Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

व्हाया टॉलीवूड..
नेहा पेंडसे हे नाव महाराष्ट्रातील सिनेप्रेक्षकांना परिचित नसले तरी दक्षिणेतील प्रेक्षकांना हे नाव नवीन नाही. सामान्यपणे मराठी कलाकारांचा प्रवास ‘मराठी चित्रपटांकडून दक्षिणेतील चित्रपटांकडे’ असा असतो. नेहा पेंडसे मात्र त्याला अपवाद ठरली आहे. तिचा प्रवास विरुद्ध दिशेने झाला आहे. अस्सल मराठी नाव असलेल्या या अभिनेत्रीचा पहिला चित्रपट मात्र तेलगू भाषेतील होता. गेली चार वर्षे दक्षिणेतील चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकरल्यावर नेहा पेंडसे आता मराठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. चिं. त्र्य. खानोलकरांच्या ‘अगोचर’ या कादंबरीवर आधारित ‘अग्निदिव्य’ या चित्रपटातील मुख्य भूमिका तिने केली आहे.
आपल्या कला प्रवासाबद्दल नेहाने सांगितले की, लहानपणीपासूनच मी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका करत होते. त्यानंतर ‘हसरतें’, ‘पडोसन’, ‘तुलसी’ इत्यादी हिंदी मालिकांमधून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. याचदरम्यान तिला तेलगू चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर मिळाली. ‘इनद इनद कादेल इनद’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या चित्रपट प्रवासाची सुरुवात झाली. नेहा म्हणाली की, दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत काम करणारी माणसे खूपच ‘प्रोफेशनल’ आहेत. त्यामुळे लहान कलाकारापासून मोठय़ा कलाकारांपर्यंत सर्वच जण वेळेवर येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथील चित्रपटांचे बजेट जास्त असते आणि चित्रपटांचे विषय तरुणांना भावणारे असतात. याचा त्यांच्या चित्रपटसृष्टीला खूप फायदा होतो. तेथील चित्रपटांत ती गेली चार वर्षे काम करत असली तरी त्या भाषा मात्र ती शिकलेली नाही. ती म्हणाली की, अभिनय करण्यापर्यंत ठीक आहे, पण तेथील भाषेतील उच्चार कठीण असतात. त्यामुळे संवादांचे ‘डबिंग’ करण्यात येते. हे सांगताना तिने अतुल कुलकर्णी यांचा मात्र आवर्जून उल्लेख केला. अतुल कुलकर्णी मात्र स्वत:चे संवाद स्वत:च ‘डब’ करतात. हे खूप कठीण काम असल्याचे तिने सांगितले.
मराठी भाषिक असल्यामुळे नेहाला मराठी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा होती. ‘अग्निदिव्य’च्या निमित्ताने ही संधी मिळाली. ‘अगोचर’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात एका कणखर स्त्रीची भूमिका तिने साकारली आहे. चित्रपटांप्रमाणेच नृत्य आणि गिटारही ती शिकली आहे. त्याचप्रमाणे गेल्याच वर्षी तिने रुइया महाविद्यालयातून ‘पिस्टल शूटिंग’चा कोर्सही केला होता.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी सांगितले की, चिं. त्र्य. खानोलकर यांच्या कादंबरीवर चित्रपट करणे हे एक आव्हान असते. या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेसाठी योग्य अशी अभिनेत्रीच मिळत नव्हती. सुमारे ५० नायिकांना भेटल्यावर नेहा पेंडसेची या भूमिकेसाठी निवड केली. येत्या ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सुनील डिंगणकर

‘जोडी जमली रे’चा आज ५० वा भाग
‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘जोडी जमली रे’ रिअ‍ॅलिटी शोमध्ये मागच्या पर्वात गौरव आणि स्वप्नाली या जोडीला सर्वोत्तम जोडीचा किताब आणि ८० हजार रुपयांचे हिऱ्यांचे दागिने मिळाले. आता नवीन पर्व सुरू झाले असून त्यात मीनल कुलकर्णी, भक्ती कोरे, योशिता पाटील, जयेंद्र पाटील, रोहित टिकरे आणि सोमनाथ तडवलकर असे सहा स्पर्धक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे आज, शुक्रवारी ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमाचा ५० वा भाग दाखविण्यात येत आहे. त्यामुळे या भागात थोडेसे वेगळेपण आणण्यासाठी यापूर्वी सहभागी झालेल्या स्पर्धकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे. सूत्रसंचालक जोडी अतुल परचुरे आणि कविता मेढेकर या सर्व स्पर्धकांचे स्वागत करणार असून ‘जोडी जमली रे’ या कार्यक्रमात सहभागी झाल्याने आपल्या आयुष्यात काय आणि कसे बदल झाले याविषयी हे माजी स्पर्धक सांगणार आहेत.
नवीन पर्वातील सहा स्पर्धक आणि यापूर्वी कार्यक्रमात येऊन गेलेले स्पर्धक या ५० व्या भागात एकत्र येणार असल्यामुळे हे सगळे मिळून काय-काय धमाल करतात ते या शुक्रवारच्या ‘जोडी जमली रे’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पंडित संदीप अवचट हे आनंदी व समाधानी वैवाहिक जीवनाबाबत आपले मत मांडणार आहेत.
प्रतिनिधी

