Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

प्रवाशाजवळील दोन लाखाचे सोने लंपास
मेहकर, २४ जून / वार्ताहर

हिवरा आश्रमवरून मेहकरकडे काळी-पिवळी टॅक्सीमधून बँक लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी

 

येणाऱ्याचे सुमारे १ लाख ९९ हजार रुपये किमतीचे सोने हिवरा आश्रम मेहकर प्रवासादरम्यान चोरटय़ांनी पळवले. ही घटना बुधवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान घडली.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे खाजगी स्वीय सहाय्यक सुभाष शिंगणे यांचे वडील सुधाकर विष्णू शिंगणे (६०) हे हिवरा आश्रम येथून मेहकरच्या बुलढाणा अर्बनच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घरून १ लाख ९९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन काळी-पिवळी टॅक्सी (क्र. एम.एच. २८ एच. २९६२) मधून मेहकरकडे निघाले. टॅक्सीमध्ये ते चालकाशेजारी बसले होते.
त्यांच्या शेजारी हिवरा आश्रममधून आणखी दोन प्रवासी होते तर, एक अंबाशी फाटय़ावरून बसलेला होता. त्यापैकी एक मेहकरच्या राहाटे चौकात उतरला, तर सुधाकर शिंगणे आंबेडकर चौकात उतरून बुलढाणा अर्बन पतसंस्थेत पोहोचल्यानंतर थैलीमध्ये स्टीलचा डबा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
डब्यात साडेचार तोळ्याच्या दोन सोन्याच्या पोथ, साडेचार तोळ्याचा हार असलेला डबा नव्हता. थैलीच्या खालील बाजूला ब्लेडने चिरलेले दिसले. घटनेची माहिती त्यांनी तात्काळ खासदारांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुभाष शिंगणे या मुलाला दिली. मेहकर ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर-चिखली मार्गावर घटना घडतात तेव्हा या मार्गावर लाल रंगाची बजाज पल्सर मागे-पुढे संशयास्पदरीत्या फिरत असते असे कळले. चोरांचा शोध घेताना लाल पल्सरचा शोध घेणेसुद्धा आवश्यक असल्याचे कळले. पुढील तपास प्रभारी ठाणेदार अशोक झुक्टे करीत आहेत.