Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

पवारांच्या क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे भवितव्य उद्धव ठाकरेंच्या हाती
संजय बापट

ठाणे - बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि गोरेगावच्या धर्तीवर ठाण्यातही भव्य क्रिकेट अ‍ॅकॅडमी उभारण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र पवारांच्या या अ‍ॅकॅडमीचे भवितव्य शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याच हातात असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

इशान नकवी, सायली राणे यांचा भारतीय बॅडमिंटन संघात समावेश!
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेतून गेल्या काही वर्षात जिष्णू सन्याल व अक्षय देवलकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव मोठे केले. आता याच योजनेमधून नव्या ताज्या दमाच्या बॅडमिंटनपटूंची तरुण पिढी उदयाला येत आहे. १७ वर्षीय इशान नकवी व १६ वर्षीय सायली राणे हे याच योजनेतून घडवलेले राज्यातले आघाडीचे खेळाडू आता भारतीय ज्युनियर संघात आगामी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.

रानमेव्याने दिला रोजगाराचा हात
सुभाष हरड

नागरी जीवनापासून पिढय़ान्पिढय़ा अलिप्त घरात अठरा विसे दारिद्रय़, शिक्षणाचा अभाव, कमालीची अंधश्रद्धा आणि घरात व्यसनांचा वाढता भस्मासूर यात भरीस भर म्हणून वाढत्या महागाईला तोंड देताना संसाराची झालेली सर्वार्थाने वाताहात. अशा नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या शहापूर, मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत नांदणाऱ्या ठाकूर-कातकरी समाजाच्या या पिढय़ान्पिढय़ाच्या कैफियतीला हाक दिलीय कोकणच्या रानमेव्याने. अर्थात करवंदे, आंबे, अळवे व जांभळे हाच रानमेवा ठाकूर-कातकरी समाजाला हक्काचे रोजगार मिळवून देतात. याचा प्रत्यय तुम्हाला या भागात फिरताना जाणवेल.

किशोरी शक्ती योजनेत मुलींची फसवणूक?
दिलीप शिंदे

शहापूर तालुक्यातील किन्हवली प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात किशोरी शक्ती योजनेत काम करणाऱ्या मुलींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ६० मुलींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मानधनाची मागणी केली आहे, तर बँकेत खाती नसल्याने मुलींना मानधन मिळाले नसल्याचा दावा डॉ. संजय काकडे यांनी केला आहे.

डोंबिवलीच्या शिधावाटप कार्यालयाचा ‘घोडा’ खात बसलाय पेंड !
अजून नाही सरल्या आशा..

डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पश्चिमेतील शिधावाटप कार्यालय म्हणजे कोंबडीचे खुराडे. एक ते सव्वा लाख शिधापत्रिका असलेल्या डोंबिवलीकरांसाठी हा खुराडा गेल्या अनेक वर्षापासून वापरला जात आहे. या खुराडय़ात कर्मचारी तर पोळून निघतातच, पण जेव्हा नागरिक आपल्या कामासाठी जातात तेव्हा अक्षरश: भाजून निघतात. इतके कोंदट, गच्च भरलेले हे कार्यालय अर्थात खुराडा पाऊसपाण्याशी सामना करत आहे त्या ठिकाणीच भग्नावस्थेत उभे आहे.

रिक्षावाल्यांची स्वयंघोषित नो एंट्री
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे स्टेशनला सुरू असलेल्या सॅटिसच्या कामामुळे प्रवाशांचे हाल सुरू असताना रिक्षावाल्यांच्या मुजोरपणामुळे प्रवाशांना आणखी त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. संध्याकाळी लोकलच्या गर्दीतून दमूनभागून आल्यावर लवकर रिक्षा पकडून घरी जायचे म्हटले की, रिक्षा मिळणे म्हणजे कठीण काम असते. ठाणे स्टेशन फलाट एककडून रिक्षा पकडायला आलेल्या प्रवाशांना सध्या रिक्षावाल्यांच्या असहकाराचा फटका बसत आहे.

परदेशी भाषा प्रशिक्षण अभ्यासक्रम; प्रमाणपत्रे वितरित
ठाणे/ प्रतिनिधी: येथील विद्या प्रसारक मंडळ संस्थेने उन्हाळी सुट्टीत आयोजित केलेला परदेशी भाषा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अलिकडेच संस्थेच्या सभागृहात आयोजित एका समारंभात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. संस्थेने यंदा परदेशी अभ्यास केंद्राची स्थापना करून त्याअंतर्गत फ्रेंच, जर्मन, आणि जपानी भाषेचे अभ्यासवर्ग भरविले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यानंतर या तिन्ही भाषेच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपण नुकत्याच शिकलेल्या भाषेत हे कार्यक्रम सादर केले हे विशेष. त्याचबरोबर त्यांनी त्या भाषेतील काही गाणीही सादर केली. एका फ्रेंच गाण्यावरील नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.