Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कल्पक!

 

इंजिनिअर झाल्यावर परदेशी जाण्याचा ‘ट्रेंड’ नजरेआड करत मुंबईहून नाशिकच्या दिशेने, म्हणजे प्रवाहाविरुद्ध जाणे पसंत करणाऱ्या राजेंद्र बागवे यांनी आपल्या दोघा भागीदारांच्या साथीने स्वत:च्या उद्योगाला वैश्विक परीघ तर प्राप्त करून दिलाच, पण केवळ ‘बिझनेस माइंडेड’ न राहता, नवउद्योजकांच्या अंतरंगात सकारात्मक तरंग उमटविणारी एक समर्थ चळवळ उभी करीत पुरेपूर सामाजिक भानही बाळगले आहे, हे विशेष. ‘टिचिंग-लर्निग कम्युनिटी’ अथवा ‘टीएलसी’च्या माध्यमातून त्यांनी जन्माला घातलेली ही अभासी चळवळ उद्योगविश्वात गुणाकाराने फोफावत असून आजमितीस तब्बल १३५ कंपन्या टीएलसीशी संलग्न झाल्या आहेत. एकीकडे उद्योगांच्या भरभराटीवर लक्ष केंद्रीत करताना दुसरीकडे बागवे यांनी कामगारांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य दिल्यानेच आजवर त्यांच्या उद्योगात युनियन लावण्याचा विचारही कामगारांच्या मनाला शिवलेला नाही. कामगारांमध्ये परस्पर समन्वय राखण्यासाठी ‘पंचायत’ स्थापण्याचे पाऊल असो की प्रत्येक मशीनची प्रति मिनिटाची किंमत काढण्याचे गुणोत्तर असो.. अशा अभिनव कल्पनांचे बीज रुजते, ते बागवेंच्या विचारविश्वातच!
मूळ मुंबईकर असणाऱ्या बागवेंचे वडील भविष्य निर्वाह निधी विभागात व्यवस्थापक असल्याने दक्षिण मुंबईच्या संमिश्र वातावरणात राजेंद्र यांचे बालपण गेले. बारावीला चांगले गुण मिळविल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. व्ही.जे.टी.आय.मध्ये शिकत असताना त्यांची देवेंद्र बापट आणि अमोल चिटणीस यांच्याशी चांगली गट्टी जमली. शेवटच्या वर्षांला असताना कँपस इंटरव्ह्य़ूमध्येच या सगळ्यांना नोकरीची चांगली संधी मिळाली. महिंद्र अँड महिंद्रच्या मुंबईतील प्रकल्पात बागवेंची निवड झाली. दोन वर्षांनी कंपनीने त्यांची नाशिकला बदली केली, तेव्हा खरे तर अनेकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. त्या काळात इंजिनिअर झाल्यावर परदेशी जाण्याची लाट असताना मुंबईतून उलट नाशकात येणे म्हणजे उरफाटा प्रकार होता. पण, बागवे यांनी नाशिकला जाण्याचा निर्णय घेतला. त्याला आणखी एक कारण होते, काही दिवसांपूर्वीच, म्हणजे १९८२ साली बापट आणि चिटणीस यांच्यासह त्यांनी नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत भविष्यात स्वत:चा उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने भूखंड घेऊन ठेवला होता. आपापल्या पगारातून वाचवलेले प्रत्येकी सहा हजार याप्रमाणे तिघांनी मिळून अठरा हजारात घेतलेल्या या भूखंडावर ठराविक कालमर्यादेत उद्योग उभारणीची नोटीस एमआयडिसी कडून योगायोगाने याच सुमारास प्राप्त झाली होती. त्यामुळे महिंद्रच्या नाशिक प्रकल्पात रुजू व्हायचे त्यांनी ठरविले. दुसरीकडे उद्योग उभारणीसाठीही त्यांची धडपड सुरू होती. पण, नेमके कसले उत्पादन घ्यावे, त्याचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत काहीच स्पष्टता नसल्याने तिघेही काहीसे चाचपडत होते. ऑटोमोटिव्ह क्षेत्र असल्यामुळे यामध्येच काहितरी करावे, असा विचार झाला आणि बागवेंनी आपल्या काही वरिष्ठांना तो बोलून दाखवला. वाहनांच्या चेसीज्चा शिटमेटलचा भाग मिहद्र ‘आऊटसोर्स’ करण्यास तयार असल्याचे चर्चेतून समजले व त्यानुसार त्यांनी प्रकल्प उभारणीला प्रारंभ केला. प्राथमिक भांडवल म्हणून एमएसएफसी कडून दोन लाखाचे कर्ज घेतले. तिघांनी मिळून आणखी लाखभर रुपये उभे केले आणि ‘रिलाएबल’ची स्थापना झाली. सुरुवातीला अनेक टक्के-टोणपे खाल्ल्यावर जरा जम बसू लागल्याचे पाहून त्यांनी ‘व्हिजन’वर लक्ष केंद्रीत करत १९९२ मध्ये ८० लाखाच्या उलाढालीचे उद्दीष्ट बाळगले. ते राखण्यासाठी आजवरच्या प्रवासातले अनुभव आणि ‘सेल्फ लर्निग’वर बागवेंचा सर्वाधिक भर होता. त्याबरोबरच आय.एस.ओ. मानांकन असो की संगणकीकरण, आधुनिकतेच्या अंगीकारातही त्यांचे प्रथम पाऊल असायचे.
