Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

क्रीडा

आफ्रिदी म्हणतो, मीच स्पर्धेत सर्वोत्तम
कराची, २४ जून / पीटीआय

केवळ नऊ महिन्यांच्या अंतराने पुन्हा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार असल्यामुळे पाकिस्तानचा तडाखेबंद फलंदाज शाहिद आफ्रिदी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर टीका केली आहे. त्याशिवाय, नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात न आल्याबद्दलही त्याने नाराजी प्रकट केली. पाकिस्तानने ट्वेन्टी-२० स्पर्धेत आफ्रिदीच्या अष्टपैलू खेळामुळे विजेतेपदाला गवसणी घातली. उपान्त्य व अंतिम सामन्यात सर्वोत्तम ठरलेला आफ्रिदी म्हणाला की, २०१०मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे आमच्या संघाला या विजेतेपदाचा आनंद फार काळ साजरा करता येणार नाही.

शारापोव्हाची हार
जोकोविच, फिशर, त्सोंगा, हान्तुचोव्हाची आगेकूच
लंडन, २४ जून / वृत्तसंस्था
माजी विजेती रशियाच्या मारिया शारापोव्हाला आज दुसऱ्याच फेरीत पत्कराव्या लागलेल्या धक्कादायक पराभवाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज एकच खळबळ उडाली. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि अमेरिकेच्या मार्डी फिशर यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत पुरुष एकेरीचा तिसऱ्या फेरीचा मार्ग सुकर केला पण, १८वे मानांकित जर्मनीच्या रेनर शटलरला तसेच २४वे मानांकन असलेल्या शारापोव्हासह महिला एकेरीत सोळाव्या मानांकित चीनच्या झेंग जी यांना दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

सानियाचे आव्हान संपुष्टात
लंडन, २४ जून/ पीटीआय

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचे विम्बल्डनच्या महिला एकेरीमधील आव्हान संपुष्टात आले आहे. सानियाला दुसऱ्या फेरीत रोमानियाच्या २८ व्या मानांकित सोराना क्रिस्तेनाने ६-४, ६-४ असे सहज सरळ सेटमध्ये पराभूत केले. सानियाचे एकेरीमधले आव्हान संपुष्टात आलेले असले तरी तिचे दुहेरीतील आव्हान मात्र अजुनही कायम आहे. सानिया आणि तिची सहकारी चिआ जुंग चॉंग यांचा सामना अमेरिकेच्या जिल क्रायबस आणि कार्ली गुलिक्सन यांच्याविरूद्ध होणार आहे.

विश्वचषकातील पराभवाचा टीम इंडिया वचपा काढेल- गेल
किंग्सस्टन, २४ जून/ पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया आतूर असेल आणि आगामी एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ वचपा काढेल, असे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल याने व्यक्त केले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी शाब्दिक खेळ यापूर्वी क्रिकेट विश्वात पाहायला मिळाले असून त्याचीच अंमलबजावणी यावेळी गेल करताना दिसत आहे. काल त्याने भारतीय संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि सुरेश रैना नसले तरी आम्ही गाफिल राहणार नाही. कारण सध्याच्या संघात पुनरागमन करण्याची क्षमता आहे, असे म्हटले होते.

आय. सी. सी.च्या कॅलेंडरमध्ये आयपीएलचा समावेश व्हावा -गिलख्रिस्ट
लंडन, २४ जून / पी. टी. आय.

आय. सी. सी.च्या कॅलेंडरमध्ये आय. पी. एल.चा समावेश करा अन्यथा ट्वेन्टी-२० साठी खेळाडू कसोटीवरही पाणी सोडतील, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने दिला आहे. काऊड्री यांच्या ‘एम. सी. सी. स्पिरिट ऑफ क्रिकेट’ या व्याख्यानासाठी येथे आला असता तो बोलत होता.

विश्वचषक विजयाचे श्रेय युनूसच्या नेतृत्वाला- मलिक
कराची, २४ जून/ पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या विजयाचे श्रेय पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानच्या नेत्तृत्वाला द्यायला हवे. युनूसने संपूर्ण संघाला एकत्र केले आणि त्यामुळेच हा सुवर्ण दिवस पाकिस्तान पाहू शकला. त्याचबरोबर संघासहीत असलेल्या मानसेपचार तज्ञाचाही आम्हाला फायदा झाला, असे मत पकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने व्यक्त केले आहे.

संघात एकच कर्णधार असावा- आलम
कराची, २४ जून / पीटीआय

संघात समन्वय राखण्यासाठी एकच कर्णधार असावा असे ठाम मत पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक इम्तिखाब आलम यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान युनूस खान कर्णधारपदावरून निवृत्ती स्वीकारणार असल्याची पूर्वसूचना आपल्याला देण्यात आली नव्हती, असा खुलासाही त्यांनी या वेळी केला. मात्र युनूस हा कसोटी, टे्वन्टी- २० व आणि एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार हवा अशी मागणीही त्यांनी केली.

जागतिक मुष्टियुद्ध मालिकेसाठी भारतालाही फ्रॅन्चायझी
नवी दिल्ली, २४ जून / पीटीआय

क्रिकेट, बॅडिमटन, टेनिस या खेळांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीयांनी आता मुष्टियुद्धातही आपला दबदबा निर्माण करायचे ठरवले आहे. किंबहुना आता त्यांची दखल मुष्टियुद्ध विश्वात घेतली जाणार आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक मुष्टियुद्ध मालिकेसाठी भारताची फ्रॅन्चायझी म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या सप्टेंबर मध्ये या स्पर्धा होणार आहेत.

ड्वेन ब्राव्हो व्हिक्टोरियातर्फे खेळणार
मेलबर्न, २४ जून / पीटीआय

ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात यशस्वी कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होवर आगामी ट्वेन्टी-20 बिग बॅशसाठी क्रिकेट व्हिक्टोरियाने करारबद्ध करण्यासाठी विश्वास टाकला आहे. क्रिकेटच्या सर्वच प्रकारात विशेषत: ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अतुलनीय कामगिरीची छाप पाडणारा ब्राव्होचा समावेश झाल्यास संघ अधिक बलवान होईल. हा करार त्याला मान्य असेल, असे क्रिकेट व्हिक्टोरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी डोडमेड यांनी त्याचा संघाशी झालेल्या कराराबाबतची घोषणा करताना सांगितले. या २५ वर्षांच्या अष्टपैलू खेळाडूने वेस्ट इंडिजतर्फे ४० सामने तसेच मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएलमध्ये खेळताना लक्षवेधी कामगिरी केली आहे.

मानांकन गोल्फ स्पर्धा; पुण्याच्या आदित्य भांडारकरला संयुक्त आघाडी
कोईमतूर, २४ जून/पीटीआय
पुण्याच्या आदित्य भांडारकर याने बंगळुरूचा अभिषेक झा याच्या साथीत एलजी तामिळनाडू चषक मानांकन गोल्फ स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी संयुक्त आघाडी घेतली.आदित्य व अभिषेक यांचे प्रत्येकी १४८ पेनल्टी गुण झाले आहेत. गगन वर्मा याने १४९ पेनल्टी गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. रशीद खान व समरेश सरदार (प्रत्येकी १५०) यांनी तिसरे स्थान घेतले आहे. ईमामुल हक, पवनकुमार (प्रत्येकी १५२) हे त्यांच्याखालोखाल आहेत. जसजितसिंग, एच.एस.कांग यांचे प्रत्येकी १५३ पेनल्टी गुण असून जयवीर सिंग व करण वासुदेवा हे प्रत्येकी १५४ पेनल्टी गुणांवर आहेत. अर्शदीप तिवाना, राहुल बजाज व प्रीतम हरिदास यांचे प्रत्येकी १५५ पेनल्टी गुण आहेत.

स्कूटर रॅलीमध्ये ३३ स्पर्धकांचा सहभाग
पुणे २४ जून/प्रतिनिधी
स्पोर्ट्सक्राफ्टतर्फे आयोजित केलेली २० वी पावसाळी स्कूटर रॅली स्पर्धेत गतविजेत्या मनजितसिंग बस्सान याच्यासह ३३ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा मुंबई येथे होणार आहे. त्यामध्ये मुंबई,पुणे,नाशिक आदी ठिकाणच्या नामवंत खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये माजी विजेत्या शमीम खान,कुणाल राव यांचाही समावेश आहे.ही स्पर्धा लोअर परेल (मुंबई) येथून सकाळी ८-३० वाजता सुरु होणार आहे.