Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महात्मा सहकारी साखर कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्नशील -मेघे
वर्धा, २४ जून / प्रतिनिधी

बंद अवस्थेतील महात्मा सहकारी साखर कारखान्यास परत उर्जितावस्थेत आणण्यासाठी आपण

 

सगळयांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही खासदार दत्ता मेघे यांनी दिली आहे.
गत पाच वर्षापासून ठप्प पडलेल्या दिनकरनगर (सेलू) येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यावर थकित कर्जासाठी बँकांनी जप्तीचा नोटीस बजावल्याने कर्मचारी तसेच ऊस उत्पादकांमधे खळबळ उडाली आहे. या पाश्र्वभूमीवर कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी खासदार दत्ता मेघेंची भेट घेऊन परिस्थिती विशद केली तसेच याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली.
संघटनेच्या विनंतीनुसार खासदार दत्ता मेघे यांनी युवक नेत्यांना सोबत घेत कारखान्यास भेट देऊन कर्ज व अन्य बाबींची माहिती घेतली. कारखान्याचा लिलाव थांबविण्यासाठी व तो पूर्ववत सुरू करण्याच्या हेतूने काय करता येईल, याविषयी त्यांनी संबंधितांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा बँॅकेचे अध्यक्ष समीर देशमुख, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिन अग्निहोत्री यांच्याशी आर्थिक मदतीचा पैलू खासदार दत्ता मेघेंनी मांडला. या परिसरातील हजारो ऊस उत्पादक तसेच शेकडो कामगारांच्या जीवन मरणाचा प्र्ना कारखान्याशी निगडित आहे. त्यामुळे सर्वानीच मदतीसाठी पुढे यावे, आपण त्यात मोलाचा वाटा टाकू, अशी खात्री खासदार दत्ता मेघेंनी दिली. तसेच ३० जूनला मुख्यमंत्री अशोक चव्हाण नागपुरात येत आहेत. या भेटीत कारखान्याचा लिलाव होऊ नये यासाठी त्यांना गळ घालू. शिष्टमंडळासह आपण घेणार असलेल्या या भेटीत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास खासदार दत्ता मेघेंनी काळजीवाहू संचालकांशी बोलताना व्यक्त केला. कामगार व कर्मचाऱ्यांनी शांतता कायम ठेवावी, अनुचित घटना घडू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही मेघेंनी केले.