Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

श्रमजीवी संघटनेतर्फे रास्ता रोको!
ठाणे/प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची हेळसांड आणि आदिवासी आश्रमशाळांतील

 

सोईंचा बोजवारा उडाल्याच्या निषेधार्थ आज श्रमजीवी संघटनेने वाडा-भिवंडी रोडवरील अंबाडी नाका येथे दोन तास रास्ता रोको केला. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह सुमारे तीन हजार कार्यकर्त्यांना अटक करून काही वेळाने सोडून देण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांना शासन दरवर्षी कोटय़वधी रुपये उपलब्ध करीत असताना मुलांना पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. निवास व जेवणाच्या बाबतीतही प्रचंड हेळसांड केली जाते. पाण्याअभावी २० आश्रमशाळा बंद ठेवल्या गेल्या. या शाळांतून पाणी उपलब्ध करून बुधवारपासून सर्व आश्रमशाळा सुरू कराव्यात, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली होती. जिल्ह्याच्या आदिवासी प्रकल्प विभागाचे अतिरिक्त उपायुक्त करवंदे यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन उद्यापासून सर्व आश्रमशाळा सुरू करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
अंबाडी येथे ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळून तीन वर्षे झाली तरी सरकार जागा व पैसा उपलब्ध करीत नाही. त्यामुळे भिवंडी व वाडा तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू होऊ शकले नाही. महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने जमीन उपलब्ध करून सा. बां. विभागाने त्यावर येत्या वर्षभरात रुग्णालय सुरू करावे, अशी श्रमजीवी संघटनेची मागणी आहे.