Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भावे सभागृहातील तलाठी कार्यालय तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी
डोंबिवली/प्रतिनिधी - भावे सांस्कृतिक केंद्रामधील तलाठी कार्यालय तातडीने विष्णुनगर पोलीस

 

ठाण्यातील इमारतीमध्ये स्थलांतरित करावे आणि शहरातील भावेप्रेमी, साहित्यिक नागरिकांच्या मतांचा आदर करावा, अशी मागणी करणारे पत्र सभापती वामन म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
भाषाप्रभू पु. भा. भावे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू आहे. जन्मशताब्दी वर्षात भावेंच्या नावाने असलेल्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये. या वास्तूत असलेले तलाठी कार्यालय विष्णुनगर पोलीस ठाण्यामधील इमारतीत स्थलांतरित केल्यास पोलीस आणि तलाठी एकाच इमारतीत आपापला कारभार पाहतील. कोणतेही गैरप्रकार तलाठी कार्यालयात होणार नाहीत. विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीमधील डोंबिवली ग्रंथसंग्रहालय भावे सांस्कृतिक केंद्रात स्थलांतरित करावे, त्यामुळे ग्रंथसंग्रहालय व्यवस्थापनाला भावे वास्तूमधील सभागृहाचा विविध कार्यक्रमांसाठी वापर करता येईल. दर महिन्याला कार्यक्रम राबविणे शक्य होणार आहे. तसेच, या वास्तूत भावेंचे समग्र साहित्य एका दालनामध्ये ठेवले तर या वास्तूचा साहित्यिक, सांस्कृतिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
आपण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तलाठी कार्यालय स्थलांतराबाबत तातडीने चर्चा करावी आणि‘लोकसत्ता’च्याबातम्यांमुळे सुरू झालेला हा विषय तातडीने मिटून टाकावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.