Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ?
देवेंद्र गावंडे. चंद्रपूर, २४ जून

येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने राज्यातील २६ जिल्हा परिषदांमधील

 

अध्यक्षपदाची निवडणूक तीन अथवा सहा महिने पुढे ढकलण्याच्या प्रस्तावावर राज्यातील आघाडी सरकार गंभीरपणे विचार करीत असून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत.
राज्यातील ३३ पैकी २६ जिल्हा परिषदांमधील अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची मुदत येत्या २१ सप्टेंबरला संपणार आहे. मार्च २००७ ला निवडणुका होऊन हे पदाधिकारी सत्तेवर आले होते. या सर्वाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत असल्याने याच महिन्यात जिल्हा परिषदेत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. याच काळात राज्यातील विधानसभेच्या निवडणुकासुद्धा होणार आहे. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचा कार्यकाळ येत्या ४ नोव्हेंबपर्यंत आहे. त्याआधी म्हणजे साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात निवडणुका होतील, अशा अपेक्षेत सारे राजकीय वर्तुळ आहे. हा कालावधी लक्षात घेतला तर सप्टेंबर महिन्यात निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेऊन राजकीय शक्तिप्रदर्शनात वेळ घालवण्यापेक्षा विद्यमान अध्यक्षांना तीन किंवा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेस व राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ मंत्र्यांनी समोर आणला आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या निवडणुका येत असतील तर त्या पुढे ढकलणेच इष्ट ठरेल, असे कोल्हापूर येथे बोलताना मोहिते पाटील यांनी सांगितल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिकांमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी काही आमदारांनी नुकत्याच संपलेल्या अधिवेशन काळात केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ त्यासाठी अनुकूलसुद्धा होते. मात्र, जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी ठाम विरोध केल्यामुळेच हा प्रस्ताव बारगळला व या निवडणुका वेळेत घ्याव्या लागल्या. या पाश्र्वभूमीवर आता राष्ट्रवादीचेच वर्तुळ जिल्हा परिषद अध्यक्षांना मुदतवाढ देण्यासाठी आग्रह धरत आहे.
राज्यातील २६ पैकी ११ जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा तर दहा जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादीचा झेंडा आहे. वेळेत निवडणूक झाली तर प्रत्येक ठिकाणी सत्तांतराच्या ओघात राजकीय समीकरणे बदलू शकतात. शिवाय अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वादही निर्माण होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांमधील कटुता टाळण्यासाठी मुदतवाढीचा पर्याय योग्य आहे, असे मत सत्ताधारी आघाडीच्या वर्तुळात व्यक्त केले जात आहे. येत्या जुलैच्या पहिल्या आठवडय़ात यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळू लागले आहेत.