Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

हडपसर ते जेजुरी रस्ता चौपदरी होणार
२५० कोटींची योजना
पुणे, २४ जून / खास प्रतिनिधी
हडपसर-सासवड-जेजुरी हा सध्याचा तीन पदरी रस्ता चौपदरी करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर होणाऱ्या या चौपदरीकरणाच्या कामासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रस्त्याचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे.

बिल्डरांनाच नगरसेवक करा
मुकुंद संगोराम

बिल्डर आणि नगरसेवक अशा दोन वेगळ्या गटातील व्यक्तींना एकमेकांसाठी फार कष्ट घ्यावे लागत आहेत. नगरसेवकांना आपले सारे राजकीय वजन बिल्डरांच्या कल्याणासाठी खर्च करावे लागते आणि बिल्डरांना या नगरसेवकांच्या दाढीला हात लावत, त्यांच्याकडून आपल्या पदरात हवे ते पाडून घेण्यासाठी खूप खूप त्रास सोसावा लागतो. असे दोन पक्ष एकमेकांच्या कल्याणाचा विचार असा अहोरात्र करत असतील, तर त्यांच्यामध्ये असा दुरावा कशासाठी असावा बरे? सरळ बिल्डरांनाच नगरसेवक केले तर एकमेकांसाठी खस्ता खाण्याचा त्रास संपेल आणि पुणे, पिंपरी-चिंचवडचे एकदाचेच काय ते मातेरे होऊन जाईल.

विधानभवनात होणार पहिली शासकीय हरित इमारत!
पुणे, २४ जून / खास प्रतिनिधी

पुरातत्त्व वास्तुदृष्टय़ा महत्त्व असलेल्या विधानभवनाच्या इमारतीलगतच्या पंचवीस हजार चौरस फूट भूखंडावर चकचकीत ‘कॉर्पोरेट’ चेहरामोहरा असलेली पुण्यातील पहिली शासकीय हरित इमारत उभी राहत आहे. नैसर्गिक प्रकाश योजना, खेळत्या हवेसाठी विशेष यंत्रणा व कार्यालयांत गारवा ठेवणारी भिंत रचना अशी या इमारतीची आगळी वैशिष्टय़े राहणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय व विधानभवनातील पुरातत्त्वदृष्टय़ा महत्त्व असलेल्या इमारती वगळून मोकळ्या जागा व जुन्या कार्यालयांच्या जागी नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत.

नदी बुजवणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून अभय!
पुणे, २४ जून/प्रतिनिधी
संगमवाडी येथील नदीचे पात्र बुजविल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा आल्यानंतर हा विषयच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दडपून टाकला! भाजपा-सेनेच्या नगरसेवकांबरोबरच स्वत: महापौर कारवाईसाठी आग्रही असताना राष्ट्रवादीने मोठय़ा कौशल्याने पाणी प्रश्नावर आंदोलन करून कारवाईचा विषयही नदीपात्राप्रमाणेच बुजवून टाकला. संगमवाडी येथे गेले काही महिने हजारो ट्रक राडारोडा टाकून नदीचे पात्र बुजवण्याचा प्रकार सुरू असून हा विषय मंगळवारच्या सभेत भाजपाचे गटनेते प्रा. विकास मठकरी यांनी उपस्थित केला होता.

अकरावी प्रवेशप्रक्रिया ‘ऑनलाइन’ नाही
५७ हजार ४६० जागा, सर्वाना प्रवेशाची शाश्वती
पुणे, २४ जून / खास प्रतिनिधी
पुणे शहर व जिल्ह्य़ातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया ‘ऑनलाइन’ स्वरूपात होणार नसून केंद्रीय पद्धतीनेच राबविली जाणार आहे. अकरावीसाठी ६२८ तुकडय़ांमधून एकूण ५७ हजार ४६० जागा असून गेल्या वर्षीप्रमाणे निकालात मोठी वाढ झाली, तरीही उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची शाश्वती आहे. पुण्यात गेल्या १४ वर्षांपासून अकरावीसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मानकर बंधूंविरूद्ध गुन्ह्य़ाचा नव्याने तपास करणार- आयुक्त
पुणे, २४ जून / प्रतिनिधी

भाडेकरूंना हुसकावून फग्र्युसन महाविद्यालय रस्त्यावरील जागेवर ‘लॅण्ड माफिया’कडून जबरदस्तीने ताबा मिळवण्याच्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी दिले. जागा बळकावण्याचा प्रयत्न शिवाजी मानकर व त्यांचे भाऊ आणि फरारी नगरसेवक दीपक मानकर या दोघांनी केला मात्र पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध तक्रार घेतली नाही असा आरोप संबंधित भाडेकरूंनी केल्यावर, डॉ. सिंह यांनी हे आश्र्वासन दिले. सायंकाळी उशिरा संबंधित भाडेकरू पौर्णिमा प्रभू यांचा फेरजबाब शिवाजीनगर पोलिसांनी नोंदवला.

