Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

दहावीत पुन्हा.. लातूर पॅटर्न!
पुणे, २५ जून/खास प्रतिनिधी
लातूर विभागातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाच्या शिल्पा बसवराज हिरेमठने ६५० पैकी ६४१ गुण (९८.६१ टक्के) मिळवून दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला. बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालामधील फुगवटा कमी होण्याची भीती फोल ठरवित राज्याचा निकाल दोन टक्क्यांनी वाढत ८०.१८ टक्के लागला. नियमित विद्यार्थ्यांच्या निकालात झालेली साडेतीन टक्क्यांची घट आणि पुनर्परीक्षार्थीचा १३ टक्क्यांनी वाढलेला निकाल असा विरोधाभास दहावीतही कायम राहिला. तीन विभागीय मंडळांमध्ये प्रथम येत मुलांनीही यंदा बाजी मारली. मंडळनिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- पुणे - ८३.४६, नागपूर - ७६.८५, औरंगाबाद - ८०.९०, मुंबई - ७८.६६, कोल्हापूर - ७३.६५, अमरावती - ८३.१९, नाशिक - ८५, लातूर - ८१.४०.

मुलांपेक्षा सरस कामगिरीची राज्यातील प्रथा मुंबई विभागातही कायम राहिली आहे. विशेष म्हणजे मुंबईत पहिले तिन्ही क्रमांक मुलींनीच पटकाविले असून या तिघी ठाणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई विभागातील उत्तीर्णाचे प्रमाण ७९ टक्के आहे. तर विभागातील २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
राज्यातील दोन लाख नऊ हजार ५७० विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून डिस्टिंक्शन मिळविले. चार लाख ३७ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली, तर चार लाख ६६ हजार ४८९ विद्यार्थ्यांना दुसरी श्रेणी मिळाली. अंतर्गत गुणदान व तोंडी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ झाली असून त्यामुळेच ‘फर्स्ट क्लासवाले’ही वाढले आहेत!

मुंबईतल्या तिघीही ठाण्याच्या..
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

मुलांपेक्षा सरस कामगिरीची राज्यातील प्रथा मुंबई विभागातही कायम राहिली आहे. विशेष म्हणजे मुंबईत पहिले तिन्ही क्रमांक मुलींनीच पटकाविले असून या तिघी ठाणे जिल्ह्यातील आहेत. माध्यमिक शालान्त परीक्षेत मुंबई विभागातून ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या सोनाली शांताराम चव्हाण हिने ९६.४६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेफाली म्हाडदळकर (सरस्वती हायस्कूल, ठाणे), संकेत दीपक पाटील (सेंट अ‍ॅन्थोनी हायस्कूल, वसई), निशिगंधा यशवंत केरूरे (बालमोहन विद्यामंदिर, दादर) हे तिघे ९६.३० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तृतीय क्रमांकदेखील तेजल संदेश प्रधान (ए. के. जोशी स्कूल, ठाणे) व मृण्मयी पद्माकर जाधव (व्ही. एन. सुळे गुरुजी विद्यालय, दादर) यांच्यामध्ये विभागला असून त्यांना ९६.१५ टक्के गुण मिळाले आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज भरणे व सादर करण २६, २७, २९ जून ते ३ जुलै
प्रवेश अर्जातील हरकती व त्रुटींची पुर्तता ४ व ६ जुलै
सर्वसाधारण गुणवत्ता यादी ७ ते १३ जुलै
पहिली गुणवत्ता यादी १४ जुलै
पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश १५,१६,१७,१८ व २० जुलै
दुसरी गुणवत्ता यादी २४ जुलै
दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश २५,२७, २८ जुलै
तिसरी गुणवत्ता यादी ३१ जुलै
तिसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
व शुल्क स्वीकारणे १ व ३ ऑगस्ट
रिक्त जागांवर प्रवेश सुविधा ४ ऑगस्टपासून पुढे
संकेतस्थळाचा पत्ता : http://fyjc.org.in/mumbai

दहावी बोर्डाची परीक्षा नकोच!
कपिल सिब्बल यांची सुचना

नवी दिल्ली, २५ जून/खास प्रतिनिधी
दहावी बोर्डाच्या परीक्षेचे टेंशन आणि भीतीतून देशातील कोटय़वधी विद्यार्थ्यांंना मुक्त करण्यासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षाच संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी आज येथे मांडला. दहावी बोर्डाच्या परीक्षेऐवजी नियमित अंतराने परीक्षा व्हायला हव्या, असे सिब्बल म्हणाले. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत सिब्बल यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती देताना सिब्बल यांनी परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि दहावीची परीक्षा वैकल्पिक करण्याचा प्रस्ताव मांडला.

कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय
रत्नागिरी, २५ जून/खास प्रतिनिधी

सुमारे दोन आठवडय़ांच्या खंडानंतर गेल्या दोन दिवसात कोकणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्राचा मुहूर्तावर गेल्या ६ व ७ जून रोजी कोकणात मान्सूनने हजेरी लावली, पण त्यानंतर तो गायबच झाल्यामुळे पेरण्या करून बसलेल्या शेतकऱ्यांवर हवालदिल होण्याची पाळी आली.

पद्मसिंहांच्या उस्मानाबाद, तेर येथील घरांना सील
उस्मानाबाद, २५ जून/वार्ताहर

काँग्रेसचे दिवंगत नेते पवन राजेनिंबाळकर यांच्या खुनाच्या गुन्ह्य़ात अटकेत असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद आणि तेर येथील घरांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज छापा टाकला. या दोन्ही घरांना टाळे ठोकण्यात आले आहे. वादग्रस्त ‘तेरणा ट्रस्ट’च्या कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आले. या गुन्ह्य़ात अटकेत असलेल्या आरोपी सतीश मंदाडे व मोहन शुल्क यांच्या घरांवरही छापा टाकण्यात आला.

रिलायन्सच्या वीज दरवाढीचा फेरआढावा घेण्याचे आदेश
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

मुंबई उपनगराला विजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या भरमसाठ बिलांविरुद्ध उसळलेल्या जनक्षोभाची गंभीर दखल राज्य सरकारने आज घेतली. विद्युत कायदा २००३ मधील तरतुदींचा प्रथमच वापर करून सरकारने राज्य विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) रिलायन्स कंपनीला दिलेल्या वीज दरवाढीच्या मंजुरीचा फेरआढावा घ्या, असे आदेश दिले. आयोगाने ही चौकशी येत्या १५ दिवसांत पूर्ण करून उचित निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारने आयोगाला कळविले असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी आज मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत दिली.

देशातील प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्याची योजना
नंदन नीलेकणी यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली, २५ जून/खास प्रतिनिधी
भारतातील सव्वाशे कोटी लोकांना राष्ट्रीय ओळखपत्रे प्रदान करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेताना आज मनमोहन सिंग सरकारने त्यासाठी स्थापन केलेल्या भारतीय विशेष ओळखपत्र प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) अध्यक्षपदी इंफोसिस टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांची नियुक्ती केली. नीलेकणी यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला असून ते येत्या ९ जुलै रोजी इंफोसिसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नीलेकणी यांची युआयडीएआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वीज वितरण कंपन्यांना अनुदान द्या - शिवसेना
मुंबई, २५ जून/प्रतिनिधी

रिलायन्सच्या भरमसाठ दरवाढीचा आढावा घेण्याकरिता राज्य सरकारने केलेला हस्तक्षेप पुरेसा नसून वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांना राज्य शासनाने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामदास कदम व आमदार सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. एक जुलै रोजी उपनगरातील वीज ग्राहकांच्या हातात नवीन दरवाढीचा समावेश असलेले बिल पडेल. त्यावेळी ते मोठय़ा रकमेचे असेल तर ग्राहक प्रखर आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.कदम यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी शासनाने वीज कायद्याच्या कलम १०८ नुसार शासनाने वीज दरवाढीच्या प्रश्नात हस्तक्षेप करावा या मागणीबरोबरच कलम ६५ अन्वये वीज वितरण कंपन्यांना अनुदान देण्याचीही मागणी केली. कदम म्हणाले की, दिल्लीत वीज वितरण करणाऱ्या कंपन्या अनेक असल्या तरी विजेचे दर एकच आहेत. गुजरातमध्येही वीज दर नियंत्रित आहेत. त्यामुळे मुंबईतही अनुदान देऊन दर कमी करावे.

 


मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेली अंजली जाधव म्हणते..
यशात ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’चाही वाटा


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी