Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पावसासाठी ग्रामीण भागात भोलेनाथाला साकडे!
दारव्हा, २४ जून / वार्ताहर

आद्र्रा नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस उजाडले. परंतु, पाण्याच्या एक-दोन अतिशय हलक्या

 

सरीशिवाय पाऊस न झाल्यामुळे तालुक्यातील सर्वजनता पाण्यासाठी हवालदिल झाली आहे.
एकतर शेतकऱ्यांनी उधार-पाधार, कर्ज काढून पेरणीची सर्व तयारी केली आहे. परंतु, जो दिवस उजाडतो तो कोरडा त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.
पाणी टंचाईने तर कळस गाठला आहे. जवळपास ७५ हून जादा गावात नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
गुरांच्या वैरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याचे पाणी, गुरांची वैरण, पाणी, पेरणी विलंबाचा खरीप पिकास बसणारा फटका त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती, भाजीपाल्याच्या वाढत्या किंमती अशा समस्येच्या विळख्यात तालुक्यातील जनता अडकली आहे. वरुण राजाने प्रयत्न व्हावे यासाठी ठिकठिकाणी हरिपाठ, भजने, धार्मिक कार्यक्रम सुरू असून दारव्हा शहरातील मल्लिकार्जुन मंदिरात शेकडो भाविकांनी भोलेनाथाचा जलाभिषेक महाआरती केली.
परिसरातील पाणी टंचाई तीव्र झाली असून याबाबत प्रशासनाकडे अनेकदा नागरिकांनी अर्ज आणि विनंत्या करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
भोलेनाथाची आज ना उद्या कृपा होईल. परंतु, गोरगरीब, मागास दुर्बल जनतेसाठी शासनाने ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनेपासून बरेचसे खरे लाभार्थी दूर आहेत. मात्र, आपले जवळचे या योजनेचे लाभ घेत आहेत असे लचके तोडणारे उघडकीस यावे यासाठी तालुक्यातील ज्या-ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे परत सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी जनतेने केली आहे.