Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रानमेव्याने दिला रोजगाराचा हात
सुभाष हरड

नागरी जीवनापासून पिढय़ान्पिढय़ा अलिप्त घरात अठरा विसे दारिद्रय़, शिक्षणाचा अभाव,

 

कमालीची अंधश्रद्धा आणि घरात व्यसनांचा वाढता भस्मासूर यात भरीस भर म्हणून वाढत्या महागाईला तोंड देताना संसाराची झालेली सर्वार्थाने वाताहात.
अशा नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या शहापूर, मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत नांदणाऱ्या ठाकूर-कातकरी समाजाच्या या पिढय़ान्पिढय़ाच्या कैफियतीला हाक दिलीय कोकणच्या रानमेव्याने. अर्थात करवंदे, आंबे, अळवे व जांभळे हाच रानमेवा ठाकूर-कातकरी समाजाला हक्काचे रोजगार मिळवून देतात. याचा प्रत्यय तुम्हाला या भागात फिरताना जाणवेल.
कल्याण-नगर महामार्ग सह्याद्री पर्वतरांगेतील माळशेत घाटातून जातो. शहापूर तालुक्यातील माहुली, कसारा, डोळखांब या भागांतील निसर्गरम्य वातावरणात ठाकूर-कातकरी समाजाची वस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे. वाडय़ा-पाडय़ांत राहणाऱ्या या आदिवासी बांधवांना सर्वस्वी निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. डिंक गोळा करणे, टेंभुर्लीची पळसाची पाने गोळा करणे, मध गोळा करणे, पावसाळ्यात शेवळीसारख्या जंगली पालेभाज्या, तसेच खेकडे, मासे विकून हा समाज आपल्या संसाराचा गाडा हाकताना दिसतो.
उन्हाळ्याच्या दिवसात मात्र बांबूंच्या टोपल्या तयार करून विकणे आणि वीटभट्टय़ावर काम करून पावसाळ्याची बेगमी तयार करतात, परंतु या रोजगाराला अनोखे रूप दिले आहे ते आंबट-गोड करवंदे, जांभळे व अळीवांनी. या ठाकूर-कातकरी समाजातील मुले परिसरातील आश्रमशाळांतून माध्यमिक शाळांतून ज्ञानार्जनाचे धडे गिरवत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही आदिवासी मुले भल्या पहाटे जंगलात जाऊन करवंदे, जांभळे तोडून आणतात आणि करवंद्याचे, अळवांचे द्रोण किंवा परडी तयार करून दिवसभर माळशेज घाटात जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांना, खर्डी, कसारा, आसनगाव, वासिंद या रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आग्रह करून करवंदे, आळीव खरेदी करायला भाग पाडतात.
दिवसभर उपाशी-तापाशी झाडाखाली बसून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या आदिवासी मुलांना आपल्या आई-वडिलांच्या संसाराला हातभार तर लावावाच लागतो, परंतु दीड-दोन महिने करवंदे, जांभळे, पळसाची पाने विकून मिळणाऱ्या मिळकतीतून आपल्या शिक्षणाचा खर्चही भागवावा लागतो. या दोन्ही तालुक्यांतील आदिवासी पाडय़ामधील मुलांचा हा सुट्टीतील व्यवसाय त्यांना ‘कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही’ ही शिकवण तर देतोय, परंतु स्वावलंबनाची सवयही या मुलांना मिळते. बालपणापासून दारिद्रय़ाशी झगडत केवळ करवंदे, जांभळे, आवळे विकून उपजीविका करीत असताना त्याच पैशातून शिक्षणासाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्या या आदिवासी मुलांच्या जीवनात स्थैर्याची पालवी कधी फुटेल का, असा प्रश्न पडतो.