Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भात शाळेच्या पहिल्या ठोक्यालाच होणार २ कोटी ८ लाख पुस्तकांचे मोफत वाटप
यवतमाळ, २४ जून / वार्ताहर

शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला नागपूर आणि अमरावती विभागातील

 

जवळपास २८ हजार शाळांमध्ये २ कोटी ७ लाख २३ हजार पुस्तकांचे मोफत वाटप विद्यार्थ्यांना होणार आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अनुदानित खाजगी शाळा व जिल्हा परिषदच्या शाळांना एकाच दिवशी सर्व विषयाची पुस्तके वितरित करण्यासाठी नागपूर विभागाचे उपशिक्षण संचालक गोविंद नांदेडे आणि अमरावती विभागाचे लक्ष्मीकांत पांडे यांनी विभागातील अनुक्रमे सहा आणि पाच अशा एकूण अकरा ही जिल्ह्य़ांमध्ये पुस्तके पोहोचलीत किंवा नाही याचा आढावा घेतला असता दोन्ही विभागात पुस्तके पोहोचल्याची त्यांची खात्री झाली असल्याचे या दोन्ही उपसंचालकांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
दोन्ही विभागात साधारणत: २८ लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबरच गणवेशसुद्धा पुरवला जाणार आहे.
मुलांना मोफत वाटायची पुस्तके प्रत्येक जिल्ह्य़ात व प्रत्येक पात्र शाळेत पोहोचून देण्याची व्यवस्था सुद्धा झालेली आहे. आठवीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यासाठी संबंधित शिक्षकांचे राज्यभर प्रशिक्षण सुद्धा बुधवारी आटोपले आहे. नऊ दिवसांचे शिक्षकांचे प्रशिक्षण भर उन्हात सुट्टीच्या काळात झाले आणि शिक्षकांनी-शिक्षिकांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिल्याचा अनुभव यावेळी आला आहे.
नागपुरात २५ जूनला शालेय शिक्षण विभागातर्फे उपसंचालक गोविंद नांदेडे यांच्या पुढाकाराने दोन हजार लोकांचा समावेश असलेली जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. त्यात शिक्षण विभागातील सर्व घटकांसह पालकांचाही समावेश राहणार आहे. यंदापासून तर शालेय अभ्यासक्रमाबरोबरच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी आठवीपासूनच केली जाणार आहे व त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाल्याचाही शिक्षण विभागाचा दावा आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेत नागपूर आणि अमरावती विभागांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजयकुमार तसेच माजी शिक्षणमंत्री प्रश्न. वसंत पुरके यांनी नागपूर व अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अनुक्रम गोविंद नांदेडे व लक्ष्मीकांत पांडे यांचा गौरव केला आहे.