Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत लातूर विभागात उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी शिल्पा बसवराज हिरेमठ हिने राज्यात पहिला क्रमांक पटकवला. तिचे यश साजरे करीत शाळेने गुरुवारी उमरग्यात मिरवणूक काढली. संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील, मुख्याध्यापक शिवानंद दळगडे, प्राचार्य दिलीप गरुड व शिल्पाचे वडील बसवराज हिरेमठ त्यात सहभागी झाले होते.

लातूरचा निकाल ८१ टक्के,औरंगाबादचा ८३ टक्के
औरंगाबाद विभागात परभणीचा करण कलानी पहिला

मुलींमध्ये उत्कर्षां सूर्यवंशी व हर्षदा पाटील संयुक्तपणे पहिल्या स्थानावर
मागासवर्गीयांत मुकेश साळुंके पहिला
औरंगाबाद विभागाचा निकाल ८३.७१ टक्के.
औरंगाबाद, २५ जून/खास प्रतिनिधी
माध्यमिक शालान्त परीक्षेत परभणीच्या क्वीन्स इंग्लिश स्कूलचा करण राजगोपाल कलानी याने ६२८ गुण घेऊन औरंगाबाद विभागात पहिला क्रमांक पटकाविला आहे. मुलींमध्ये शारदा मंदिरची उत्कर्षां दिलीप सूर्यवंशी व सोनामाता विद्यालयाची हर्षदा भानुदास पाटील यांनी ६२६ गुण मिळवून संयुक्तपणे पहिला क्रमांक मिळविला. जयभवानी विद्यामंदिरच्या मुकेश सुभाष साळुंके (६१९ गुण) याने विभागात मागासवर्गीयांमध्ये पहिला क्रमांक पटकाविला. विभागाचा निकाल ८३.७१ टक्के लागला.

परभणी जिल्ह्य़ाचा निकाल ६७.६३ टक्के
परभणी, २५ जून/वार्ताहर

बारावीपाठोपाठ दहावीच्याही निकालात परभणी जिल्ह्य़ाने बाजी मारली. क्वीन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी करण राजगोपाल कालानी ९६.६१ टक्के गुण घेऊन औरंगाबाद विभागात पहिला आला आहे. विभागातूनच तिसरी आलेली आयेशा हारुण तांबोळी (९६.१५ टक्के) ही विद्यार्थिनी येथील क्वीन्स स्कूलचीच आहे. मागसवर्गीयात मुलीत सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी शीतल राजेंद्रकुमार सावंत ही विवेकानंद इंग्लिश स्कूलची असून तिने ९५.०७ टक्के एवढे गुण घेतले आहेत.

स्पर्श
उन्हाळ्यात दिवसा बसचा प्रवास करणं ही एक भयानक शिक्षा असते. खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या झळा आणि घामाची चिकचिक यांनी जीव हैराण होतो. गर्दी असल्यावर तर गुदमरीने हे हाल असह्य़च होतात. पण हे सगळं सोसून घरी यावं, थेट बाथरूममध्ये शिरावं आणि थंड पाण्याने सचैल स्नान करावं. अननुभूत असा आनंद या स्नानाने मिळतो. स्पर्शातून तो मिळतो. तगमगून गेलेल्या देहावर पाण्याचा तांब्या ओतला जातो, तेव्हा त्या पाण्याच्या जीवनदायी स्पर्शाने देहातील अणूरेणूतून अपार अशा सुखाचा जो हुंकार येतो त्याचं वर्णन शब्दांपलीकडचंच.

शिल्पाच्या यशाने उमरग्यामध्ये जल्लोष
लातूर, २५ जून/वार्ताहर

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत लातूर विभागातील उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी शिल्पा बसवराज हिरेमठ हिने ६४१ गुण घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला. परीक्षा मंडळाच्या लातूर विभागाचे अध्यक्ष एम. आर. कदम व प्रभारी विभागीय सचिव बी. जी. चौरे यांनी सकाळी ११ वाजता परीक्षा मंडळाच्या कार्यालयात निकालाची माहिती पत्रकारांना दिली.

