Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

कोल्हापूर विभागात सांगलीची अपूर्वा पावसकर प्रथम
कोल्हापूर, २५ जून / विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत सांगलीच्या एस. आर. मालू हायस्कूलची विद्यार्थिनी अपूर्वा जगदीश पावसकर हिने गुणवत्तायादीत सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. अपूर्वाला ६५० पैकी ६३२ गुण (९७.२३ टक्के) मिळाले आहेत. तिच्या या यशाने सांगलीचे पावसकर कुटुंबीय आभाळ ठेंगणे होण्याच्या अनुभूतीचा आनंद घेत आहे.

राज्यांत मागासवर्गीयांमध्ये प्रथम व कोल्हापूर विभागात दुसरा आलेल्या पीयूष सावंतला पेढा भरवून त्याचे कौतुक करताना वडील शहाजी व आई ज्योती.

 

सातारा शहरातील सोनिया लुणावत कोल्हापूर विभागात सर्वसाधारण यादीत व मुलींमध्ये दुसरी आली. तिचे अभिनंदन करताना वडील राजेंद्र व आई सीमा.

पुणे विभागात सांगोल्याची श्रुती लाटणे दुसरी आली. तिचे कौतुक करताना तिचे आई-वडील.

 

 

सुजाण नागरिकांनी जबाबदारी पेलल्यास सांस्कृतिक नेतृत्व भारताकडे- केतकर
कोल्हापूर, २५ जून / प्रतिनिधी
नवीन युवापिढीतील मतदार आणि पश्चाताप झालेले मतदार यांनी भारतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून एक स्थिर सरकार अस्तित्वात आणले. राजकीय स्थिरता आणल्यानंतरही या देशातील सूजाण नागरिकांनी पुढच्या जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेतले तर भारत हा भारतीय उपखंडावर निश्चितपणे सांस्कृतिक नेतृत्व करू शकेल असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत आणि दै. लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी आज सायंकाळी येथे बोलताना व्यक्त केला. शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शाहू जयंती व्याख्यानमालेत ‘भारतीय उपखंडासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री श्री.हर्षवर्धन पाटील हे होते.

श्रुती लाटणे व रेणुका राठोडचे यश;
सोलापूर जिल्हय़ाचा ७८ टक्के निकाल ‘सावित्रीच्या लेकीं’नी मारली बाजी
सोलापूर, २५ जून/प्रतिनिधी
सोलापूर जिल्हय़ाचा दहावी परीक्षेचा निकाल ८६.६३ टक्के लागला असून, सांगोल्याच्या विद्या मंदिर शाळेची श्रुती संतोष लाटणे ही पुणे विभागात ९६.१५ टक्के गुण मिळवून दुसरी आली, तर सोलापूरच्या दयानंद आसावा प्रशालेची रेणुका हरिश्चंद्र राठोड ही ९६ टक्के गुण मिळवून तिसरी आणि मागासवर्गीयांत पहिली आली. नेहमीप्रमाणे यंदाही या परीक्षेत ‘सावित्रीच्या लेकीं’नी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

साताऱ्याचा पीयूष सावंत मागासवर्गीयांत राज्यात पहिला
सोनिया लुणावत विभागात व मुलींत दुसरी
सातारा, २५ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने मार्चमध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) सातारा जिल्ह्य़ाचा निकाल ८०.२२ टक्के एवढा लागला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कल्याणी हायस्कूलचा विद्यार्थी पीयूष शहाजी सावंत याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांत राज्यात, तर कोल्हापूर विभागात मुलांत पहिला येण्याचा बहुमान पटकावला, तर डी. ई. सोसायटीच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सोनिया राजेंद्र लुणावत हिने ६३१ (९७.०७ टक्के) गुण मिळवून कोल्हापूर विभागात मुलींत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

कोल्हापूर विभागात पहिले तीनही क्रमांक पटकावले सांगलीने!
तेवीस शाळा निघाल्या शंभर नंबरी
सांगली, २५ जून / प्रतिनिधी
कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत सांगलीच्या एस. आर. मालू हायस्कूलचे अपूर्वा जगदीश पावसकर हिने ९७.२३ टक्के गुण मिळवून कोल्हापूर विभागात पहिली येण्याचा बहुमान मिळविला. याच हायस्कूलच्या अक्षय बसवेश्वर शेटे याने ९७.०७ टक्के गुण मिळवून कोल्हापूर विभागात व सांगली जिल्हय़ात दुसरा, तर तासगावच्या एस. आर. भारती विद्यामंदिरची स्नेहल दत्तात्रय मोहिते हिने ९६.९२ टक्के गुण मिळवून कोल्हापूर विभागात तिसरा क्रमांक मिळविला. कोल्हापूर विभागात गुणवत्तायादीत पहिले तीन क्रमांक मिळवून सांगली जिल्हय़ाने प्रथमच इतिहास घडविला आहे. दहावीच्या गुणवत्तायादीवर पुन्हा एकदा सावित्रींच्याच लेकींचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले.

