Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माहिती अधिकाराच्या नावाखाली..
वार्ताहर / अमळनेर

 

माहितीच्या अधिकारामुळे शासकीय कामकाजात पारदर्शीपणा आला असला तरी या अधिकारान्वये कोण, कसली माहिती मागवेल, याचा भरवसा राहिलेला नाही. काही अर्जदारांकडून मागितलेल्या माहितीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोक्याला नाहक ताप होत आहे. अर्जदाराने शासकीय विषयांविषयी माहिती मागितली तर ते समजू शकते. परंतु भुसावळ तालुक्यातील साकेगावच्या एका अर्जदाराने मागितलेली माहिती मोठी गंमतीशीर असून ही माहिती द्यावी की नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
शासकीय कर्मचाऱ्याने विवाह नोंद केली आहे का, नसल्यास त्याचे कारण काय, त्यांचा खासगी भ्रमणध्वनी कोणता, शिक्षण, वय, जन्मतारीख काय, या वर्षांत सुटय़ा घेण्याचे कारण काय, अशी माहिती मागण्यात आली आहे. ही माहिती एकाच अधिकाऱ्याकडून मागितली आहे, असे नव्हे तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून थेट सर्व अधिकारी, कर्मचारी, पंचायत समित्यांचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य सेविका, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी मदतनीस, शिक्षणाधिकारी, तहसीलदार, कोतवाल, ग्रामसेवकांपर्यंत सर्वाची व्यक्तिगत स्वरुपात माहिती साकेगावच्या प्रमोद नाना पाटील या दारिद्रय़रेषेखालील अर्जदाराने मागितली आहे.
या अर्जाने सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची करमणूक होत असली तरी अशा प्रकारचे विनाकारण त्रास देणारे अनेक अर्ज येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तरुणाचा माहिती मागण्याचा उद्देश कोणताही असला तरी अशा ट्रकभर कागदे गोळा करणाऱ्या अर्जानी शासकीय अधिकारी नाकीनऊ आले आहेत. शासकीय कार्यालयात अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक महिला आहेत. आजकाल प्रत्येकाकडे खासगी भ्रमणध्वनी असतात, तेव्हा त्यांचा खासगी भ्रमणध्वनी क्रमांक मागण्याचे कारण काय? विवाहाची नोंद केली आहे की नाही, या प्रश्नाचा संबंध शासकीय बाबीशी कसा जोडणार? माहिती मागण्याचे प्रयोजन न देता अशा कामांमध्ये वेळ आणि श्रम वाया जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण जिल्हाभरात प्रत्येक कर्मचाऱ्याने अशी माहिती दिली तरी सुमारे दोन लाखापर्यंत अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या जाईल. विशेष म्हणजे अर्जदाराने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वहस्ते लेखी स्वरुपात माहिती मागितली आहे.