Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

लोकमानस

ऊर्जेबाबत ‘भावी महासत्ता’ काय करणार आहे?
ल्ल वर्तमानपत्र वाचताना सकाळी सकाळी एका छोटय़ा बातमीने लक्ष वेधून घेतले. (१० जून) ‘२०२० पर्यंत चीन त्याच्या एकूण आवश्यकतेच्या १/५ ऊर्जा अपारंपरिक स्रोतांद्वारे (रिन्यूएबल)

 

मिळविणार. ’ अशी ती बातमी होती. एखादी गोष्ट ठरविल्यावर चीनमधले राज्यकर्ते त्याची अंमलबजावणी किती कसोशीने करतात याचा प्रत्यय बीजिंग ऑलिपिंकमध्ये आपणास आलेला आहे. त्यामुळे चीनने जे ठरविले ते तो करणारच यात काहीही संशय नाही.
केवळ घोषणा देऊन आणि पोकळ वल्गना करून ‘महासत्ता’ होता येत नाही. अमेरिकेला आपले ‘महासत्ता’ पद टिकवायचे असेल तर भोगवादी जनतेला त्यागवादी करावे लागेल. सध्या अपारंपरिक ‘रिन्यूएबल’ ऊर्जेच्या बाबतीत जर्मनी आघाडीवर आहे; परंतु ही आघाडी आता चीनकडे जाईल असे वाटत आहे.
अपारंपरिक रिन्युएबल ऊर्जा ही आता काळाची आवश्यकता आहे. विविध देशांकडून काही शिकून आमचे राज्यकर्ते याबाबतीत काही ठोस पावले उचलतील का? याबाबतीतील योजना सध्या तरी कागदावरच दिसताहेत. ‘महासत्ता’ व्हावयाचे असेल तर ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला चीनचे अनुकरण करावे लागेल.
अरविंद शेवडे, रत्नागिरी
arvindshevde@yahoo.com

अंधश्रद्धेचे बळी रोखण्यासाठी कायदा होणे अत्यावश्यक
ल्ल दैवी चमत्काराने पैसे तिप्पट करून देतो, असे सांगून हजारोंची फसवणूक करणाऱ्या डॉ. अशोक ऊर्फ माडी जडेजा सध्या अहमदाबाद येथे पोलीस कोठडीत आहे. पैसे तिप्पट मिळत असल्याचे समजल्याने कंजारभाट समाजाच्या अनेकांनी स्वत:च्या पत्नी, मुलांचे दागिने विकून किंवा गहाण टाकून पैसे भरले. काहींनी सदनिकाही गहाण टाकून पैसे भरले, तर काहींनी सदनिकाही विकल्या. काहीजणांचे सर्वस्व लुटल्यामुळे त्यांना अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. आरोपी जडेजा सांगत असे, ‘मला देवी प्रसन्न झाली असून, त्यामुळे मी समाजाचा उद्धार करणार आहे.’ सुरुवातीला त्याने काही जणांना तिप्पट रक्कम देऊन समाजाचा विश्वास संपादन केला; परंतु उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याने गाशा गुंडाळला.
अनेक राज्यांतील लोकांची त्याने फसवणूक केली आहे. पिंपरीतील कंजारभाट समाजातील लोकांची मोठय़ा प्रमाणात फसवणूक झाली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी माडीला पैसे दिले याचा कोणताही लेखी पुरावा त्यांच्याकडे नसल्याने पोलीस खात्यात त्यांना तक्रार देता येत नाही.
आजही अंधश्रद्धा मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने त्याविरुद्ध कायदा मंजूर करून त्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विज्ञानयुगात नागरिक मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धेला बळी पडतात, ही लाजिरवाणी घटना असून, सामाजिक संस्था, प्रसिद्धीमाध्यमे यांनी याबाबतीत समाजप्रबोधन करणे जरुरीचे आहे.
प्र. द. काळुसकर, सहकारनगर, पुणे

महाविद्यालयांची मनमानी: विद्यापीठाने दखल घ्यावी
ल्ल महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक पूर्णत: संचालक- उच्च शिक्षण यांच्या आधिपत्यानुसार होते व विद्यापीठाच्या निवड समितीकडून कसोटीच्या आधारे निवड केली जाते, जेणेकरून विद्यापीठ अनुदान मंडळाला एकंदरीत पारदर्शकता आणावयाची असते. असे असताना एक गोष्ट खटकते, ती म्हणजे ज्या प्राध्यापकाने अनेक वर्षे अव्याहतपणे शैक्षणिक सेवा केली असते अशा प्राध्यापकाला प्राचार्य व व्यवस्थापन क्षणाचा विलंब न लावता खोटेनाटे आरोप ठेवून त्याला सेवेतून दूर करतात, अशा वेळी संचालक व कुलगुरूंची परवानगी का घेतली जात नाही?
महाविद्यालये संचालक व कुलगुरूंच्या आधिपत्याखाली चालतात तर मग एखाद्याला नोकरीवरून दूर करताना त्यांची मते विचारात का घेतली जात नाहीत? आजपर्यंत कोणत्याही शिक्षक संघटनेने याचा विचार का केला नाही? व्यवस्थापन आपल्या मर्जीतल्या माणसाला चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करून निकाल पाहिजे तसा तयार करून घेते. अशात विद्यापीठ अन्याय निवारण मंडळाची आवश्यकता काय? आज अनेक महाविद्यालयांमध्ये या प्रकारची हुकूमशाही चालू आहे, याचा अर्थ काय?
प्रा. डॉ. सूर्यकांत येरागी, मुलुंड, मुंबई