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन महिला वारकरी ठार
फलटण, २५ जून / वार्ताहर
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन महिला वारकरी वेगवेगळ्या अपघातात ठार झाल्या आहेत. पुणे- पंढरपूर मार्गावर तांबमाळ (ता. फलटण) गावच्या हद्दीत मालट्रक (एमच १४, एफ ६८६८) ने दिलेल्या धडकेत परभणी येथील शांताबाई बाबुराव काकडे (वय ६१) या ठार झाल्या तर पडजल येथे मारुती व्हॅनचे (एमएच १५ डी ०६५८) दिलेल्या धडकेत ताराबाई बोडके (वय ५७, रा. कल्याण) या ठार झाल्या आहेत.

साताऱ्यात आज सामाजिक न्यायदिन
सातारा, २५ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहूमहाराज जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्यायदिन सोहळा’ येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी अशोक कांबळे यांनी दिली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, समाजकल्याण सभापती कृष्णराव भिसे, नगराध्यक्षा वैशाली महामुनी, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. प्रश्नचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे याप्रसंगी भाषण होणार आहे.

आटपाडी तालुक्याचा निकाल ८० टक्क्यांवर
आटपाडी, २५ जून / वार्ताहर

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा आटपाडी तालुक्याचा निकाल ८०.४९ टक्के लागला आहे. मार्च २००९ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेस दोन हजार चार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक हजार ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आटपाडी येथील लोणारी गुरुकुल विद्यालय, एकता मोरे पाटील विद्यालय दिघंची व झरे पंचक्रोशी विद्यालय या तीन विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. झरे येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाची विद्यार्थिनी स्वप्न् ााली अशोक पडळकर हिने ९५.२३ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. आज दिवसभर दहावीच्या निकालामुळे शाळा-विद्यालयाचा परिसर गजबजलेला होता.

मूलनिवासी संघाचा रविवारी मोर्चा
सांगली, २५ जून / प्रतिनिधी
राष्ट्रीय मूलनिवासी संघातर्फे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघातर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. मूलनिवासी लोकांच्याविरोधात शासन राबवत असणाऱ्या विविध धोरणांच्या विरोधासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रश्नथमिक, माध्यमिक, उच्च व व्यावसायिक शिक्षणाचा बाजार मांडून मूलनिवासींना शिक्षणापासून दूर लोटले जात आहे. तसेच सहावा वेतन आयोग हा पूर्वग्रहदूषित आहे. विमा क्षेत्राचे खासगीकरण, आरक्षणाच्या नावावर जाती- जातीत लावली जाणारी भांडणे हे थांबले पाहिजे, अशी मागणी प्रसिध्दी पत्रकात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण न देणे हे एक षडयंत्र असून आम्ही त्याचा तीव्र विरोध करतो, असेही पत्रकात म्हटले आहे.

श्री संतकृपा पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू
कराड, २५ जून/वार्ताहर

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे नियोजित डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज या वर्षापासून सुरू झाले आहे. त्यात मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकल या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोकराव भावके यांनी दिली. घोगाव (ता. कराड) येथून कार्यरत असलेल्या श्री संतकृपा शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे. बी. फार्मसी व डी. फार्मसी अभ्यासक्रमात शंभर टक्के निकालाची परंपरा आहे. अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्यांनी गेट परीक्षेतही प्रशंसनीय यश मिळविले आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिकून परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात संस्थेने प्रथम क्रमांकाची चार पारितोषिके पटकावली आहेत.

जितेंद्र वेद यांचे निधन
सोलापूर, २५ जून/प्रतिनिधी
येथील चाटी गल्लीतील कापडाचे प्रसिध्द व्यापारी तथा जैन समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयचंद अमरचंद वेद यांचे चिरंजीव जितेंद्र वेद यांचे गुरुवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. ते अवघे २३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, गन भगिनी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मारवाडी गुजर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्र वेद यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले होते. लहानवयापासूनच हुशार व अभ्यासू विद्याथी म्हणून ते ओळखले जात. स्मशामभूमीत अंत्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत रमेश जैन, तिलोकचंद निमाणी, बाबूशेठ तोष्णीवाल अ‍ॅड.विजय मराठे, डॉ. पी. के.जोशी, तिलोकचंद मुनोत, राजगोपाल भुतडा, इंदरमल जैन, महेंद्र शहा आदी सहभागी झाले होते.