या तिघा नवउद्योजकांची धडपड आणि अल्पावधीत मारलेली भरारी पाहून अनेकजण त्यांना प्रोत्साहन द्यायचे. अभय कुलकर्णीसारखी मित्रमंडळी वेळोवेळी मदतीचा हात पुढे करायची. त्या जोडीला उत्कृष्ट दर्जा आणि कुशल व्यवस्थापन या बळावर त्यांनी कंपनीचा ‘ग्रोथ रेट’ प्रचंड वाढवला. प्रगतीबरोबरच कंपनीचा व्याप वाढणे ओघाने आलेच. त्यामुळे कामगारांची संख्या शेकडोंच्या घरात गेली. पण, आजवर ‘रिलाएबल’च्या कामगारांना कधी युनियनची गरज भासलेली नाही. ‘तुमच्याकडे कामासाठी येणारा कोणताही माणूस केवळ दोन हात घेऊन येत नाही तर एक डोकेही घेऊन येतो, त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याची संधी दिली गेल्यास सर्वाचाच फायदा होतो’, हे बागवेंचे गृहितक त्यासाठी कारणीभूत आहे. ‘कैझन मूव्हमेंट’च्या तत्वानुसार ते कामगारांकडून सतत सूचना मागवत असतात. त्यातून वर्षांकाठी त्यांच्याकडे जवळपास सहा हजार ‘आयडिया’ येतात. पडताळणीअंती योग्य वाटतील त्या अंमलात आणल्यास त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रचंड लाभ होत असल्याचा बागवेंचा अनुभव आहे. जसे, त्यांच्या कंपनीत वेल्डिंग रोबोज् आहेत, पण ते केवळ मोठय़ा कामांनाच परवडू शकतात. इतर कामांना त्यांचा वापर करायचे ठरल्यास त्यावर मोठा खर्च होतो, हे लक्षात घेऊन तेथील कामगारांनीच ‘लो कॉस्ट ऑटोमेशन’च्या आधारे काही यंत्रे विकसित केली. त्यामुळे लहान-सहान कामांसाठी रोबोचा वापर टळतो आणि वेळ तसेच पैशाचीही बचत होते. ‘वेस्ट मॅनेजमेंट’ बाबतही तसेच आहे. स्टेशनरी असो की ऑईल कुठल्या कामासाठी ते नेमके किती लागायला हवे आणि त्यात बचत कशी करता येईल, यासाठी ते वापरकर्त्यांचाच सल्ला घेतात. त्यामुळे आपसूकच कामगारांची भावनिक, बौद्धिक गुंतवणूक वाढत जाते आणि आपलेच काम समजून ते त्याच्याशी समरस होऊन जातात. असे असले तरी एवढी माणसे एकत्र आल्यावर कुठे ना कुठे मतमतांतरे असणारच. हे लक्षात घेऊन बागवेंनी कामगारांचे वेगवेगळे गट तयार केले व त्या माध्यमातून कामगार पंचायती निर्माण केल्या. गाव पंचायतीच्या धर्तीवर या ‘सेल्स पंचायती’ परस्परांमधील मतभेद मिटवून समन्वय राखण्याचे काम प्रभावीपणे करीत आहेत. कामगारांना ते काही ‘टार्गेट’ देत नाहीत, पण प्रत्येक यंत्राची प्रति मिनिटाची किंमत काय आहे, त्याचा तक्ता त्यांनी यंत्रावर लावला आहे. त्यामुळे वेळ किती मोलाचा आहे, त्याची जाणीव कामगारांना होते आणि ते दररोज आदल्या दिवशीपेक्षा अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात!
