Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसचे संपर्क अभियान; जिल्ह्यात दोन दिवस कार्यक्रम
ठाणे/प्रतिनिधी : लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेसला नेत्रदीपक यश मिळावे, यासाठी प्रदेश

 

काँग्रेसतर्फे राज्यभर संपर्क अभियान राबविले जात असून, या अभियानांतर्गत ठाणे व कल्याणमधील कार्यक्रम २७ जून रोजी तर वाडा, पालघर येथील कार्यक्रम २८ जून रोजी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यात २४ मतदारसंघ झाल्याने या जिल्ह्यास अनन्यसाधारण महत्त्व प्रश्नप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने आमदार निवडून यावेत यासाठी प्रदेश पातळीवरून विविध प्रयत्न चालू असून, हे अभियानही त्याचाच एक भाग आहे. ठाण्यातील कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी प्रमुख नेते व पदाधिकारी कामाला लागल्याचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष कांती कोळी व ज्येष्ठ नेते सुभाष कानडे यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कांती कोळी यांनी समन्वय समिती तसेच ब्लॉक अध्यक्षांची बैठक बोलाविली होती. या बैठकीस उपाध्यक्ष प्रमोद पाटील, गटनेते नारायण पवार, अनिल साळवी, शिक्षण मंडळ उपसभापती नंदू मोरे, ब्लॉक अध्यक्ष रमेश वाडेकर, महेश वारे आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत भिवंडीतून काँग्रेसचे सुरेश टावरे निवडून आले, तसेच पालघरमधील अपक्ष खासदार बळीराम जाधव यांनीही काँग्रेसलाच पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात काँग्रेससाठी वातावरण अनुकूल बनल्याचा दावा केला जात आहे. ग्रामीण भागात विधानसभेचे ११ मतदारसंघ आहेत. यामुळे वाडा व पालघर येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष ठाकरे संवाद साधणार आहेत. ग्रामीण भागातील हे अभियान यशस्वी होण्यासाठी खासदार सुरेश टावरे, जिल्हध्यक्ष दामू शिंगडा, ज्येष्ठ नेते सुभाष पिसाळ, रमेश चव्हाण आदी नेते प्रयत्नशील आहेत.