Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा
गोंदिया, २४ जून / वार्ताहर

येथील प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलासाठी जमिनीच्या अधिग्रहणामध्ये नऊ कुटुंबीयांवर

 

लटकलेली अधिग्रहणाची टांगती तलवार अखेर हटली आहे.
आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मध्यस्थी करून १५ एकरऐवजी १४ एकर जागेत क्रीडा संकुल बनविण्याची संमती क्रीडामंत्री दिलीप देशमुख यांच्याकडून मिळविल्याने आठ कुटुंबीयांची अधिग्रहणाच्या कार्यवाहीतून मुक्तता झाली आहे. एक कुटुंबाच्या जमिनीचे मात्र अधिग्रहण होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुलासाठी १५ एकर जमिनीची आवश्यकता होती. यामध्ये मरारटोली परिसरातील नऊ कुटुंबीयांच्या घराचे अधिग्रहण याकरिता करण्यात येणार होते. यासंदर्भात सन २००३ मध्ये नगरपालिकेने सर्व औपचारिकता पूर्ण केली होती. या घरांचा ताबा घेऊन ते पाडणे शिल्लक होते.
शालिकराम मलगाम, हेमराज बिसेन, अनिल धमगाये, मीरा कुंभलवार, भूषण भगत, नीलेश्वरी चव्हाण, टापेश्वरी पटले, वीणा अगळे, श्यामराव सूर्यवंशी, संतोष भगत या कुटुंबीयांच्या घरावर अधिग्रहणाची पाळी आली होती.
या कुटुंबीयांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन परिस्थितीची त्यांना माहिती दिली. आमदार अग्रवाल यांनी या प्रकरणी लक्ष घालून राज्याचे क्रीडा व पुनर्वसन मंत्री दिलीप देशमुख यांची भेट घेतली.
गोंदिया जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामासंदर्भात आयोजित सभेत अग्रवाल यांनी त्या आठ कुटुंबीयांच्या स्थितीची मंत्र्यांना जाणीव करवून दिली.
या घरांना वगळण्याची विनंती केली. यावर क्रीडामंत्री देशमुख यांनी कुटुंबीयांच्या घरांची एक एकर जमीन सोडून उर्वरित १४ एकर जमिनीवर क्रीडा संकुल बनविण्याचे निर्देश दिले. या १४ एकर जमिनीच्या अधिग्रहणाची कार्यवाही १५ दिवसांच्या आत करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
जिल्हा क्रीडा समितीची २० जूनला पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केल्याने क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा क्रीडा संकुल आठ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. भूमिअधिग्रहणासाठी ५० लाखांचा निधी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्नप्त झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला संकुल बांधकामाला आरंभ होईल, अशी माहिती आमदार अग्रवाल यांनी दिली.