Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण घोटाळ्याची होणार चौकशी
ठाणे/प्रतिनिधी

एकीकडे महापालिकेकडून सर्व सुविधा, मानधन द्यायचे आणि दुसरीकडे प्रशिक्षणार्थीकडून परस्पर

 

वारेमाप फी गोळा करायची, एकूणच पालिकेला बदनाम करणाऱ्या अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेनेचे विलास सामंत यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यानुसार या घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील विद्यार्थ्यांसाठी १९९२ पासून पालिकेमार्फत अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना चालू आहे. जिल्हा क्रीडा संघटनेच्या सहकार्याने व पालिकेच्या आर्थिक मदतीने ही योजना राबविताना अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षणासाठी महिन्याला ५० रुपये फी निश्चित करण्यात आली होती, तसेच यासाठी प्रशिक्षकांना पालिकेतर्फे मानधन देण्याचेही निश्चित करण्यात आले होते.
मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. पालिकेची अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षण योजना ही भ्रष्टाचाराचे कुरण असून पालिका आणि विद्यार्थ्यांकडूनही लूट चालली आहे.
पालिकेची योजना असताना प्रशिक्षक स्वत:च्याच नावाने योजना राबवत आहेत. हे प्रशिक्षक महिन्याला किमान ५० हजार रुपये कमवत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ हवीच कशाला, असा आक्षेप सामंत, अशोक वैती, विरोधी पक्षनेता सुभाष भोईर, मनोज शिंदे, देवराम भोईर आदी सदस्यांनी घेतला.
त्यावर या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, असा ठराव करीत मानधन वाढीचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला.