Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

विशेष लेख

पुरातन वास्तूंचा नाश म्हणजे विकास नव्हे!

एखाद्या विवक्षित भूखंडाच्या विकासापेक्षा पुरातन वास्तूचे जतन करणे हे समाजविकासाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असते. पण मुंबई महापालिकेच्या काही उच्चाधिकाऱ्यांना मात्र पुरातन वास्तू या विकासातील अडथळे वाटतात. आपण असे म्हणत असतो की, मुंबई हे एक ‘महान आर्थिक केंद्र’ बनवायचे आहे. या ‘महान आर्थिक केंद्र’ या संकल्पनेची व्याख्या काय? कशामुळे ते ‘महान’ ठरेल? आर्थिक सुधारणा हे याचे खचितच उत्तर नव्हे. आर्थिक सुधारणांची एक यादीच तुमच्याजवळ असेल पण केवळ ही यादी या सुधारणा अमलात आणू शकणाऱ्या तज्ज्ञांना/ अर्थशास्त्रज्ञांना आकर्षित करू शकणार नाही. त्यांना इथे यावेसे वाटण्याऐवजी तुम्हाला आर्थिक सुधारणांच्या पलीकडील काही करावे लागेल. तुम्ही ज्या गुणीजनांना आकर्षित करू इच्छिता, त्यांना एका महान शहराकडून असलेल्या त्यांच्या अपेक्षांनुसार गुणवत्तेचे जीवनमान तुम्हाला देता यायला हवे.

 


