Leading International Marathi News Daily

गुरूवार, २५ जून २००९

विविध

जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्रे डागण्याची उत्तर कोरियाची तयारी
सोल, २४ जून/पीटीआय

 

उत्तर कोरिया लवकरच लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे सोडून शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाने त्या देशावर काही र्निबध लादले असून सागरी मार्गाने होणारा व्यापार थांबवण्यात आला आहे. हा व्यापार जपानच्या सागरातून चालत होता त्यामुळे आता सूडाने पेटलेल्या उत्तर कोरियाने त्या सागरी प्रदेशात स्कड क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी चालवली आहे, हा लष्करी सरावांचा भाग असल्याचे समर्थन उत्तर कोरियाने केले आहे ,असे यॉनहप वृत्तसंस्थेने म्हटले आहे. उत्तर कोरियाने जपानच्या जहाजांना उद्यापासून सोळा दिवस सागरात येऊ नये असा इशारा दिला आहे. जपानच्या तटरक्षक दलांनीच ही माहिती आज उघड केली. ११० बाय ४५० किलोमीटरच्या परिसरात जहाजांनी येऊ नये असे सांगण्यात आले आहे. उद्यापासून दहा जुलैपर्यंत स्कड किंवा लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे या सागरी प्रदेशात डागली जाणार आहेत. स्कड क्षेपणास्त्रांचा पल्ला ५०० कि.मी. असून जमिनीवरून जहाजांकडे मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पल्ला १६० कि.मी.चा आहे.

शनीच्या एन्सेलाड्स उपग्रहावर जीवसृष्टीस अनुकूल घटक
पॅरिस, २४ जून/पीटीआय

शनीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र असलेल्या एन्सेलाड्सवर गरम पाण्याचे झरे होते पण पृष्ठभागाखालील क्षारयुक्त सागरामुळे ते कालांतराने नष्ट झाले त्यामुळे तेथे जीवसृष्टीस अनुकूल परिस्थिती असण्याची शक्यता आहे असे एका संशोधनाच्या अहवालात म्हटले आहे.
युरोपातील संशोधकांनी म्हटले आहे की, एन्सेलाड्सच्या बर्फाळ भागाखाली द्रवाचे अस्तित्व होते याचे आतापर्यंतचे सर्वात सबळ पुरावे मिळाले आहेत. तेथील अवकाशात हजारो किलोमीटरवर फेकली गेलेली ज्वालामुखीतील वाफ व बर्फाचे कण यांच्यात मीठाचे काही कण सापडले आहेत. सुमारे ५०० कि.मी. व्यासाच्या एन्सेलाड्स या उपग्रहावर जीवसृष्टीला आवश्यक असलेल्या घटकांपैकी दोन ते तीन घटक आहेत. एक म्हणजे ऊर्जेचा स्रोत जो या ठिकाणी शनीच्या गुरुत्वीय बलात काहीसा बदल झाल्याने त्याचा परिणाम या ग्रहावरील टायडल वॉर्मिगवर होतो. कॅसिनी यानाने २००४ पासून शनीच्या भोवती प्रदक्षिणा घालताना एन्सेलाड्सविषयी बरीच माहिती मिळवली असून त्याच्या पृष्ठभागावरील टायगर स्ट्राईप्स या १२० किलोमीटरच्या भागातून निघणाऱ्या धूळ व इतर घटकांच्या प्रवाहात सेंद्रिय पदार्थाचे मिश्रण सापडले आहे व ते जीवसृष्टीच्या पोषणास अनुकूल असेच आहे. अजूनही तेथे पाणी असल्याचे स्पष्ट पुरावे मात्र सापडलेले नाहीत.