Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

बाळंतपणं दवाखान्यातच व्हावीत!
आज आपण, आपलं आयुष्य, सर्व जगच विज्ञान व तंत्रज्ञानाने व्यापलं आहे. तंत्रज्ञानाशिवाय आयुष्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे अनेक मैलाचे दगड सर केले आहेत. लसी, औषधं, तपासण्या, शस्त्रक्रिया इ. क्षेत्रांचं स्वरूप पूर्णत: बदलून गेलं आहे. त्यामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचत आहेत. तंत्रज्ञान व माहिती असूनही सर्वदूर जर उपयोग करून घेतला नाही, तर यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. माहितीचा व तंत्रज्ञानाचा उपयोग अजून स्त्रियांपर्यंत पोचला नाही असंच म्हणावं लागेल.

मुखेडचा कॉपी पॅटर्न
नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील सामूहिक कॉपीमुळे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक पुसण्यासाठी शिक्षकांनीच आता प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याला विद्यार्थ्यांसह पालकांनी पाठबळ देणे महत्त्वाचे आहे. ‘वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका’ या कुसुमाग्रजांच्या विचारांची शिक्षकांनी जाणीव ठेवावी. आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर भविष्याची स्वप्न पाहण्याऐवजी चिंतेने ग्रासून गेले आहेत नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड तालुक्यातील ३ हजार ५६१ विद्यार्थी. मुखेड तालुक्यातील ११ शाळा-महाविद्यालयांच्या बारावीतील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा निकाल सामूहिक कॉपीमुळे राखून ठेवण्यात आला.

भावगीतांच्या सुवर्णकाळात..
मराठी मनातील एक हळुवार कप्पा कायम भावगीतांसाठी राखीव असतो. व्ही.एन. जोशी - गजानन वाटव्यांपासून ते अलीकडच्या सलील कुलकर्णी, संदीप खरेपर्यंतच्या अनेकांनी मराठी भावगाण्यांचे विश्व समृद्ध केले आहे. काळाच्या ओघातही भावगीतांची गोडी अवीट आहे. मध्यंतरीच्या काळात टीव्हीच्या प्रभावामुळे भावगीतांची सद्दी सरली की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र रिअ‍ॅलिटी शोच्या जमान्यात ‘सारेगमप’सारख्या भावगीतांवर आधारित कार्यक्रमांनीच सर्वाधिक टीआरपी मिळवून ‘आपली आवड’ पुन्हा एकदा अधोरेखित केली. आधी एल.पी. रेकॉर्डस्, मग कॅसेट आणि आता सीडी-एमपीथ्री स्वरूपात मराठी मनात सतत रुणझुणत राहणारी ही गाणी सुरुवातीच्या काळात सर्वदूर पोहोचली ती आकाशवाणीच्या माध्यमातून. कारण रेकॉर्ड प्लेअर बाळगणे केवळ श्रीमंतांनाच शक्य होते. भावगीते जनसामान्यांपर्यंत नेण्यात आकाशवाणीचाच मोठा वाटा होता. दूरचित्रवाणी माध्यमात मराठीतली सदाबहार गाणी नव्या रंगरूपात उदंड लोकप्रियता मिळवीत असताना आकाशवाणीने आपल्या संग्रहातील हा अनमोल ठेवा एका विशेष कार्यक्रमाद्वारे रसिकांसाठी खुला केला आहे. सध्या दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातील अस्मिता वाहिनीवरून ‘भावगीतांचा सुवर्णकाळ’ उलगडून दाखविला जातोय. महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून १३ भागांची ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. साधारण १९३० ते १९७० हा भावगीतांचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातील गाजलेली गाणी मूळ स्वरूपात या कार्यक्रमात ऐकायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्या गाण्यांशी संबंधित एखादा किस्सा, आठवण हेही आवर्जून सांगितले जात आहे. व्ही.एन. जोशींच्या ‘रानारानात गेली बाई शीळ’ या कवितेने या सदाबहार मैफिलीचा प्रारंभ झाला. गजानन वाटवे, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, दत्ता वाळवेकर, पु.ल. देशपांडे, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, दत्ता डावजेकर, यशवंत देव, दशरथ पुजारी इ. अनेकांची गाणी या कार्यक्रमात ऐकवली जात आहेत. डॉ. सुरेश चांदवणकर, प्रकाश चांदे आणि रविप्रकाश कुलकर्णी यांची व्हॅल्यू अ‍ॅडेड टिप्पणी हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे. आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन भूपेंद्र मिस्त्री यांचे आहे. त्यांनीच या कार्यक्रमाचे शीर्षकगीतही लिहिले आहे. अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेले आणि माधुरी करमरकर यांनी गायलेले हे शीर्षकगीतही रसिकांना आवडू लागले आहे. धनश्री लेले आणि किशोर सोमण यांचे निवेदन असून मुकुंद सराफ यांनी लेखन सहाय्य केले आहे. या कार्यक्रमाची वेळ मात्र गैरसोयीची आहे. अशा कार्यक्रमाला सकाळचा प्राइमटाइम मिळायला हवा. कारण रात्री हल्ली आकाशवाणी फारशी ऐकली जात नाही. त्यामुळे सकाळच्या सत्रात, तसेच आकाशवाणीचे नवे स्मार्ट रूप असणाऱ्या एफएम वाहिनीवरून ही मालिका पुनप्र्रक्षेपित झाली तर जास्तीत जास्त रसिकांपर्यंत भावगीतांचा हा सुवर्णकाळ पोहोचेल, असे वाटते.
प्रशांत मोरे
moreprashant2000@gmail.com