Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विकासाचा झंझावात
देवेंद्र गावंडे

दहा वर्षात चिमूरचा कायापालट घडवून आणणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघावरील पकड आणखी घट्ट केली आहे. कोटय़वधींची विकास कामे हे वडेट्टीवारांचे वैशिष्टय़ आहे.
मतदारसंघातील लोकांच्या अडचणी ओळखून त्यांच्याकरिता मोफत चष्मे वाटप, शेतकऱ्यांकरिता विम्याची योजना, भूमिपुत्रांसाठी पुस्तके, अपंगासाठी सायकल तर विधवा व परित्यक्त्यांना शिलाई मशीनचे वाटप करून प्रत्येक वेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मदतीचा हात समोर केला आहे. भाऊंची स्वारी मुंबईला असली तरी चिमूर विधानसभा मतदारसंघात कुणाचे घर जळाले, कुणावर वीज पडली, कुणी आत्महत्या केली अशी बातमी मिळाली तरी ते लागलीच परत येऊन त्या घरापर्यंत सढळ हाताने मदत करतात. त्यामुळे मतदारसंघातील विकास कामासोबतच दु:खीतांचे अश्रू पुसणारा लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा विजय वडेट्टीवार यांची आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात आणणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी माजी राज्यमंत्री मारोतराव कोवासे यांना उमेदवारी मिळवून दिली.

 

प्रचाराची संपूर्ण जबाबदारी स्वत:वर घेऊन उमेदवार निवडून आणला. चिमूर विधानसभा मतदारसंघासोबतच संपूर्ण चंद्रपूर जिल्हय़ात काँग्रेस बळकट करण्यासाठी सतत जुन्या नव्यांच्या संपर्कात राहून पक्ष संघटन करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. त्यांनी चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोनदा विजयाची पताका फडकावली. चिमूर विधानसभा मतदारसंघात एकूण ६६ कोटीची ९६ कामे खेचून आणली असून २ कोटी ६४ लाख रुपयांची तहसील कार्यालयाची इमारत, ६८ लाख रुपयांची आयटीआयची इमारत आणि चिमूर येथे फिल्टर प्लॅन्टची सुविधा मिळवून दिली आहे. यासोबतच ७८ कोटीची रस्ते आणि पुलांची कामे चिमूर मतदारसंघात पूर्णत्वास आली आहे. तालुक्यात डांबराचे ३ ते ४ टक्के रस्ते होते. परंतु, आता विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते तयार झालेले आहे. ११० कोटी रुपये खर्चाचे गोसीखुर्द कालव्याचे काम सुरू असून शंकरपूर परिसरातील २८ गावांना त्याचा फायदा होणार आहे. चिमूर तालुक्यात सिंचन व्यवस्थेची कामे पूर्ण व्हावी म्हणून गोसीखुर्द मोखाबर्डीचे पाणी चिमूरला मिळणार आहे. त्याकरिता ६०० कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे टेंडरदेखील निघालेले आहे. जांभूळघाट, कवठाळा, चिमूर कॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील ७० टक्के शेती भविष्यात सिंचनाखाली येत आहे. गोसीखुर्दला जोडून असलेल्या अंभोरा उपसा जलसिंचन योजनेचे कामही आता सुरू झाले असून यामुळे भिसी परिसरातील २५ हजार हेक्टर शेतजमिनीला येत्या काही वर्षात सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात औद्योगिकीकरणाला चालना मिळावी आणि तालुक्यात सिंचनाची व्यवस्था मोठय़ा प्रमाणात उपलब्ध व्हावीत म्हणून ८३० शेततळय़ांना मंजुरी दिली आहे. चिमूर-सिंदेवाही भागातील रस्ते द्विविभागणीची कामे करण्यात आली असून ९ कोल्हापुरी बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली आहे. चिमूर शहरातील मुख्य मार्गाचे रस्ते द्विविभाजन करण्यात आले असून त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडलेली आहे. सोबतच सातनाल्याच्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चिमूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवण्याची भाषा करणारे विजय वडेट्टीवार यांनी चिमूरची बारामती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विडा उचलला आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या नावामध्येच विजय असला तरी निवडणूक कोणतीही असो, ती जिंकण्यासाठी त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा चाललेली असते. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्न गडचिरोली कृषी महाविद्यालय, गडचिरोली मंजूर झाली आहे. काम्पा चिमूर व्हाया वरोरा रेल्वे मार्ग तयार करून चिमूर रेल्वेमार्गाशी जोडले जावे. हे त्यांचे स्वप्न असून चिमूरला भविष्यात औद्योगिक बाजारपेठ निर्माण व्हावी ही त्यांची मनीषा आहे. चिमूर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावित असून चिमूर पॉलिटेक्निक कॉलेजची निर्मिती करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. चिमूर येथे न्यायालयाचा इमारतीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
मार्गी लागलेली कामे
मार्गी लागलेली कामे
तहसील कार्यालय इमारत
आयटीआय इमारत
चिमूर येथे फिल्टर प्लॅन्ट
गोसीखुर्द कालवा
७८ कोटीची रस्ते पुलाची कामे
८३० शेततळे मंजुरी
चिमूर रस्ता द्विभाजन तथा सौंदर्यीकरण
९ कोल्हापुरी बंधारे निर्मिती
नेरी व भिसी येथे ३३ के.व्ही. पॉवरस्टेशन
अपूर्ण राहिलेली कामे
चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालय
न्यायालय इमारतींचा प्रश्न
गोसीखुर्द मोखाबर्डी प्रकल्प कालवा
चिमूर येथे कृषी महाविद्यालय
काम्पा वरोरा रेल्वेमार्ग
चिमूर पॉलिटेक्निकल कॉलेजची निर्मिती
चिमूर येथे पत्रकार भवन
वाढत्या शहराच्या दृष्टीने अतिरिक्त नळयोजना
चिमूर जिल्हा निर्मिती
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
कृषी औद्योगिक प्रकल्पाची नितांत आवश्यकता
उषा नदीच्या पुरापासून चिमूर शहराचे संरक्षण
अंबिका पॉवर प्लॉन्टच्या दूषित पाण्याचा बंदोबस्त
सातनाल्याचे पाणी गावात येऊ नये म्हणून संरक्षण भिंत
ताडोबा व्याघ्र प्रकल्पग्रस्त झरी, रामदेगी, बामणी, अलिझंजा या गावाचे पुनर्वसन
वचननामा - चिमूर विधानसभा मतदारसंघात मी पुन्हा भरघोस मतांनी निवडून येणार असा वड्डेटीवारांचा विश्वास असून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याला त्यांचे प्रश्नधान्य राहील.