Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

व्यक्तिवेध

जन्माने भारतीय असलेले अडोब सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण व पेप्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी यांचा अमेरिकेच्या आघाडीच्या २५ सी.ई.ओं.मध्ये समावेश झाला आहे. सध्या अमेरिकेत जबरदस्त मंदी असतानाही ज्यांनी आपल्या कंपन्यांची उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली अशा सी.ई.ओं.ची यादी अलीकडेच प्रकाशित करण्यात आली आहे. इंद्रा नूई सर्वपरिचित आहेत. परंतु प्रसिद्धीपराङ्मुख असलेले अडोब सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण तसे फारसे कुणाच्या परिचयाचे नाहीत. आता मात्र

 

कार्यक्षम सी.ई.ओं.च्या यादीत त्यांचा समावेश झाल्याने ते एकदम प्रकाशझोतात आले आहेत. या क्षेत्रात पाच पेटंट्स नावावर असलेले शंतनू नारायण हे अर्थातच अमेरिकन कॉर्पोरेट जगतात प्रसिध्द आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथील पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यांच्या वडिलांची प्लस्टिकची फॅक्टरी होती आणि त्यांची आई इंग्रजीची शिक्षिका होती. त्यानंतर उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी संपादन केली व ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी ब्लोइंग ग्रीन स्टेट विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच हॅस स्कूल ऑफ बिझनेस येथून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनंतर त्यांनी आपली करिअर सुरू केली ती अ‍ॅपल या कंपनीतून. तेथे त्यांची अल्पावधीतच डेस्कटॉप डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर काही काळाने त्यांनी पिक्ट्रा ही कंपनी संयुक्तरीत्या स्थापन केली. इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल फोटोचे तंत्रज्ञान या कंपनीने सर्वात प्रथम विकसित केले. १९९८ साली ते अडोब या कंपनीत उपाध्यक्ष म्हणून दाखल झाले. कंपनीच्या जागतिक पातळीवरील या कंपनीच्या विविध संशोधन प्रकल्पांची सूत्रे त्यांच्याकडे होती. त्यानंतर त्यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांचे वय होते ४१ वर्षे. एवढय़ा लहान वयात एवढय़ा मोठय़ा पदावर पोहोचलेले ते पहिले अधिकारी होते. कंपनीचे सी.ई.ओ. होण्याअगोदर त्यांच्याकडे चीफ ऑपरेशनल ऑफिसर हे पद होते. त्यावेळी कंपनीच्या रोजच्या कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग असे. यात प्रामुख्याने कंपनीचे जागतिक पातळीवरील व्यवहार, नवीन उत्पादने, त्यांचे संशोधन, त्यासाठी आवश्यक ते मार्केटिंग, कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या जबाबदाऱ्या होत्या. त्या त्यांनी अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्या. त्यामुळे कंपनीत त्यांचा दरारा वाढला. नारायण यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनीची भराभर वाढ झाली. कंपनीने अनेक नवनवीन क्षेत्रांत पदार्पण केले. सॉफ्टवेअर निर्मितीत काही उत्पादनांत आघाडीचे स्थान पटकाविले. २००५ मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली कंपनीने मॅक्रोमीडिया ही कंपनी ताब्यात घेतली. ३.४ अब्ज डॉलरच्या या टेकओव्हरमुळे कंपनीला अनेक क्षेत्रांत बाजी मारणे शक्य झाले. महत्त्वाचे म्हणजे हे टेकओव्हर यशस्वी करणे ही सोपी बाब नव्हती. मात्र ते शंतनू नारायण यांनी यशस्वी करून दाखविले. त्यामुळे त्यांचा कंपनीतील दबदबा वाढला. कॅलिफोर्निया विद्यापीठातील बिझिनेस स्कूलच्या सल्लागार मंडळावरही ते आहेत. अभ्यासू, कार्यक्षम असे शंतनू नारायण आज जागतिक पातळीवर कॉर्पोरेट क्षेत्रात चमकत आहेत. एका भारतीयाने केलेली ही कामगिरी उल्लेखनीयच ठरावी.