Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शेतकऱ्यांनी भावना मतपेटीतून व्यक्त कराव्यात -राजू शेट्टी
बुलढाणा, २४ जून / प्रतिनिधी

जाती-पातीच्या आणि पैशा अडक्याच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीची फळे विषारी निघतात

 

आणि मग शेतकऱ्यांना मृत्यू जवळ करावासा वाटतो. देशाचा अन्नदाता म्हणवणारा शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. त्यामुळे आपला राग व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी पेटून उठावे आणि भावना मतपेटीतून व्यक्त कराव्या, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे युवक प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राजू शेट्टी यांचा गर्दे हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदा खोत, गजानन अमदाबादकर, दशरथ सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ. जनार्धन शिवणेकर, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गिरीधर देशमुख, प्रश्न. अमर कांबळे, सतीश उबाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी राजू शेट्टी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. परंपरागत डफडे वाजवून आणि ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी सामाजिक, राजकीय आणि संघटनेच्या कामाचा आढावा मांडला. २००० मध्ये ऊसतोड कामगारांसाठी आंदोलन, त्यानंतर लोकवर्गणीद्वारे २००२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य व २००४ मध्ये पुन्हा लोकवर्गणीकरून विधानसभा जिंकली आणि आता २००९ मध्ये लोकांचा आशीर्वाद व लोकांनी पई-पई जमा करून दिलेल्या पैशातून लोकसभा जिंकली, असा पूर्ण प्रवास त्यांनी यावेळी मांडला. यापुढेही आपण लोगवर्गणीतूनच निवडणुका लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज राजकारण धंदा झाला आहे. हा धंदा मोडून काढण्यासाठी आणि आपल्या हितासाठी लढण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. खोत यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर चांगलेच आसूड ओढले. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपला सातबारा कोरा करण्यासाठी लढावे आणि नव्याने अस्तित्वात येणारी वतनदारी पद्धत मोडून काढावी, असे आवाहन त्यांनी केले.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्य़ातून लोकाभिमुख राजकारणाला सुरुवात करण्यासाठी रवीकांत तुपकर यांच्या हाकेला साथ द्या, असा सल्ला यावेळी अमदाबादकर यांनी दिला. प्रश्नस्ताविक रवीकांत तुपकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रणजितसिंह राजपूत यांनी केले.