Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेसच्या चार फेऱ्या धावणार
रविवारी पहिली गाडी
खामगाव, २४ जून / वार्ताहर

खामगाव येथून यावर्षी पंढरपूरकरिता श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसच्या चार फे ऱ्या धावणार आहेत.

 

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे.
यावर्षी आषाढी एकादशी ३ जुलै रोजी येत आहे. खामगाव येथून गेल्या पाच वर्षापासून पंढरपूरकरिता थेट रेल्वेगाडी सोडण्यात येते. पहिल्या दोन वर्षी एकच फेरी होती. त्यानंतर मिळालेला भाविकांचा प्रतिसाद व रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या मागणीनुसार मागील वर्षी तीन तर यावर्षी चार गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२८ जून, २९ जून, १ व २ जुलै या दिवशी सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी विठ्ठल दर्शन एक्सप्रेस खामगाव रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे. तर २९ जून, ३० जून, ३ जुलै व ७ जुलै या दिवशी पंढरपुरातून परतीचा प्रवास ही गाडी करेल. या गाडीचे प्रवासी भाडे १३७ रुपये आहे. तर ज्येष्ठ नागरिक ९७ रुपये, ज्येष्ठ महिला ७० रुपये, मुले ७० रुपये असे भाडे आकारल्या जाईल. ही गाडी एक्सप्रेस दर्जाची असून नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, मनमाड आदी प्रमुख स्थानकावर थांबणार आहे.
या गाडीची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर भिसे, उमाकांत कांडेकर, सुरेश काळे, बजरंग राजपुत, पांडुरंग घोपे आदींनी लावून धरली होता. यावर्षी अद्यापपर्यंत चांगला पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. त्यामुळे पंढरपूरकरिता जाण्यास तो उदास दिसत आहे. एस.टी. महामंडळानेही यावर्षी तुलनेपेक्षा कमीच बसगाडय़ाचे नियोजन केले आहे. रेल्वेने मात्र एक गाडी जास्त सोडण्याचे ठरविले आहे. ही गाडी ९ डब्यांची असून या गाडीला जलंब येथे अमरावती वरून येणाऱ्या ९ डब्याची गाडी जोडल्या जाऊन अखंड १८ डब्यांची गाडी पंढरपूरला जाणार आहे.