Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा आगग्रस्तांना मदतीचा हात
अमरावती, २४ जून / प्रतिनिधी

नुकत्याच बडनेरा येथील मिल चाळ परिसरातील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत तीस घरे जळून

 

खाक झाली. त्यामुळे सुमारे १५० जणांवर बेघर होण्याची पाळी आली. या लोकांना त्यांचा निवारा पूर्ण होईपर्यंत दोन वेळचे भोजन देण्याची व्यवस्था येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने स्वीकारली असून आगग्रस्तांच्या झोपडय़ा उभ्या होईपर्यंत त्यांना दररोज जेवण पाठवले जाईल, असे ‘हव्याप्र’ मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य यांनी म्हटले आहे.
झोपडपट्टीला लागलेल्या आगीत नागरिकांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. एका कपडय़ाशिवाय त्यांच्याजवळ काहीही शिल्लक राहिलेले नाही. स्वयंपाक करायला भांडी नाहीत. याची दखल घेत, प्रभाकर वैद्य यांनी व्यायामशाळेतर्फे एक पथक या भागाची पाहणी करण्यासाठी पाठवले होते. तेथील लोकांची जेवणाची सोय नसल्याचे पाहून वैद्य यांनी या लोकांच्या झोपडय़ा उभ्या होईपर्यंत संस्थेतून तयार भोजन त्यांना पाठवले जाईल, असे सांगितले. आगग्रस्तांना संस्थेतर्फे कपडय़ांचे वाटपही करण्यात आले. माजी नगरसेवक पुरुषोत्तम येते, कुंदन यादव, प्रश्न. संजय तिरथकर, राजू महात्मे, राजेंद्र गावनेर, प्रवीण इचे, राजेश चांडोळे, पी. यू. चौधरी, एस. आर. भटकर, डी. आर. दवे, व्ही. जी. इंगोले, राजू धोटे, मुजफ्फर मास्टर यांच्या उपस्थितीत भोजनाचे वाटप करण्यात आले.