लोकांना केवळ राहण्यासाठी व काम करण्यासाठी चांगले वातावरण व सुखसुविधा नको असतात, तर त्याबरोबरच फुरसतीच्या वेळात समृद्ध जीवन जगण्याची शक्यताही त्यांना हवी असते आणि यासाठी त्यांना अनेक पर्याय हवे असतात. संगीत, नृत्य, नाटय़, कला प्रदर्शने, खेळांचे विविध कार्यक्रम, वस्तुसंग्रहालये आणखीही असे विविध चोखंदळ पर्याय त्यांना फुरसतीच्या वेळासाठी हवे असतात. शहरे खऱ्या अर्थाने महान बनतात ती अशा चोखंदळ पर्यायांमुळे. न्यूयॉर्क, सिडनी, लंडन, पॅरिस, सॅन फ्रान्सिस्को, अगदी आपली दिल्ली ही शहरे याच व्याख्येनुसार ‘महान’ ठरतात. त्या शहरांत या पर्यायांची उपलब्धताही असते. असे पर्याय उपलब्ध नसणाऱ्या शहरांपेक्षा हे पर्याय उपलब्ध असलेल्या शहरांनाच लोक प्राधान्य देतात, मग भले ते हे चोखंदळ पर्याय कितीही कमी वेळा वापरोत.
असेच काहीसे शहराच्या वास्तुरचनेबाबतही म्हणावे लागेल. शहरवासी म्हणून आपण शहराबद्दलच्या काही कल्पना बाळगत असतो. त्यात फक्त राहते घर, कार्यस्थळ व वापरत असलेले रस्ते एवढेच नसते, तर शहरातल्या वेगळ्या रचनेच्या वास्तू, लोकप्रिय स्थळे यांचा अंतर्भाव ‘शहर’ कल्पनेत असतो. त्या वास्तू सामान्यवास्तूंपेक्षा जितक्या वेगळ्या असतील तितक्या ठळकपणे आपल्या मानसचित्रात आरेखित झालेल्या असतात. आपल्याला त्या जास्त सहजपणे, प्रकर्षांने आठवतात. आपण कदाचित त्या वास्तूंना/ स्थळांना वर्षांनुवर्षे भेटही देत नसू. तरीही त्यांचे पुरातन वास्तू म्हणून असलेले मूल्य आपल्या लेखी कमी होत नाही. त्या नष्ट झाल्या अथवा त्यांना काही क्षती पोहोचली तर आपल्याला दु:खच होणार असते. ती शहराची हानी ठरत असते. मला दरवर्षी किंवा दशकांतसुद्धा आग्य्राला जाऊन ताजमहाल पाहणे गरजेचे नसते तरीही ताजमहाल व त्याच्या परिसरात काही बदल होणार आहेत असे समजले तर मी अस्वस्थ होतो. मी आग्य्रात राहातही नाही, पण त्याला तसे महत्त्व नाही. ताजमहालमध्ये झालेला बदल माझ्या मनातील कशाला तरी हानी पोहोचवतो.
हाच खरे तर पुरातन वास्तूंचा अर्थ. हेच त्यांचे मूल्य. त्यावरून शहराचेही मूल्य, संस्कृती मूल्य ठरते. अशा आपल्या आस्थेचा विषय असणाऱ्या वास्तू जतन करण्याची गरज आहे. विकासाच्या नावाखाली त्या नष्ट करता कामा नयेत. आपल्याला नवीन बांधकाम हवेच असेल तर त्यासाठी आपण दुसरी वेगळी जागा शोधायला पाहिजे. त्यासाठी अस्तित्वात असलेल्या अमूल्य पुरातन वास्तूंत बदल करता कामा नयेत किंवा त्या नष्टही करता कामा नयेत. याचा अर्थ अशा जागांचा विकास करून भरपूर पैसा मिळविण्याचा विकासकाचा हेतू व शहरवासीयांच्या मनात या अमूल्य वास्तूबद्दल असलेली आस्था, जिचे मूल्य पैशात करता येणार नाही, त्यांचा सारासार विचार करून सरकारने नियंत्रक म्हणून भूमिका बजावली पाहिजे.
उदाहरणार्थ, मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटची मुख्य इमारत व घडय़ाळाचा स्तंभ जतन केलाच पाहिजे. याबाबतीत सगळ्यांचेच एकमत आहे. पण या मार्केटमधील मोडकळीला आलेल्या दुकानगाळ्यांचे काय करायचे याबद्दल मतभिन्नता आहे. या गाळ्यांचे पुनर्वसन कसे करावे याबद्दल तीव्र वाद सुरू आहेत. या गाळ्यांमध्ये काही मर्यादेपर्यंत सुधारणा करून त्यांना थोडा अधिक चटई निर्देशांक देऊन आधुनिक रूप द्यावे? की त्यांना काचदरवाजे बसवून त्यांचा बहुमजली ‘मॉल’ करावा? हा नंतरचा ‘मॉल’ प्रस्तावच मान्य होण्याची, अंतिम ठरण्याची शक्यता जास्त आहे. कारण संपूर्ण शहरासाठी चटई निर्देशांक चौपटीने वाढविण्यासाठी दिलेली सरसकट मंजुरी.
खरे तर इथे क्रॉफर्ड मार्केटची दगडी इमारत जतन करण्यापेक्षा त्याचे ‘वैशिष्टय़’ जपण्याची अधिक गरज आहे. क्रॉफर्ड मार्केट हे मधोमध असलेल्या खुल्या अंगणाच्या चहूबाजूंनी वसलेले विविध शेतीमालाचे, जीवनावश्यक वस्तूंचे विक्रीकेंद्र आहे. या खुल्या अंगणाच्या बाजूला मर्यादित उंचीचेच बांधकाम आहे. ही वैशिष्टय़पूर्ण रचना हेच क्रॉफर्ड मार्केटचे वैशिष्टय़ आहे. या वैशिष्टय़पूर्ण रचनेची मूलतत्त्वे न बदलता व या वैशिष्टय़ाला धक्का न लावता, तळमजल्याची सोय करून, काही ठिकाणी जादा चटई निर्देशांक देऊन या गाळ्यांचा पुनर्विकास करून ते आधुनिक सोयींनी युक्त बनवणे शक्य आहे. क्रॉफर्ड मार्केटची रचना एखाद्या मॉलपेक्षा वेगळी असणे हीच तर ग्राहकांसाठी प्रमुख आकर्षणाची बाब आहे आणि त्यातूनच त्यांना वेगळा आनंद मिळतो. क्रॉफर्ड मार्केटचे हे विशिष्ट वातावरण जपणे हीच तर खरी गरज आहे. आपण मुंबईकर तिथे प्रत्यक्ष जात असलो किंवा नसलो तरी आपले मन:चक्षू या अनुभवाचा आनंद घेतच असतात.
एखाद्या खासगी इमारतीला पुरातन वास्तूचा दर्जा देणे हे त्या मालकावर अन्यायकारक आहे असे मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे, असे मालक त्यांच्या शेजाऱ्यांसारखा, अशा वास्तूंचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाहीत (पुरातन वास्तू विकासावरील बंधनांमुळे). अर्थात, कुशल प्रशासकीय अधिकाऱ्यांना या किरकोळ समस्येतून मार्ग काढणे फारसे अवघड नाही.
अशा वास्तूंची देखभाल व जतन करण्यासाठी जास्त खर्च येतो हे लक्षात घेऊन अशा पुरातन वास्तूच्या मालकांना मालमत्ता करात सवलत देता येऊ शकते. नऊ शतकांहूनही अधिक काळची वास्तुरचना परंपरा जपणाऱ्या प्राग (झेक रिपब्लिक) शहरात अशी सवलत दिली गेली आहे. म्हणूनच प्रागमध्ये भिन्न भिन्न शैलीतील वास्तू एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या आपल्याला दिसतात. अशा प्रकारची भिन्न भिन्न शैलीतील बांधकामे हे त्या शहराचे संचित आहे. अशा प्रकारच्या पुरातन वास्तूला उपलब्ध होऊ शकणारा चटई निर्देशांक शेजारच्या परिसरातील दुसऱ्या विकासकाला देता येऊ शकतो. या वाढीव निर्देशांकामुळे होणारा फायदा पुरातन वास्तूच्या मालकाबरोबर त्या विकासकाने वाटून घ्यावा. प्रशासन अशा मालकाला थेट नुकसानभरपाई देऊ शकते.
समाजाच्या व्यापक हिताकडे दुर्लक्ष न करता हे असे प्रश्न सोडवण्याचे विविध मार्ग शोधता येतील. समाजाचे व्यापक हित व उच्च दर्जात्मक दीर्घकालीन विकास या दोन्हींची सांगड घालताना परंपरेने लोकांना दिलेल्या अशा अमूल्य वारशाचे जतन करणे याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे.
शिरीष पटेल
(नगररचनाकार)
अनुवाद- प्रसाद घाणेकर