‘मूठभरांचा विकास आणि उर्वरितांचे जीवन भकास’ असे धोरण नको
ल्ल ‘सेझचा झाला नॅनो’ (८ जून) हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात आपण सर्व मुद्दे सविस्तरपणे मांडलेले आहेत. त्यातही आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जास्त भर दिला आहे असे वाटते. साहजिकच आहे, शेतकरी जास्त पैसे मिळविण्यासाठी आंदोलन करणारच. काही मिळविण्यासाठी आंदोलन करणे हा एकच उपाय सर्वाना माहीत आहे. कामगार संघटनांनी पूर्वी आंदोलनावरच जोर देऊन त्यांच्या मागण्या पदरात पाडून घेतल्या, त्याला शेतकरी कसा अपवाद असू शकेल?
आपण भारतीय उद्योगपतींनी प्रकल्पातील काही वाटा शेतकऱ्यांना देण्याचा विचार केला पाहिजे असे मत प्रदर्शित केलेले आहे. मान्य आहे की, उद्योगपती जेव्हा जागा घेतात, तेव्हा फक्त पैशाच्या जोरावर जागा बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना फायदे व तोटे यांचा संबंध समजावयाला पाहिजे, पण असे केलेले दिसत नाही.
तसे केले असते तर नेत्यांचा सहभाग शेतकऱ्यांना आंदोलनासाठी मिळाला नसता. शिकलेले शेतकरी फार थोडे आहेत. ‘उद्योगपती हे लुटायला आलेले आहेत’ असा जर शेतकऱ्यांचा समज आहे, तर तो प्रथम शेतकऱ्यांशी संवाद साधून दूर केला पाहिजे, त्यासाठी पुष्कळ प्रयत्न नक्कीच करावे लागतील.
विकासाची वाट कष्टकरी, गरीब आणि शेतकऱ्यांच्या दारातून जात असेल तर त्यांच्या सक्रिय सहभागाखेरीज आणि सर्वसामान्य जनतेखेरीज पुढचा प्रवास करणे शक्य होणार नाही हे आतापर्यंतच्या घटनांवरून सिद्ध झालेले आहे. ‘मूठभरांचा विकास आणि उर्वरितांचे जीवन भकास’ अशा तऱ्हेची धोरणे ठरवून विकास होऊच शकणार नाही. सरकारने इथे जरूर लक्ष दिले पाहिजे.
पैशाच्या जोरावर आपण प्रतिसरकार चालवू शकतो या आवेशात काही बडय़ा उद्योगांनी ‘एसईझेड’चा सपाटा लावला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अनेक अर्थानी महत्त्वाचा आहे.
रा. आ. कंटक, चारकोप, मुंबई

प्रेम व वासनेतील फरक ओळखा!
ल्ल मीरा रोड येथील प्रियकराने आपल्या इतर मित्रांना घेऊन आपल्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची विकृत घटना घडली. या घटनेत खरी चूक प्रियकराची असली तरी ती दुर्दैवी मुलगीही त्याला तेवढीच जबाबदार आहे. एखादी तरुणी इतकी वर्षे ज्याच्यावर प्रेम करते, त्याला धड ओळखू शकत नाही याला काय म्हणावे? प्रियकराची वासना कितीही असली तरी लग्नाआधी लॉजवर जाऊन शरीरसंबंध ठेवणे हे योग्य आहे काय?
सामाजिक व स्वत:च्या मानसिक, शारीरिक आरोग्याचा जरा विचारही त्या मुलीनेच नव्हे तर इतरांनीही करावयास हवा. कोणतीही समंजस व प्रेम करणारी व्यक्ती आपल्या प्रियकराला अंगाला हातही लावू देणार नाही; परंतु आताच्या मुलींना प्रेम व वासनेमधील फरकच कळत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
‘माझ्याशी लग्न झाल्यानंतरच मी अंगाला हात लावू देईन’, अशी प्रतिज्ञा ज्या वेळी प्रेमिका करील तोच खरा सुदिन म्हणावा लागेल व तेव्हाच प्रियकराच्या खऱ्या प्रेमाची ओळख पटेल.
अरुण खटावकर, लालबाग, मुंबई