Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत वरुणराजाला साकडे
विलास वानखेडे, कारंजा (घाडगे) २४ जून

अख्खे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांसह त्यावर विसंबून असणारा प्रत्येक घटक हवालदिल

 

झाला आहे. पाऊस पडू दे म्हणण्यासाठी वरुण राजाला साकडे घालणारे गावोगावी भटकताना दिसत आहे. अंगाला निंबाचा पाला गुंडाळून हातात काठी घेऊन धोंडी धोंडी पाणी दे म्हणत कारंजा येथे लोकं फिरत होते.
वरूड तालुक्यातील राजुरा बाजार येथील दहा जणांच्या गटाने धोंडी काढत फेरी मारली. रघुनाथ शिंदे, साहेबराव कुंभारे, देवानंद कुंभारे, राघुराम तांबे, मनीष बागडे, दिलीप कापसे, उमेश धुर्वे, गणेश धुर्वे, रंगराव सातपुते यांच्या धोंडीमध्ये समावेश आहे. पाऊस जर उशिरा आला तर दरवर्षी धोंडी काढून वरुण राजाला साकडे घालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घरोघरी फिरताना अंगावार पाणी टाकायला ते लावतात. सोबत धान्य किंवा पैसाही ते मागताना दिसतात. घरासमोर धोंडी येताच त्यांचे नाचत नाचत गाणे सुरू असते.
धोंडी धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे
धोंडी गेला गावात, पाणी पडे शिवारात
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
असे गीताच्या माध्यमातून वरुण राजाला असे साकडे घालत आहे.