नांदेड जिल्ह्य़ाचा निकाल ८९ टक्के
नांदेड, २५ जून/वार्ताहर

सामूहिक कॉपी प्रकरणामुळे बारावीच्या निकालादरम्यान संपूर्ण राज्यात गाजलेल्या नांदेड जिल्ह्य़ाचा दहावीचा निकाल ८९.५६ टक्के लागला. लातूर परीक्षा मंडळात नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्ह्य़ातील ५८५ शाळांतून ३९ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३९ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३५ हजार ६३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

भाजपच्या विभागीय कार्यालयात मारामारी
औरंगाबाद, २५ जून/प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात आज सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान जोरदार मारामारी झाली. मोटर अंगावर येण्यावरून वाद सुरू झाला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रथम मोटरचालकाला मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या चालकाने बाहेर जाऊन २० ते २५ जणांना आणून कर्मचाऱ्यांना मारले. त्यानंतर भा. ज. प. कार्यकर्त्यांनी मोटारचालकाला मारले.

सहस्त्रमुळी गावात गॅस्ट्रोचे ५० रुग्ण
औरंगाबाद, २५ जून /प्रतिनिधी

शहरापासून जवळच असलेल्या सहस्त्रमुळी गावात काल रात्री अचानक ४८ जणांना गॅस्ट्रो-कॉलराची लागण झाली. प्रकृती खालावलेल्या १६ जणांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्णांवर आरोग्य पथकाकडून उपचार करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे ही लागण झाली असल्याचा संशय असल्यामुळे गावातील पाणीसाठय़ाचा वापर पिण्यासाठी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. एल. एन. डोळस, तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांनी गावाला भेट दिली.

परतूरमध्ये पाऊस
परतूर, २५ जून/वार्ताहर
मोठय़ा प्रतीक्षेनंतर आज सायंकाळी शहर व परिसरात पावसाचे आगमन झाले. दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला पावसास सुरुवात झाली. हलक्या ते मध्यम स्वरूपात पडलेल्या या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

चार हजार विद्यार्थ्यांना दोन परीक्षांना मनाई; सामुदायिक कॉपी
लातूर, २५ जून/वार्ताहर
लातूर परीक्षा मंडळांतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षेच्या काळात सामुदायिक कॉपी प्रकरणात दोषी ठरलेल्या ३९४५ विद्यार्थ्यांना दोन परीक्षांस प्रतिबंध करण्याची शिक्षा करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष एम. आर. कदम यांनी सांगितले. मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत मुखेड तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सामुदायिक कॉपी झाल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राजकीय दडपणाचा वापर करण्यात आला. त्याला परीक्षा मंडळ बळी पडले नाही. दहावीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर परीक्षा मंडळातील सदस्यांची बैठक झाली. त्यात बारावी परीक्षेतील ३ हजार ३ व दहावीतील ९४२ विद्यार्थ्यांची मार्चची परीक्षा रद्द व ऑक्टोबरच्या परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे.

