षा जादा दराने हा ठेका घेण्याची तयारी काही संस्थांनी दाखविल्याने ही निविदा प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

माहिती अधिकाराच्या नावाखाली..
वार्ताहर / अमळनेर

माहितीच्या अधिकारामुळे शासकीय कामकाजात पारदर्शीपणा आला असला तरी या अधिकारान्वये कोण, कसली माहिती मागवेल, याचा भरवसा राहिलेला नाही. काही अर्जदारांकडून मागितलेल्या माहितीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोक्याला नाहक ताप होत आहे. अर्जदाराने शासकीय विषयांविषयी माहिती मागितली तर ते समजू शकते. परंतु भुसावळ तालुक्यातील साकेगावच्या एका अर्जदाराने मागितलेली माहिती मोठी गंमतीशीर असून ही माहिती द्यावी की नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

कल्पक!
इंजिनिअर झाल्यावर परदेशी जाण्याचा ‘ट्रेंड’ नजरेआड करत मुंबईहून नाशिकच्या दिशेने, म्हणजे प्रवाहाविरुद्ध जाणे पसंत करणाऱ्या राजेंद्र बागवे यांनी आपल्या दोघा भागीदारांच्या साथीने स्वत:च्या उद्योगाला वैश्विक परीघ तर प्राप्त करून दिलाच, पण केवळ ‘बिझनेस माइंडेड’ न राहता, नवउद्योजकांच्या अंतरंगात सकारात्मक तरंग उमटविणारी एक समर्थ चळवळ उभी करीत पुरेपूर सामाजिक भानही बाळगले आहे, हे विशेष. ‘टिचिंग-लर्निग कम्युनिटी’ अथवा ‘टीएलसी’च्या माध्यमातून त्यांनी जन्माला घातलेली ही अभासी चळवळ उद्योगविश्वात गुणाकाराने फोफावत असून आजमितीस तब्बल १३५ कंपन्या टीएलसीशी संलग्न झाल्या आहेत.

सटाणा शहरासह ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी

सटाणा / वार्ताहर

ग्रामीण भागात व सटाणा शहरातही अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवाशांना वाहनात बसविणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. विलास बच्छाव यांनी केली आहे. या संदर्भात डॉ. बच्छाव यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय पाटील व उपअधीक्षक रंजन शर्मा यांच्याशी चर्चा केली.

मोसम नदीवरील बंधाऱ्यांसाठी निधीची तरतूद
सटाणा / वार्ताहर

मोसम नदीवरील १५ बंधाऱ्यांची (देवठाणा, अंतापूर, कठगड, सोमपूर, वाघळे, नामपूर, तांदूळवाडी, भवरदरा, अंबासन, मोराणे, वळवाडे, वडनेर, खाकुर्डी, वडेल) दुरूस्ती व उंची वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने २००९-१० च्या अर्थसंकल्पात ११५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. देवठाणे, अंतापूर, कठगड, सोमपूर, वाघळे, नामपूर, तांदुळवाडी, भवरदरा, अंबासन, मोराणे, वळवाडे, वडनेर, खाकुर्डी, वडेल या १५ बंधाऱ्यांच्या दुरूस्तीमुळे कालवे व वितरिका सुस्थितीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आरम नदीवरील निकवेल, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड या चार बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी व ०.६० मीटर उंची वाढीसाठीही ३० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ठेंगोडा ते शेमळी, ब्राह्मणगाव, लखमापूर या परिसरातून जाणाऱ्या गिरणा डावा कालवा व वितरिका नुतनीकरणासाठी १०० लाख रूपये तसेच लोहोणेर ते खालप, वासोळ, मेशी, निंबोळा, महालपाटणे या परिसरातून जाणाऱ्या गिरणा उजवा कालवा व वितरिकांच्या नुतनीकरणासाठी १२५ रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या सर्व योजना मार्गी लावण्यासाठी आ. संजय चव्हाण यांनी प्रयत्न केले.

सटाण्यात महिला संघटनांतर्फे रास्ता रोको
सटाणा / वार्ताहर
निराधार विधवांना दोन हजार रूपये मासिक अनुदान द्यावे, संजय गांधी निराधार योजनेतंर्गत आयुष्यभर पेन्शन मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र निराधार महिला संघटना व महाराष्ट्र देवदासी संघटनेतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रास्ता रोको करण्यात आला.तहसील कार्यालयापासून काढण्यात आलेला मोर्चा चारफाटा परिसरात आल्यानंतर देवळा व मालेगावकडे जाणारे दोन्ही रस्ते अडविण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. देवदासींचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना शासनाने दरमहा दोन हजार रुपये देण्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी, निराधार (विधवा) व देवदासींना तसेच अंध व अपंग व्यक्तींना दारिद्रय़ रेषेखालील पिवळे रेशनकार्ड द्यावे, शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार इंदिरा चौधरी यांना देण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शोभा जगताप, तालुकाध्यक्ष प्रतिभा पगार, भिकुबाई निकम आदींसह मोठय़ा संख्येने महिलांची उपस्थिती होती.

अंनिसच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर
धुळे / वार्ताहर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. वाय. एच. सनेर, सत्यशोधक चळवळीतील प्रकाश देसले, डॉ. पी. के. साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुढील दोन वर्षांसाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत धुळे जिल्हा कार्याध्यक्ष ए. ओ. उर्फ आनंदराव पाटील, कार्यवाह पी. झेड. कुंवर यांच्यासह परेश शहा (शिंदखेडा), सुरेश बोरसे (शिरपूर), धनंजय भामरे (साक्री), महेंद्र शिरसाठ (धुळे) यांचा समावेश आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यवाह अविनाश पाटील होते. राज्य निरीक्षक म्हणून डॉ. ठकसेन गोराणे व विनायक सावळे यावेळी उपस्थित होते. बैठकीस धुळे, शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यातील समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

जिल्हा रुग्णालयासाठी २४ लाखाचा निधी मंजूर
जळगाव / वार्ताहर

जिल्हा रुग्णालयात लवकरच डायलेसिस यंत्रणा कार्यान्वित होणार असून त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेंतर्गत २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलेसिस यंत्रणा तसेच संलग्न उपकरणांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून २४ लाख रूपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ही सुविधा सर्वसामान्यांसाठी अवघ्या पंधराशे रुपयात तर पिवळ्या कार्डधारकांसाठी मोफत उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात किडनीच्या रूग्णांवर डायलेसिस उपचार होत नव्हते. आ. एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात विशेष प्रयत्न केले.