Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गोंदियात प्रताप ट्रस्टचा महिला मेळावा
गोंदिया, २४ जून / वार्ताहर

महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी संघटित होणे आवश्यक आहे. बचत गटाच्या माध्यमातून

 

महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचे प्रयत्न शासनाने चालविले आहे, असे प्रतिपादन शिक्षण राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांनी येथे केले.
प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट व महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने गुर्जर क्षत्रिय समाजवाडीत महिला मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन पंचबुद्धे यांनी केले. याप्रसंगी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, नगरपालिका अध्यक्षा माया जयस्वाल, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष रजनी नागपुरे, पी.जी. कटरे, सीमा उईके, लक्ष्मी रहांगडाले, नगर परिषद सदस्य शकील मंसुरी, गोपाल एच. अग्रवाल, बबिता कंकटवार, डॉ. भीमराव मेश्राम उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक दृष्टय़ा सक्षम होण्यासाठी उद्योगाकडे वळावे, आतापर्यंत या घटकाकडे दुर्लक्ष झाले. बचत गटांना संघटित करून त्यांना उद्योग देण्याची गरज आहे. बचत गटात पैसा जमा करून त्यांचा वापर करणे हा बचत गटाचा उद्देश नसावा, असे आमदार अग्रवाल म्हणाले.
बचत गट आर्थिकदृष्टय़ा कसे सक्षम करता येईल, अशा व्यवसायाची निवड करून त्यांचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी शासकीय योजना व अनुदानाचा लाभ घ्यावा. बचत गट उद्योगाशी जुळल्यानंतर बाजारपेठ निर्माण करण्याची गरज आहे. महिलांनी आपली लढाई स्वत: लढली. आता आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही अग्रवाल म्हणाले. यावेळी ऐन आपद्ग्रस्त लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले.
आरोग्य विभागातर्फे ‘आशा’ योजनेची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव मेश्राम यांनी दिली. प्रश्नस्ताविक प्रताप मेमोरियल ट्रस्टचे विनय पाटील यांनी केले. ललिता ठोंगसे यांनी आभार मानले.