अपघातात परभणीतील वारकरी महिला ठार
फलटण, २५ जून / वार्ताहर

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन महिला वारकरी वेगवेगळ्या अपघातात ठार झाल्या आहेत. पुणे- पंढरपूर मार्गावर तांबमाळ (ता. फलटण) गावच्या हद्दीत मालमोटर (एमच १४, एफ ६८६८) ने दिलेल्या धडकेत परभणी येथील शांताबाई बाबुराव काकडे (वय ६१) या ठार झाल्या. तसेच पडजल येथे मारुती व्हॅनचे (एमएच १५ डी ०६५८) दिलेल्या धडकेत ताराबाई बोडके (वय ५७, रा. कल्याण) या ठार झाल्या. याबाबत संबंधित चालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खासगी वीज कामगारांना एकजटीचे आवाहन
जालना, २५ जून/वार्ताहर
वीज कंपनीतील खासगी कामगारांनी एकत्र येऊन न्याय हक्कांसाठी लढा उभारावा, असे आवाहन बी. एम. कुलकर्णी यांनी केले. वीज वितरण व पारेषण कंपनीतील खासगी कामगारांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. सर्वश्री. जगन्नाथ भुतेकर, प्रकाश कुटे, गिरीश कुलकर्णी, कृष्णा वानखेडे त्यास उपस्थित होते. प्रारंभी वीज कंपनीतील अपघाती मृत्यू पावलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वीज कंपनीतील रिक्त जागांवर कंपनीत खासगी काम करणाऱ्यांना घ्यावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

भोकरमध्ये भरदिवसा महिलेचा खून
भोकर, २५ जून/वार्ताहर

शेतात काम करण्यास गेलेल्या महिलेचा आज सकाळी हात-पाय बांधून दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शहरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या जिजाबाई नामदेव सोनसळे (वय ५०) आज सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या. शहराजवळच मुदखेड रस्त्यावर सामाजिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानांलगत हे शेत आहे. काही आरोपींनी जिजाबाईंना फरफटत नाल्यात नेऊन साडीने त्यांचे हाय-पाय बांधले. गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याची फुले, हातातील दंडकडे काढून दगडाने ठेचून साडीने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला. जिजाबाई यांचा खून कशासाठी झाला व कोणी केला हे कळाले नाही. मुलगा सिद्धार्थ सोनसळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

दोन पोलीस शिपाई ६ महिन्यांसाठी निलंबित
उदगीर, २५ जून/वार्ताहर

शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हा शाखेतील शिपाई संतोष कलमे व कैलास हापसे यांना सहा महिन्यांकरिता निलंबित केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत केदार यांनी दिली.
शहर ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून कलम व हापसे ही जोडी प्रकाशझोतात आली होती. गुन्हा शाखेत काम करणाऱ्या दोघांनी विविध प्रकरणे उघडकीस आणली होती; परंतु संगणक चोरी प्रकरणात त्यांनी केलेला हलगर्जीपणा व अरेरावीला कंटाळून एका अर्जदाराने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय लाठकर यांनी कलमे व हापसे यांना निलंबित केले. त्यांना मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

शिवसेनेचा आज मेळावा
बीड, २५ जून/वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवारी) मुक्ता गार्डन येथे दोन सत्रांत होत असून पदाधिकाऱ्यांनी हजर राहावे, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिवसेना सचिव अनिल देसाई, संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.

निवृत्त पोलिसाच्या मुलाला लुटले
नांदेड, २५ जून/वार्ताहर

निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम आगाशे यांचे चिरंजीव अनुप आगाशे याला चोरांनी तलवारीचा धाक दाखवून १५ हजार रुपयांचा ऐवज पळविला. वरिष्ठांनी तंबी दिल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कैलासनगर परिसरात राहणारा अनुप मित्र चंद्रशेखर लांडगे याच्यासमवेत काल रात्री साडेदहाच्या सुमारास घरी जात होता. मोटरसायकलवर आलेल्या दोन चोरांनी तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम, सोन्याची अंगठी व मोबाईल असा १५ हजार रुपयांचा ऐवज पळविला. ही कैफियत शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

जिल्हा नियोजन समितीची आज औरंगाबादमध्ये बैठक
औरंगाबाद, २५ जून/खास प्रतिनिधी

शालेय शिक्षणामंत्री राधाकृष्ण विखे यांना औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथमच जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिका, विभागीय आयुक्त आणि शासकीय विभागाच्या खाते प्रमुखांसमवेत त्यांची साडेदहा वाजता बैठक होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता मौलाना आझाद विचारमंचच्या प्रतिनिधींची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पद्मपुऱ्यातील महिलेचा काविळीने मृत्यू
औरंगाबाद, २५ जून /प्रतिनिधी

