Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इशान नकवी, सायली राणे यांचा भारतीय बॅडमिंटन संघात समावेश!
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतून गेल्या काही वर्षात जिष्णू सन्याल व अक्षय देवलकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव मोठे केले. आता याच

 

योजनेमधून नव्या ताज्या दमाच्या बॅडमिंटनपटूंची तरुण पिढी उदयाला येत आहे. १७ वर्षीय इशान नकवी व १६ वर्षीय सायली राणे हे याच योजनेतून घडवलेले राज्यातले आघाडीचे खेळाडू आता भारतीय ज्युनियर संघात आगामी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. ए.बी. सी. ज्युनियर चॅम्पियनशिप या नावे ओळखली जाणारी ही प्रतिष्ठित स्पर्धा यंदा मलेशियामधील जोहारबारु येथे १२ ते १६ जुलै दरम्यान होईल. या स्पर्धेत आशियातील सारे आघाडीचे ज्युनियर बॅडमिंटनपटू खेळतील. इशान व सायली हे एकेरीत तसेच दुहेरीतही भाग घेतील. इशानचा दुहेरीतील जोडीदार असेल आंध्र प्रदेशचा नंदगोपाल तर सायलीची साथीदार असेल आंध्र प्रदेशची पी सिंधू! योगायोग असा की या स्पर्धेत १३ जणांचा भारतीय संघ निवडला गेला आहे. त्यात महाराष्ट्राचे तीन खेळाडू आहेत. इशान व सायली व्यतिरिक्त निवडलेली प्रश्नजक्ता सावंत ही ठाणे जिल्ह्याचीच खेळाडू आहे! या स्पर्धेत यजमान मलेशियाबरोबर इंडोनेशिया, चीन, कोरिया, जपान, थायलंड आदी साऱ्या देशांचे सवरेत्कृष्ट बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत. ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष आमदार एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही खेळाडूंचा खासदार आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत खास सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाण्याचे मुख्य बॅडिमटन प्रशिक्षक आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते श्रीकांत वाड यांनी या दोघांकडून या खडतर स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे याप्रसंगी सांगितले. दोन्ही खेळाडूंनी मनोगत व्यक्त करताना, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू व आजच्या यशामागे आपले प्रशिक्षक वाडसर तसेच छत्रपती पुरस्कार विजेता मयूर घाटणेकर, ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत, बास्ते व इतर सर्व प्रशिक्षकांच्या सहकार्याचा हात असल्याचे खास नमूद केले. इशान नकवी हा मूळचा लखनौचा, पण बॅडमिंटनमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी गेली पाच वर्षे महागिरी कोळीवाडय़ानजीक घर घेऊन तो ठाण्यात स्थायिक झाला आहे. अत्यंत मेहनती व कष्टाळू असणाऱ्या इशानने २००८ साली महाराष्ट्र राज्याचा सर्वात तरुण सीनियर राज्य अजिंक्यवीर बनण्याचा मान तर पटकावलाच, पण नुकत्याच पार पडलेल्या चेन्नई, कोचीन व बंगलोर या तिन्ही अखिल भारतीय रँकिंग स्पर्धांमध्ये दोन एकेरी उपांत्य फेरी तर दोन दुहेरी उपांत्य फेऱ्यांमध्ये धडक मारून साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. सायली राणेनेही गतवर्षीच्या सबज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दुहेरी मुकूट संपादन केला होता. सायली राणे एअर इंडियाच्या सेवेत आहे, तर इशान नकवीला राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्सची शिष्यवृत्ती आहे.