Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चंद्रपुरात आज बचत गट महिला मेळावा
चंद्रपूर, २४ जून/ प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला राजसत्ता आंदोलन आणि महाराष्ट्र महिला

 

परिषदेच्या वतीने उद्या, २५ जूनला बचत गट महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र महिला परिषद मुंबईच्या प्रमुख निमंत्रक भारती शर्मा, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय तोटावार, बँंकेचे मानद सचिव विलास धांडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू राजगडकर, जिल्हा बँकेच्या संचालिका सुवर्णरेखा पाटील, नंदा अल्लुरवार, महिला राजसत्ता आंदोलन, भंडारा जिल्हा विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य, विदर्भ लोकविकास मंचचे राजेश पिंजरकर उपस्थित राहणार आहेत.
बचत गटाच्या माध्यमातून महिला अभिमानाचे आणि ताठ मानेने पुढे येत आहेत. आर्थिक विकास हा एक महत्त्वपूर्ण घटक सर्वागीण विकासात आहे. त्याकरिता महिलांना स्वावलंबी बनविणे, स्वनिर्णयाची क्षमता निर्माण करणे व आत्मविश्वास निर्माण करण्याकरिता बचत गटाचे माध्यम प्रभावी आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच महिला विकासात बचत गटाचे माध्यमातून आग्रहाची भूमिका घेतली असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने बचत गटाचे माध्यमातून महिलांचा सर्वागीण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले.
या मेळाव्यात अवार्ड, किसान जागृती, ग्रामोन्नती, महाराष्ट्र ग्रामविकास आणि कार्यप्रतिष्ठान व प्रकृती या संस्था सहभागी झालेल्या आहेत. मेळाव्यात बचत गटातील यशस्वी महिलांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून अनिरूध्द वनकर व सहकारी कलाकारांचा प्रेरणास्फूर्ती गीत गायनाचा कार्यक्रम व ‘मुलगी झाली हो’ या सामाजिक नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.