पद्मपुरा येथील संगीता दिलीप भगनुरे (वय ३५) यांचा आज काविळीच्या आजाराने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शहराच्या अनेक भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत असताना एका महिलेचा काविळामुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. या मृत्यूबद्दल पालिका प्रशासनाला कळविण्यात आले नसल्याचे पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण देगावकर यांनी सांगितले. अधिकृतपणे माहिती मिळाली नसली तरी या भागातील पाण्याची तपासणी करण्याबरोबरच अन्य खबरदारी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तरुणीने रागाच्या भरात विष घेतले
औरंगाबाद, २५ जून/प्रतिनिधी

काळा दरवाजा परिसरात राहणाऱ्या जयश्री रवींद्र रगडे (वय १९) हिने आज दुपारी रागाच्या भरात विष प्राशन केले. तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयश्रीने विष घेतले असल्याचे दुपारी २ वाजता समोर आले. बॅटने मारहाण क्रिकेट खेळत असताना वाद झाल्याने झालेल्या मारहाणीत एकाला बॅटने बेदम मारहाण करण्यात आली. नासेर खान शब्बीर खान (वय १२) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. पीरबाजार येथे ही घटना घडली. त्याला शकील रशीद याने बॅटने मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. नासेर याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
औरंगाबाद, २५ जून/खास प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त उद्या (शुक्रवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जून सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सकाळी ८ वाजता भडकलगेटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी समता दिंडीला प्रारंभ होणार आहे. जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तापडिया नाटय़मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व शिष्यवृत्ती वितरण सोहळा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रकाश बच्छाव यांनी केले आहे.

‘मनसे’ची शहर कार्यकारिणी बरखास्त
औरंगाबाद, २५ जून /प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘चांगले’ काम केले नसल्याचा ठपका ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कनेते अतुल सरपोतदार यांच्या उपस्थितीत सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांतच नवीन कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर यांनी सांगितले.
राजेंद्र आदमाने हे शहराध्यक्ष तर सतनामसिंग गुलाटी हे सचिव होते. पक्ष स्थापनेपासून औरंगाबाद शहराची कार्यकारिणी बरखास्त करण्याची ही चौथी वेळ आहे. पदाधिकारी एकमेकांवर आरोप करत असल्यामुळे कोणत्याही शहराध्यक्षाला या पदावर जास्त काळ राहता आलेले नाही.

शालान्त परीक्षेत ‘एसबीओए’चा निकाल शंभर टक्के
औरंगाबाद, २५ जून /खास प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन एज्युकेशन सोसायटीच्या एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूलने उत्तम निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेतून १४० विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील ९० व त्यापेक्षा जास्त टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४७ आहे. ७६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी आले. ऋतुजा न्यायाधीश (९५.६९ टक्के), संहिता बिदरकर (९५.२३ टक्के), सुरभी प्रधान (९५.०७ टक्के) या विद्यार्थिनींनी बाजी मारली. भूषण मेहता (९८.१५ टक्के), अश्विन नांदापूरकर (९५.६९ टक्के), रेणुका कोराण्णे (९५.३८ टक्के) आणि सौरभ रंजलकर (९५.३८ टक्के) या खेळाडूंनीही २५ जादा गुणांसह घवघवीत यश प्राप्त केले आहे. या विद्यार्थ्यांनी शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा माने व अर्चना फडके तसेच संस्थेच्या विश्वस्त मंडळाने या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

