Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रिक्षावाल्यांची स्वयंघोषित नो एंट्री
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे स्टेशनला सुरू असलेल्या सॅटिसच्या कामामुळे प्रवाशांचे हाल सुरू असताना रिक्षावाल्यांच्या मुजोरपणामुळे प्रवाशांना आणखी त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. संध्याकाळी

 

लोकलच्या गर्दीतून दमूनभागून आल्यावर लवकर रिक्षा पकडून घरी जायचे म्हटले की, रिक्षा मिळणे म्हणजे कठीण काम असते. ठाणे स्टेशन फलाट एककडून रिक्षा पकडायला आलेल्या प्रवाशांना सध्या रिक्षावाल्यांच्या असहकाराचा फटका बसत आहे.
फलाट एककडील दादा पाटील रस्त्यावर रिक्षांची गर्दी नेहमी असते. संध्याकाळी रिक्षांच्या गर्दीला आवर घालण्यासाठी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी पुढाकाराने रिक्षावाल्यांना शिस्त लावण्यास सध्या सुरुवात केली आहे. रिक्षावाल्यांना शिस्त लागून प्रवाशांना रिक्षा लवकर मिळावी हा त्यामागचा उदात्त हेतू होता. मात्र रांगेत गेलो तर, प्रवाशांना जेथे जायचे असेल ते भाडे निमूटपणे घ्यावे लागेल या शक्यतेने रिक्षावाल्यांनी दादा पाटील मार्गावरून स्वयंघोषित नो एंट्री केली आहे. प्रवाशांना ठाणे जनता सहकारी बँकेपाशीच उतरवून रिक्षावाले तसेच मागे फिरतात. यामुळे फलाट एकपाशी रिक्षा मिळणे सध्या कठीण झाले आहे. रिक्षावाल्यांच्या असहकारामुळे प्रवाशांना बी-केबिन चौकापर्यंत रिक्षासाठी यावे लागते. तेथून रिक्षावाल्याच्या मनात असेल तर, रिक्षा मिळते, नाही तर ताटकळत उभे राहावे लागते. रिक्षावाल्यांच्या या मुजोरपणामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी आरटीओने रिक्षावाल्यांना चाप लावण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली होती. तक्रार नोंदवण्यासाठी दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले होते. या हेल्पलाईनवर रिक्षावाल्यांच्या मुजोरिविरोधात त्यांच्या क्रमांकासह अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या. मात्र अशा किती रिक्षावाल्यांवर कारवाई झाली हे प्रवाशांना कळलेच नाही. जवळचे भाडे नाकारणे, घोडबंदर परिसराचे नाव घेताच रिक्षा सुसाट दामटवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिस तैनात करावेत, तसेच प्रवाशांच्या तक्रारीची दखल घेण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.