चॉइस इज युवर्स
मराठी ‘जुडवा’
‘मनोहर’ या नावाचा अपभ्रंशा ‘मन्या’ असा करतात. ‘मन्या सज्जना’मध्ये मात्र मनोहर आणि मन्या या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. नावावरूनच हा विनोदी चित्रपट आहे, हे स्पष्ट आहे. ‘मनोहर’ फॉरेन रिटन्र्ड आहे, तर मन्या इथलाच भुरटा चोर आहे. त्यांच्या सारख्या दिसण्यामुळे जो गोंधळ निर्माण होतो, हे आहे ‘मना सज्जना’चे कथासूत्र. एक चोर तर दुसरा परदेशस्थ अशा संकल्पनेवर आलेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाला समीक्षकांनी धोपटले असले तरी प्रेक्षकांनी मात्र तो चित्रपट डोक्यावर घेतला होता. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘मन्या सज्जना’ची साधारण तशीच कथा आहे. कथासूत्र एकच असले तरी दोन्हीमध्ये घडणारे प्रसंग मात्र वेगळे आहेत. महाराष्ट्रात यापूर्वीच प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता मुंबईत प्रदर्शित होत आहे. मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत आहे म्हटल्यावर चित्रपटाला आपोआपच ‘स्टार व्हॅल्यू’ प्राप्त झाली आहे. पण फॉरेन रिटन्र्ड मनोहर ही व्यक्तिरेखा मकरंद कशी साकारतो, याची उत्सुकता मात्र आहे. मकरंदच्या जोडीला विनय येडेकर, विजय गोखले हे विनोदी अभिनेतेही आहेत. त्याचप्रमाणे मोहन जोशी, संतोष जुवेकर, शरद पोंक्षे हेही आहेत. एकूणच हा चित्रपट किमान मनोरंजन करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
व्हिज्युअल ट्रीट
न्यूयॉर्कची कथा कशीही असली तरी किमान जॉन अब्राहम, कतरिना कैफ, नील नितीन मुकेश यांचा वैयक्तिक चाहता वर्ग हा चित्रपट पाहायला जाणारच. त्यातच यशराज बॅनरचा हा चित्रपट असल्यामुळे या तिघांचे लाइफ हे ‘लार्जर दॅन लाइफ’ असणार हेही निश्चितच. त्यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीची काही मिनिटे ‘दिल, दोस्ती, प्यार वगैरे वगैरे’ असणार. कतरिनाच्या चित्रपटांत प्रेक्षकांनी क्वचितच तिचा अभिनय कसा आहे, याकडे लक्ष दिले असेल. ‘न्यूयॉर्क’मध्ये मात्र तिची ‘डीग्लॅमराइज्ड’ व्यक्तिरेखा आहे. तिने म्हणे मेक-अपही केलेला नाही. या चित्रपटातील कथा ११ सप्टेंबरच्या हल्ल्याभोवती फिरते. ओमर (नील) भारतातून अमेरिकेत जातो. तेथे त्याला सॅम (जॉन) आणि माया (कतरिना) यांच्यासोबत तो अमेरिकेत फुल-ऑन धमाल करत असतो. अमेरिका त्याला आवडूही लागते. पण ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मात्र चित्र बदलते. या तिघांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विनोद, रोमान्स, टेन्शन, धक्कादायक घटना हे सर्व काही या चित्रपटात आहे. त्यामुळे या वीकेण्डला ‘न्यूयॉर्क’चा फेरफटका मारायचा चांगला ‘चॉइस’ असेल.
टॉकिजवाला

पाककौशल्य मल्लिका शेरावतचे!
सध्या ‘दस का दम’ हा ‘सेलिब्रिटी गेम शो’ झाला आहे. या आठवडय़ातील भागात एकीकडे हॉट मल्लिका शेरावत तर दुसरीकडे ऑलिम्पिक विजेता विजेंदर सिंग एकमेकांसमोर स्पर्धक म्हणून उभे ठाकले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान मल्लिका म्हणाली की, तिने सध्या पाककलेचे धडे घ्यायला सुरुवात केली आहे आणि तिने सलमान आणि विजेंदरला जेवणाचे आमंत्रण दिले. तिने असे सांगताच सलमानने लगेचच तिथे पोलपाट आणि लाटणे मागविले. मल्लिकाने चक्क सेटवर पोळ्या लाटून दाखविल्या. पहिल्या प्रयत्नात तिला फारसे यश मिळाले नाही आणि तिला पाहून विजेंदरने बाह्या सरसावल्या. पण त्याने लाटलेली पोळी ही चक्क बॉक्सिंग शॉर्टच्या आकाराची झाली होती. येत्या २७ जून रोजी ९ वाजता ही सर्व धमाल सोनी वाहिनीवरील ‘दस का दम’ या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.
प्रतिनिधी