‘तो प्रकार’ पाहून महापौरांवर डोळे झाकून घेण्याची वेळ!
शिवसेना नगरसेवकाला निलंबित करणार
पुणे, २४ जून/प्रतिनिधी
पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आज महापौरांसमोरच अंगातील शर्ट काढून उघडय़ाबंब अवस्थेत घोषणा द्यायला सुरुवात केली आणि मग समोरचे लाजीरवाणे दृष्य पाहून महापौरांवरही दोन्ही हातांनी डोळे झाकून घेण्याची वेळ आली. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित नगरसेवक सचिन भगत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

भारतातील अठरा टक्के मधुमेहींवर पाय गमावण्याची वेळ !
पीव्हीडीमुळे पायदुखी

पुणे, २४ जून / प्रतिनिधी

देशातील १८.५ टक्के मधुमेहींमध्ये वेळीच निदान न झाल्याने रुग्णांना आपले पाय गमवावे लागत असल्याची माहिती पुढे आली असून याच धर्तीवर पुण्यातील तीनशे मधुमेहींच्या केलेल्या पाहणीत अशा प्रकारच्या ३७ टक्के रुग्णांना आपले पाय शरीरापासून वेगळे करावे लागले आहेत.

गुंड गजानन मारणे न्यायालयात हजर
आजपर्यंत न्यायालयीन कोठडी
पुणे, २४ जून / प्रतिनिधी
बांधकाम व्यावसायिक समीर पाटील आणि गुंड निलेश घायवळ याच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी पोलिसांना हवा असलेला कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणे हा शिवाजीनगर येथील न्यायालयात आज स्वत:हून हजर झाला. त्या वेळी उद्यापर्यंत (गुरुवार) त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. जी. इटकळकर यांनी दिला.

आणखी दोन लेखापरीक्षकांना अटक; २७ पर्यंत कोठडी
न्यायालयीन पतसंस्था घोटाळा
पुणे, २४ जून / प्रतिनिधी
पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या एक कोटी दहा लाख सतरा हजार ७६९ रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आणखी दोन वैधानिक लेखापरीक्षकांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. या दोघांची २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एम. गर्डे यांनी दिले.

.. अशी आहे अकरावी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व परिसरातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता ११ वीचे प्रवेश मागील १४ वर्षांपासून केंद्रीय प्रवेश पद्धतीद्वारे देण्यात येतात. या वर्षीदेखील (२००९-२०१०) इयत्ता ११ वीचे प्रवेश गुणवत्तेनुसार केंद्रीय प्रवेश पद्धतीने संगणकाद्वारे देण्यात येत आहेत. इयत्ता ११ वी प्रवेश पद्धतीच्या नियंत्रण व्यवस्थापनासाठी स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे-३० हे मुख्य समन्वय केंद्र राहील. इयत्ता ११ वी प्रवेशाची पूर्ण तयारी झाली आहे. प्रवेशअर्ज विक्री, स्वीकृतीबाबतची ठिकाणे, कालावधी व वेळ पुढीलप्रमाणे आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना धमक्या येत असल्याची तक्रार
पिंपरी, २४ जून / प्रतिनिधी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना साक्षीसाठी न्यायालयामध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी वारंवार धमक्या येत असल्याची लेखी तक्रार त्यांचे स्वीय सहायक प्रतापराव टिपरे यांनी पोलिसांकडे केली आहे. शिवशाहीर पुरंदरे एका दिवाणी प्रकरणामध्ये साक्ष देण्यासाठी १६ एप्रिल २००९ रोजी न्यायालयात जाणार होते. प्रथमवर्ग न्यायाधीश अचलिया यांच्या कक्षात त्यासंबंधीची तारीख होती. त्याच्या एक दिवस अगोदर पुरंदरे यांना अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवर शिवीगाळ करून ‘न्यायालयात कसे याल,’ अशी धमकी दिली. पुरंदरे यांनी ही बाब न्यायाधीश अचलिया यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या कालावधीमध्ये निवडणुकीची धामधूम असल्याने पोलीस संरक्षण देणे शक्य झाले नाही. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पुरंदरे यांना असलेल्या धोक्याचा आढावा घेण्यात यावा, धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा, त्याच्यावर जरुरीप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करावी असे आदेश देऊन त्यांच्या निवासस्थानी टेहळणी पथक सतत नेमण्यात यावे, अशी सूचनाही केली आहे.

