Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दहावी बोर्डाची परीक्षा नकोच!
कपिल सिब्बल यांची सुचना
नवी दिल्ली, २५ जून/खास प्रतिनिधी
दहावी बोर्डाच्या परीक्षेचे टेंशन आणि भीतीतून देशातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी

 

दहावी बोर्डाच्या परीक्षाच संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी आज येथे मांडला. दहावी बोर्डाच्या परीक्षेऐवजी नियमित अंतराने परीक्षा व्हायला हव्या, असे सिब्बल म्हणाले. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरच नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत सिब्बल यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती देताना सिब्बल यांनी परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि दहावीची परीक्षा वैकल्पिक करण्याचा प्रस्ताव मांडला. गुणपद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालक, विशेषत मुलाच्या आईवर चांगलेच दडपण येते. या जाचातून त्यांची सुटका करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी शाळा वेगळ्या पद्धतीचा अवलंब करतील, असे सिब्बल म्हणाले. परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही म्हणून मुलांनी आत्महत्या केल्याचे आपण बघितले आहे. परीक्षांमुळे होणाऱ्या मानसिक आघाताचा अनुभव आपल्याही वाटय़ाला आला, असे हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर आणि देशातील अग्रगण्य वकील म्हणून नाव कमावणारे सिब्बल यांनी सांगितले. आपल्या देशातील मुलांनी दडपणाखाली शिकावे असे मला वाटत नाही. शिक्षणामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनावर आघात होऊ नये म्हणून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्नित शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये गुणांऐवजी ग्रेड पद्धती अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांला विद्यापीठात प्रवेश मिळावा हाच बोर्डाच्या परीक्षेचा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे कोणत्या शाळेत वा विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे, याचा विद्यार्थ्यांना निर्णय घेणे सोपे जावे म्हणून देशभरात एकाच बोर्डाची परीक्षा आयोजित करण्यासाठी सहमती निर्माण करण्याचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न असेल, असे सिब्बल यांनी सांगितले. तरुणांना दर्जेदार शिक्षण प्रदान करणे हेच देशापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. विस्तार, सर्वसमावेशकता आणि गुणवत्ता अशा तिहेरी उद्देशाने शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्याचा विचार त्यांनी मांडला.
असे आहेत सिब्बल यांचे प्रस्ताव..
दहावी बोर्डाच्या परीक्षेऐवजी नियमित अंतराने परीक्षा
विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब
नववी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये गुणांऐवजी ग्रेड पद्धती
देशभरात एकाच बोर्डाची परीक्षा आयोजित करण्यासाठी सहमती निर्माण करण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न