Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रहिवाशांना भुर्दंड, बिल्डरांवर कारवाईची मागणी
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवलीतील ९५ अधिकृत इमारतींचे बांधकाम करणाऱ्या बिल्डर, वास्तुविशारदांनी

 

अद्याप पूर्णत्वाचा दाखला पालिकेकडून घेतलेला नाही. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा बिल्डर, वास्तुविशारदांवर पालिकेने एम. आर. टी. पी. अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती वामन म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
बिल्डर, वास्तुविशारदांच्या या पळपुटेपणामुळे संबंधित इमारतींमधील रहिवाशांवर नाहक ५५ टक्के दंडाचा बोजा पडत आहे. काही बिल्डरांनी उभारलेल्या ९५ इमारतींना अद्याप पूर्णत्वाचा दाखल घेण्यात आलेला नाही. यामुळे पालिका शासकीय अध्यादेशानुसार अशा इमारतींवर ५५ टक्के दंड आकारण्याची कारवाई करत आहे. बिल्डर बांधकाम करून निघून गेल्याने हा भुर्दंड तेथे राहत असलेल्या रहिवाशांवर पडत आहे. बिल्डरने रहिवाशांकडून सगळी रक्कम वसूल केलेली असते, त्यामुळे त्याचा त्या इमारतीशी तसा संबंध राहिलेला नसतो, पण त्याच्या चुकीमुळे रहिवाशांना नाहक दंडाच्या रकमेला तोंड द्यावे लागत आहे. बांधकाम पूर्ण झाल्याची काही कागदपत्रे, सोलर सिस्टीम बसविण्यास टाळाटाळ यामुळे बिल्डर पालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला घेण्यास टाळाटाळ करत असतो.