छायाचित्रकार नितीन दाबक यांचे निधन
पुणे, २४ जून/प्रतिनिधी
छायाचित्रकार नितीन यशवंत दाबक (वय ४१) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्य़ाने खासगी रुग्णालयात निधन झाले. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत दाबक यांचे नितीन हे चिरंजीव होत. सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर नितीन दाबक बृहन्महाराष्ट्र शुगर सिडींकेटमध्ये व्यवस्थापकीय संचालकांचे स्वीय सहायक म्हणून नोकरी करत होते. जाणता राजा या महानाटय़ामध्ये सुरुवातीच्या संचातील कलाकार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. अलीकडेच नोकरी सोडून त्यांनी पूर्ण वेळ व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

‘विद्यार्थ्यांमार्फत वनीकरणाचे महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवावे’
हडपसर, २४ जून/वार्ताहर
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनीकरणाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचवून जनसामान्यांमध्ये जागृती करण्याचे काम विद्यार्थ्यांमार्फत के ल्यास मोठी मदत होईल, असे मत सामाजिक वनीकरणाचे सहसंचालक मेईपोक्कीम अय्यर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी पर्यावरण शिक्षक कैलास गावडे, माणिक शेंडे, सूर्यकांत कुलकर्णी, सतीश कापसे, रमेश जाधव आदी उपस्थित होते. वानवडी येथील सहसंचालक कार्यालयामध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची दंत तपासणी, दंत चिकित्सा डॉ. दीपिका ठोसरे व डॉ. जसप्रीत यांनी आयोजित केलेल्या शिबिरात अय्यर बोलत होते.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघांना अटक
पुणे, २४ जून / प्रतिनिधी
वारजे येथील डुक्करखिंडीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तलवार, चॉपर अशी हत्यारे पोलिसांनी जप्त केली. मुंबई-बंगलोर महामार्गावर काल रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. राजन गोपाळ नायर (वय १९), विशाल सुनील खरात (वय १९) आणि विशाल किसन मातादिन (वय २५, तिघे रा. कोपरे रस्ता, उत्तमनगर, हवेली) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांचे साथीदार गोविंद सुभाष हिनोटिया आणि विशाल साळुंके हे दोघे घटनास्थळावरून पसार झाले. नायर व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून डुक्करखिंडीजवळ दरोडा घालण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना सापळा रचून पकडले. तलवार, चॉपर अशी हत्यारे पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक एस.पी. भोसले याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

पुणे सीबीआय अधीक्षकपदी विद्या कुलकर्णी यांची नियुक्ती
देहूगाव, २४ जून / वार्ताहर
पुणे विभागाच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या लाचलुचपत विभागाच्या अधीक्षकपदी विद्या कुलकर्णी यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. चिखली येथील कार्यालयात त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. कुलकर्णी यांनी यापूर्वी तामिळनाडू राज्यात सीबीआयच्या वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे. केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांबद्दल भ्रष्टाचाराच्या तक्रारी विरोधात छापे, तपासणी आदी काम येथून चालणार आहे. बनावट नोटा, बनावट औषधे, तसेच संरक्षण कायद्याअंतर्गत येणाऱ्या विषयांवर आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्याचे काम या कार्यालयामार्फत होणार आहे. भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करणे व त्या संबंधित असलेल्या तक्रारींची शहानिशा करून कारवाई करणे हासुद्धा कामकाजाचा महत्त्वाचा भाग आहे, असे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यालयामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्यास प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर संपर्क साधण्याचे आवाहन कुलकर्णी त्यांनी केले आहे. विद्या कुलकर्णी यांच्याशी (९४०३६८३०४५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी धन्वंतरी पुरस्कार उद्या
पुणे, २४ जून/प्रतिनिधी

‘डॉक्टर्स डे’ निमित्त राष्ट्रवादीतर्फे येत्या २६ जून रोजी राष्ट्रवादी धन्वंतरी पुरस्कार देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.दिलीप घुले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील डॉक्टरांचा सत्कार त्या वेळी करण्यात येणार असून, सुप्रिया सुळे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

प्रकाश काळभोर यांचे निधन
हडपसर, २४ जून / वार्ताहर
येवलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पंढरीनाथ काळभोर (वय ४२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. काळभोर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. येवलेवाडी ग्रामपंचायत सदस्य दशरथ काळभोर यांचे ते बंधू होते.