Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

डोंबिवलीच्या शिधावाटप कार्यालयाचा ‘घोडा’ खात बसलाय पेंड !
अजून नाही सरल्या आशा..

डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पश्चिमेतील शिधावाटप कार्यालय म्हणजे कोंबडीचे खुराडे. एक ते

 

सव्वा लाख शिधापत्रिका असलेल्या डोंबिवलीकरांसाठी हा खुराडा गेल्या अनेक वर्षापासून वापरला जात आहे. या खुराडय़ात कर्मचारी तर पोळून निघतातच, पण जेव्हा नागरिक आपल्या कामासाठी जातात तेव्हा अक्षरश: भाजून निघतात. इतके कोंदट, गच्च भरलेले हे कार्यालय अर्थात खुराडा पाऊसपाण्याशी सामना करत आहे त्या ठिकाणीच भग्नावस्थेत उभे आहे.
डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानाजवळ असलेल्या शिधावाटप कार्यालयातील ग्राहकांची संख्या वाढली आहे. सुमारे सहा ते सात लाख लोकसंख्येसाठी हे कार्यालय जागेच्या बाबतीत अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेक नागरिक, नगरसेवकांनी यापूर्वी पत्र देऊन हे कार्यालय चांगल्या जागेत स्थलांतरित करावे म्हणून प्रयत्न केले, पण लालफितीच्या अधिकाऱ्यांनी त्याची कधीच दखल घेतली नाही. कारण कार्यालय हलवायचे म्हणजे वरिष्ठांना हलवावे लागेल, मग वरिष्ठ आपल्या डोक्याला ताप नको म्हणून जाऊ द्या, राहू द्या तेथेच या भूमिकेत. अशा या नाटकामुळे खुराडा आहे त्याच ठिकाणी आहे. ग्राहक पण या खुराडय़ात जायचे म्हणजे दिव्य म्हणत रडतखडत आपली कामे करून घेत असतात.
आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी आमदार झाल्यानंतर पहिले काम कोणते हाती घेतले असेल तर भागशाळा मैदानाजवळील शिधावाटप कार्यालय डोंबिवली पूर्वेत स्थलांतरित करणे. आमदार पाटील यांनी शिधावाटप दुकानातील अनागोंदी, येथील शिधावाटप दुकानामध्ये नागरिकांना होणारा त्रास या विषयावर वेळोवेळी शाब्दिक आसूड ओढले. अधिकाऱ्यांना ताळयावर आणले. त्यातच हे कार्यालय डोंबिवली पूर्वेतील नेहरू रोडवरील छत्रपती शिवाजी भाजी मंडईमध्ये स्थलांतरित करावे म्हणून कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाकडे आर्जव केले. पालिकेच्या स्थायी समितीने जून २००६ व स्थायी समितीने ऑगस्ट २००७ मध्ये मंडईच्या पहिल्या माळ्यावरील तीन हजार चौरस फुटाची जागा तीन वर्षाच्या भाडेकराराने शिधावाटप कार्यालयाला देण्याचे ठराव मंजूर केले आहेत. पण आता तीन वर्ष उलटूनही लालफितीत अडकलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना शिधावाटप कार्यालय तातडीने मंडईच्या जागेत स्थलांतरित करावे म्हणून कधी वाटलेले नाही. आमदार पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या उरावर बसून शिधावाटप कार्यालय स्थलांतराच्या कागदपत्रांची सर्व पूर्तता करून घेतली आहे. मग, शासकीय अधिकाऱ्यांना आमदारांनी आपल्याही मानगुटीवर बसावे असे वाटते का? याउलट मंडईच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या गाळेधारकांना तळमजल्याला स्थलांतरित करण्यात आले आहे. हे सात गाळेधारक आपल्या गाळ्यांना रंगरंगोटी करून, हवाबंद करून, पालिका अधिकाऱ्यांना खिशात टाकून आपला रेडिमेड कपडे विक्रीचा धंदा करीत आहेत. साधा गाळेवाला एवढी गतिमान क्रिया करू शकतो तर शासकीय अधिकाऱ्यांना फक्त आपले रेकॉर्ड, टेबले घेऊन येऊन फक्त मंडईच्या जागेत येऊन बसायचे आहे. पण, तेवढीही इच्छाशक्ती शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये नसेल तर एक दिवस आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी डोंबिवलीतील जनतेला विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या अधिकाऱ्यांना खुच्र्यासह उचलून मंडईच्या जागेत आणण्यासाठी आवाहन करावे.
तेव्हाच फायलीत अडकलेले, खुराडय़ात बसण्याची सवय लागलेले अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ जागे होतील. शेवटी नागरिकांना काळजी आहे, आपले शिधावाटप कार्यालयातील रेकॉर्ड व्यवस्थित आहे ना याचे. पाऊस पडला की गुडघाभर पाणी शिधावाटप कार्यालयाचा दरवर्षी आसरा घेत असते.