गैरवर्तन करणाऱ्या उपनिरीक्षकाची बदली
नांदेड, २५ जून/वार्ताहर

नागरिकांशी हुज्जत घालणारे सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग फाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांनी आज हा आदेश काढला. नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी चौधरी प्रयत्नशील आहेत. परंतु काही पोलीस कर्मचारी त्यांच्या आदेशांची पायमल्ली करत आहेत.
असाच प्रकार बुधवारी रात्री घडला. फाडे आपल्या काही मित्रांसमवेत ‘ढवळे कॉर्नर’ येथे उभे होते. या वेळी त्यांनी काही नागरिकांशी हुज्जत घातली. एका पत्रकाराने ही बाब चौधरी यांना सांगितली. तक्रारीत तथ्य आढळल्याने आज फाडे यांची नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम कांबळे यांचे निधन
तुळजापूर, २५ जून/वार्ताहर
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक तुकाराम मऱ्याप्पा कांबळे यांचे अलीकडेच दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. विविध संस्था व संघटना यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शेतकरी कामगार पक्ष व डाव्या आघाडीच्या वतीने वारंवार करण्यात आलेल्या आंदोलनात तसेच गोवा मुक्तिसंग्रामात त्यांचा सहभाग होता. वास्तू उभारणी व बांधकामातील जाण असणाऱ्या कांबळे यांनी तालुक्यातील अनेक इमारतीच्या उभारणीत मोलाची कामगिरी बजावली होती.

पतसंस्थेस साडेपाच लाखांचा नफा
जालना, २५ जून/वार्ताहर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा जालना बाजार समितीच्या कार्यालयात झाली. संस्थेस या आर्थिक वर्षांत पाच लाख पन्नास हजार २०५ रुपये नफा झाला आहे. या वेळी बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर भांदरगे, संचालक विष्णू पवार, भीमराव भुजंग, भगवान कदम, रमेश तोतला, अनिल सोनी, प्रल्हाद खेडेकर, भाऊसाहेब घुगे यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेने सभासदांना ठेवीवर १२ टक्केप्रमाणे व्याज व लाभांश ७.५ टक्के वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संस्थेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षपदी घनसावंगी बाजार समितीचे सचिव एम. डी. डावकर होते.

रात्रशाळा विद्यार्थ्यांमध्ये प्रमोद घाटे पहिला
तुळजापूर, २५ जून/वार्ताहर

शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित तुळजापूर येथील महात्मा फुले रात्र शाळेचा विद्यार्थी प्रमोद राजेंद्र घाटे हा रात्रशाळा विद्यार्थ्यांमध्ये ६४.४६ टक्के गुण प्राप्त करून विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. घाटे याचे आई-वडील मजुरी करतात. तसेच तो स्वत: प्रासादिक भांडारात (दुकानात) मजुरीवर काम करतो. मुजरी करून आपल्या मातापित्यास हातभार लावणाऱ्या प्रमोदने विविध समस्यांवर मात करून मिळविलेले यश कौतुकास पात्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार मधुकरराव चव्हाण, संस्थेचे सचिव शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी तसेच शाळेचे मुख्याध्यापक वाय. एस. पठाण यांनी घाटे यांचे अभिनंदन केले.

साईयोगेश पांचाळ याला ९६ टक्के
भोकर, २५ जून/वार्ताहर

ज्येष्ठ पत्रकार बी. आर. पांचाळ यांचा मुलगा साईयोगेश बालाजी पांचाळ हा अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाचा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण घेऊन लातूर विभागात चमकला. भोकरच्या शैक्षणिक इतिहासात इतके गुण घेऊन कुणीच यश संपादन केले नव्हते हे विशेष. साईयोगेश पांचाळचे प्राथमिक शिक्षण भोकर येथील जि. प. नूतन शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्याने अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात प्रवेश घेतला. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के घेऊन भोकर तालुक्याचे नावलौकीक केल्याबद्दल साईयोगेश व त्याच्या आई-वडिलांचा भोकर ग्रामपंचायतीने सत्कार केला. या वेळी गटशिक्षणाधिकारी अशोक पाईकराव, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव आदबोरीकर, ग्रामविकास अधिकारी दिलीप बच्चेवार आदी उपस्थित होते.