Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पवारांच्या क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या हाती
संजय बापट

ठाणे - बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि गोरेगावच्या धर्तीवर ठाण्यातही भव्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी

 

उभारण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र पवारांच्या या अ‍ॅकॅडमीचे भवितव्य शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच हातात असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उदयोन्मुख क्रिकेटपटूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे आणि त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करावी, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने प्रशिक्षण योजना राबविली जाते. त्यासाठी बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि गोरेगाव येथे क्रिकेट अ‍ॅकॅडमी उभारण्यात आल्या आहेत. मुंबईतील अनेक क्रिकेटपटूंना त्याचा लाभही होत आहे, मात्र या दोन्ही क्रिकेट अ‍ॅकॅडमीपूर्वी ठाणे जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी ठाण्यात भव्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी उभारण्याचे स्वप्न शरद पवारांनी ठाणेकरांना दाखविले होते. जिल्ह्यातील कर्जत, कसारा ते डहाणूपर्यंतच्या मुलांना क्रिकेटचे धडे घेण्यासाठी सध्या बांद्रा वा गोरेगावशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत सर्वार्थाने मध्यवर्ती असणाऱ्या ठाण्यात क्रिकेट अ‍ॅकॅडमी झाल्यास त्याचा अनेक खेळाडूंना फायदा मिळू शकतो. खुद्द पवारांनीही याच उद्देशाने ९ सप्टेंबर २००५ रोजी पालिकेला पत्र पाठवून आपला हा मानस प्रकट केला होता. नजीकच्या काळात मुंबईलगत असलेल्या ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण व उपनगरांचा झपाटय़ाने विकास होत असून, या भागात दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत. त्यामुळे ठाण्यात कोलशेत येथे पार्कसाठी आरक्षण असलेली १५ एकर जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला नाममात्र दराने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने उपलब्ध करून दिल्यास त्यावर स्वखर्चाने क्रिकेट अ‍ॅकॅडमी उभारण्याची ग्वाही पवारांनी दिली होती. त्यानुसार तत्कालीन आयुक्त संजय सेठी यांनी महासभेसमोर प्रस्तावही ठेवला होता. मात्र अशा प्रकारची क्रिकेट अ‍ॅकॅडमी झाल्यास त्याचा पाठपुरावा करणारे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या राष्ट्रवादीस राजकीय फायदा मिळेल, अशी शंकेची पाल सेनेच्या गोटात चुकचुकल्याने ऐनवेळी हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. तेव्हापासून गेली चार वर्षे हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
मुळातच हा प्रस्ताव देण्यापूर्वी शरद पवार यांनी पालिका आयुक्त आणि शिवेसनाप्रमुखांशीही चर्चा केली होती. एवढेच नव्हे तर खुद्द बाळासाहेब ठाकरेंचेच नाव या अ‍ॅकॅडमीला देण्याचा प्रस्ताव होता. प्रथम स्वत: बाळासाहेबांनीच विरोध दर्शविला. मात्र तुम्ही प्रस्ताव मंजूर करा, बाळासाहेबांची सहमती आपण मिळवू, अशी ग्वाही पवारांनी दिल्यानंतर सेना नेत्यांनीही तुमचे काम मार्गी लागले, असा परतीचा निरोप पवारांना दिला होता, परंतु क्रिकेट अ‍ॅकॅडमी झाल्यास त्याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीला जाण्याच्या भीतीने या प्रस्तावाच्या पायात पाय घालण्यास झालेली सुरुवात आजपर्यंत चालू आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक अधूनमधून या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा करतात आणि तेवढय़ात सफाईदारपणे सत्ताधारीही चर्चा सुरू आहे, असे उत्तर देऊन वेळ मारून नेतात. विशेष म्हणजे ठाण्यातील क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा प्रस्ताव पवारांनी प्रथम मांडला. मात्र त्यानंतर भूखंड मिळूनही मुंबईतील दोन्ही क्रिकेट अ‍ॅकॅडमी पूर्ण झाल्या. केवळ राजकीय स्वार्थापोटी ठाणेकरांना एका चांगल्या सुविधेपासून वंचित ठेवले जात असल्याबद्दल क्रीडा रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि देवराम भोईर यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पत्र आल्यानंतर आपण सविस्तर आराखडे व प्रकल्प अहवाल सादर करा, असे पत्र आपण महापौर म्हणून पाठविले, मात्र त्याचे अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनलाच स्वारस्य नाही, असा प्रत्यारोप सेनेचे राजन विचारे व इतर सदस्यांनी केला. अखेर उद्धव साहेबांशी चर्चा करतो व त्यांनी अनुमती दिल्यास पुढील सर्वसाधारण सभेत विषय घेऊ, अशी ग्वाही महापौर स्मिता इंदुलकर यांनी दिली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात, यावरच पवारांच्या अ‍ॅकॅडमीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.