Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेस कार्यकर्त्यांना जलपूर्ती सिंचन विहिरींची खैरात
सोमनाथ सावळे, बुलढाणा, २४ जून

रोजगार हमी योजनेंतर्गत जलपूर्ती सिंचन विहीर वाटपांतर्गत काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग

 

करीत आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच विहिरींची खैरात वाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, याहीपेक्षा क्लेशदायक म्हणजे पात्र लाभार्थ्यांना डावलून आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत जलपूर्ती सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम जिल्ह्य़ात राबवण्यात आला. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी खामगाव तालुक्यातील गावनिहाय केलेल्या सर्वेक्षणानुसार सुधारित लक्ष्यांक तसेच तालुकास्तरीय समितीने छाननी केलेल्या पात्र लाभार्थ्यांमध्ये काँग्रेसच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे नातेवाईक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाच भरणा असल्याचे अंतिम निवड यादीतून दिसून येते. खामगाव तालुक्यातील ९९८ अंतिम लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, राजकीय वजन वापरूनच ही यादी जाहीर करण्यात आल्याचा आरोप आहे.
या यादीमध्ये शिरसगाव देशमुख येथील जिल्हा परिषद सदस्य प्रमिला टिकार यांनी स्वत: व परिवारातील दीर, पुतण्या, नातजावाई अशा ५ जणांनी विहिरींचा लाभ घेतला आहे. तर सुटाळा येथील माजी सरपंच जगन्नाथ वानखडे यांनीही या योजनेचा मलिदा लाटला आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संगणक संचालक तोमर व कोकरे यांच्या नातेवाईकांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला असून, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखडे यांच्या मुलाचेही अंतिम यादीत विहिरीसाठी नाव समाविष्ट करण्यात आले आहे. प्रशांत देशमुख यांना दोन विहिरी देण्यात आल्या. त्यामुळे या योजनेत मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाला असून पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात अनेकांनी संताप व्यक्त केला असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीसुद्धा केल्या आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाने जलपूर्ती सिंचन विहिरींची योजना आखली. मात्र, ही योजना राबवताना प्रचंड अनियमितता व गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी येत आहेत. जलपूर्तीच्या वाटपाच्या याद्या आता जाहीर झाल्या असून यामध्ये खरे लाभार्थी कोरडेच असल्याचे दिसत आहे. जमीन एक ठिकाणी लाभ दुसऱ्या ठिकाणी, पती-पत्नी एकत्र नांदत असतानाही दोघांनीही विहिरी, कमी जमीन धारणा असलेल्यांना वगळले तर जास्त जमीन असणाऱ्यांचा समावेश, या आधी विहिरीच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही जलपूर्तीत समावेश तसेच काही ठिकाणी जाणीवपूर्वक जमिनीचे बदललेले क्षेत्रफळ, पटवाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांनाच दिलेला लाभ, अशा अनेक तक्रारी पुराव्यानिशी समोर आल्याने या योजनेच्या निवड यादीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
बिरसिंगपूर येथील शेतकरी संजय फकीरा मुळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत प्रशासनाची अनियमितता समोर आणली आहे. रोजगार हमी योजनेखालील जलपूर्ती सिंचन विहिरीच्या मंजूर यादीमध्ये समावेश करण्यात आलेले दिनकर नारायण वाघ व बापुराव कडुबा मुळे यांची जमीन देऊळघाट क्षेत्रात असतानाही त्यांना बिरसिंगपूरच्या यादीत लाभ देण्यात आला आहे. दिनकर वाघ यांचे बंधू शेषराव वाघ हे स्वत: देऊळघाट येथील पटवारी असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दिनकर वाघ यांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप पुराव्यानिशी संजय मुळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे बापुराव मुळे यांच्या नमुना ‘८ अ’ प्रमाणे २.०१ आर आहे. तरीही संबंधित देऊळघाट येथील तलाठी शेषराव वाघ यांनी मुळे यांची जमीन लाभार्थीच्या यादीमध्ये ‘९० आर’ दाखवली आहे.
वरवंड येथील यादीमध्ये श्यामराव नारायण तायडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्यक्षात श्यामराव तायडे यांना विशेष घटक योजनेंतर्गत यापूर्वीच लाभ देण्यात आला आहे. देऊळघाट येथील १२ शेतकऱ्यांनी जलपूर्ती विहिरीतील अनियमितता व गैरप्रकार समोर आणला आहे. सुरेखा खुशालराव जाधव यांचा विहिरीच्या लाभार्थी यादीमध्ये समावेश आहे, तर त्याच यादीमध्ये खुशालराव सर्जेराव जाधव यांचाही समावेश करण्यात आला आहे. दोघेही पती-पत्नी असून देऊळगाव येथे राहतात. त्यामुळे एकाच कुटुंबात दोघांना मिळालेला लाभ या निवडीमध्ये गैरप्रकार स्पष्ट करीत आहे. कलावती श्रीराम यांच्याकडे ०.८० आर जमीन आहे. सीताराम त्र्यंबक नागपुरे यांच्याकडे ०.८१ आर, दिनकर नारायण वाघ यांच्याकडे ०.८२ आर, फिरोजाबी शे. नईम यांच्याकडे १.७६ आर, अ.रज्जाक अ. सत्तार यांच्याकडे १.८२ आर, खुशालराव सर्जेराव जाधव २.९५ आर, हरि संपत कोथलकर ०.७६, किसन तुकाराम प्रश्नणकर ०.६०, कडुबा सुगदेव जाधव ०.६८, सयमाबी असलम ०.६७ व शे. करीम शे. शहाबुद्दीन यांच्याकडे ०.७९ आर इतकी जमीन आहे.
या सर्वाचा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समावेश असल्याने विहीर मंजूर करताना नियम डावलण्यात आल्याची तक्रार सखाराम जाधव, बिसमिल्ला खाँ, किशवर खाँ, रसुल खाँ, गजनफर उल्लाखान जफरउल्लाखान, शफीकोद्दिन बद्रोद्दिन, प्रकाश भोरसे, वकील खान अमीर खान, नईम खान, अताउल्लाखाँ, प्रशांत देशमुख, गणेशराव जाधव, विश्वनाथ भराड आदींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात सर्व लाभार्थ्यांचे सातबारा व नमुना आठ ‘अ’ प्रमाणे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.