अल्पावधीतली ‘रिलाएबल’ची प्रगती पाहून अनेक नवउद्योजक अथवा उद्योग क्षेत्रात असणाऱ्या त्यांच्या मित्रमंडळींची पुढची पिढी सल्लामसलत, मार्गदर्शनासाठी बागवेंकडे येऊ लागली. उद्योग उभारणीत किती अडचणी असतात, व्यवस्थापनात कोणत्या समस्या असतात ते बागवेंनी स्वत: अनुभवले असल्यामुळे ते सगळ्यांना खुलेपणाने मार्गदर्शन करीत. त्यामुळे हळूहळू त्यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली अन् त्यातूनच ‘टीचिंग लर्निग कम्युनिटी’ (टीएलसी)या अभिनव संकल्पनेचा जन्म झाला. प्रत्येकजण कायम शिकतच असतो, हे लक्षात घेता ‘लर्निग बाय टीचिंग’ या सूत्रानुसार चार वर्षांपूर्वी त्यांनी टीएलसीसाठी पंधरा जणांची टीम निवडली. व्यवसाय कोणताही असो त्याच्या ‘कोअर व्हॅल्यूज्’ काय, त्या कशा ओळखायच्या, उद्दीष्टय़े काय ठेवायची, त्यासाठी दूरदृष्टी कशी राखायची, जागतिक परिमाणे लक्षात घेऊन ‘बिझनेस एक्सेलन्स’ कसा मिळवायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे करताना सामाजिक बांधिलकी कशी जोपासायची या मूलाधारांवर टिएलसीचे काम चालते. प्रत्येकाने या बाबींची अगोदर स्वत: अंमलबजावणी करून अनुभव घ्यावा, त्यातील बऱ्या-वाईटाची इतरांसोबत चर्चा करावी व आपल्यासोबत आणखी पाच उद्योजकांना या माध्यमातून जाणते करावे, अशी टीएलसीची ढोबळमानाने कार्यपद्धती आहे. त्यासाठी बागवे आठवडय़ाकाठी किमान चार तास देतात. अलीकडे तर सी. ए., प्रकाशक अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळीही या कम्युनिटीत सहभागी होऊ लागली आहेत. टीएलसीमुळे व्यवस्थापनात होणारा लाभ बघता कंपन्या गुणाकाराच्या पटीने त्यांच्याशी संलग्न होत आहेत. नाशिकसह पुणे, सांगली, कोल्हापूर आदि ठिकाणच्या १३५ कंपन्यांचे संचालक आजमितीस टीएलसीमध्ये समाविष्ट असून येत्या पाच वर्षांत अशाप्रकारे एक हजार कंपन्यांचा संघ निर्माण करण्याचा बागवेंचा मानस आहे. या कामासाठी कुणीही कोणताही मोबदला घेत नाही. विशेष म्हणजे, टीएलसीला एखाद्या संस्थेप्रमाणे मूर्त रूप देण्याऐवजी बागवेंनी त्याचे स्वरूप अभासी ठेवले आहे. कारण, एक चळवळ म्हणून ते त्याकडे पाहतात. मूर्त स्वरुप द्यायचे म्हटल्यावर अनेक मर्यादा येतात, निश्चित तत्वे-उद्दीष्टय़े आखावी लागतात, जागा निश्चित असावी लागते, जमा-खर्चाचे हिशेब ठेवावे लागतात, वेळोवेळी ते सादर करावे लागतात, एकूणातच कारकुनी बाबींमध्ये शक्ती खर्च होते, असा बागवे यांचा त्यामागचा दृष्टिकोन आहे. शिवाय, कुणाचा कसलाही स्वार्थ नसल्याने विश्वास-अविश्वास, इगो या बाबीही आपोआपच दूर राहतात. टीएलसीचा मूळ उद्देश प्रगतीच्या मार्गात अडकलेला बोळा काढणे हा आहे आणि तो साध्य होत असेल तर बाकीच्या बाबी अनावश्यक असल्याचे बागवे यांचे मत आहे. केवळ व्यवसाय एके व्यवसाय नाही तर टीएलसीमध्ये सामाजिक भान देखील आहे. त्यामुळेच ज्ञानप्रबोधिनी, आधारतीर्थ अशा अनेक सेवाभावी संस्थांना मदतीचा हात देण्यासाठी ही मंडळी वेळोवेळी स्वत:च्या खिशात हात घालतात. अर्थात, आपला व्यवसाय चोख सांभाळूनच बागवे हे सारे करतात. बापट आणि चिटणीस यांच्या साथीने आज ‘रिलाएबल’चा व्याप प्रचंड वाढला आहे. पुण्याजवळच्या चाकण येथे अलीकडेच कंपनीचा नवा मोठा प्रकल्प सुरू झाला आहे. रिलाएबलच्या उत्पादनापैकी निर्यातीचा वाटा तब्बल ३५ टक्के आहे आणि निर्यात देखील विकसित देशांमध्ये होते, हे आवर्जून नमूद करायला हवे. जर्मनी, स्पेन, स्वीडन आदी देशांमध्ये रिलाएबलची ‘वेअर हाऊस’ आहेत आणि अमेरिकेत तर कार्यालयही आहे. ही सगळी जबाबदारी पेलताना आपल्याप्रमाणेच इतरांना आणि विशेषत: नवउद्योजकांना मजल मारणे शक्य व्हावे याच जाणीवेतून बागवे टीएलसीसाठी वेळात वेळ काढतात. टीएलसीच्या माध्यमातून होणारी गुणवत्ता वाढ व व्यवसाय विस्तार याद्वारे येत्या काळात सरकारच्या तिजोरीत किमान २,५०० कोटीच्या कराची भर घातली जावी आणि ७५ हजार रोजगार उपलब्ध व्हावेत, असा ‘स्मार्ट सोशल अ‍ॅस्पेक्ट’ बाळगणाऱ्या बागवेंच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढी कमीच ठरेल..