Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेळघाटात पर्यटकांची निराशा
अमरावती, २४ जून / प्रतिनिधी

 

मेळघाटात पाऊस नसल्याने पर्यटनावर परिणाम झाला आहे. पहिल्या पावसानंतर मेळघाटात पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक धाव घेतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने पर्यटकांचाही निरस झाला आहे.
धारणी आणि चिखलदरा या मेळघाटातील दोन तालुक्यांची जून ते सप्टेबर या चार महिन्यांच्या कालावधीतील पावसाची सरासरी अनुक्रमे ११७२ आणि १५२६ मिलीमीटर एवढी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस याच तालुक्यांमध्ये पडतो. यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे.
गेल्या दहा वर्षात मान्सूनच्या पावसाचे आगमन लांबण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या सुरवातीला पावसाची हजेरी लागते. पावसाचा खंड पडण्याचे दिवस कमी अधिक दिसून येतात पण, जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंतही पाऊस न होणे ही बाब शेती नियोजनासोबतच पेयजल व्यवस्थेवरही परिणाम करणारी ठरली आहे.
मृग नक्षत्र संपूनही पाऊस न आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसात पाऊस झाला असला तरी तो पेरणीयोग्य नाही. जलस्त्रोत आटत चालले असताना पावसाचे आगमन लांबणे ही बाब धोकादायक मानली जात आहे.
जिल्ह्याची जून महिन्याची पावसाची सरासरी १४६ मिलीमीटर एवढी असून आतापर्यंत केवळ ७.६ मिलीमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये तर पावसाचा टिप्पूसही आलेला नाही. जिल्ह्यात गेल्या वर्षी २३ जूनअखेर ५५.२ मिलीमीटर म्हणजे जून महिन्याच्या सरासरीच्या ३७.८ टक्के नोंद झाली होती. यंदा मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असून जिल्ह्यात केवळ सरासरी ५.२ टक्केच पाऊस झाला आहे.