Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सटाणा शहरासह ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी
सटाणा / वार्ताहर

 

ग्रामीण भागात व सटाणा शहरातही अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून क्षमतेपेक्षा जास्त संख्येने प्रवाशांना वाहनात बसविणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. विलास बच्छाव यांनी केली आहे.
या संदर्भात डॉ. बच्छाव यांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय पाटील व उपअधीक्षक रंजन शर्मा यांच्याशी चर्चा केली. ताहाराबादजवळील अपघातात चार बालकांना प्राण गमवावा लागला. अ‍ॅपेरिक्षातून किती विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी आहे, नियमानुसार रिक्षाचालक प्रवासी बसवतात का, याकडे पोलीस खाते सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहे, असे बच्छाव यांनी सांगितले. विंचूर-प्रकाशा राज्य मार्ग मृत्यूचा सापळा झाला असून आजपर्यंत या मार्गावर अनेक मोठे अपघात झाले आहेत. अपघातास भरधाव वाहनांप्रमाणेच रिक्षा व जीपमधून क्षमतेपेक्षा अधिक होणारी वाहतूकही जबाबदार आहे. मात्र पोलीस या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. नियम मोडणाऱ्या रिक्षा व जीप चालकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणीही बच्छाव यांनी केली आहे.
सटाण्यातील रिक्षाचालक थोडी तरी शिस्त पाळतात, मात्र त्यांना गणवेश नाही, रिक्षाचालक कोण आणि प्रवासी कोण हे त्यामुळे ओळखू येत नाही. रिक्षाचालकास गणवेश व त्याचा बिल्ला लावणे सक्तीचे केले पाहिजे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा ताहाराबाद रोडवर तर ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर जीप रांगा लावून उभ्या असतात. वर्दळीच्या ठिकाणी टॅक्सी स्टँड आहे. शिवाजी पुतळ्याजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. जनतेला पायी चालणेही मुश्कील होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कधी प्रयत्नच करीत नसल्याचा आरोप बच्छाव यांनी यावेळी केला.