Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय
रत्नागिरी, २५ जून/खास प्रतिनिधी

सुमारे दोन आठवडय़ांच्या खंडानंतर गेल्या दोन दिवसात कोकणामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला

 

असून, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मृग नक्षत्राचा मुहूर्तावर गेल्या ६ व ७ जून रोजी कोकणात मान्सूनने हजेरी लावली, पण त्यानंतर तो गायबच झाल्यामुळे पेरण्या करून बसलेल्या शेतकऱ्यांवर हवालदिल होण्याची पाळी आली. अखेर गेल्या मंगळवारी (२३ जून) रत्नागिरी व सिंधुदुर्गाच्या बहुतेक सर्व तालुक्यांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. काल (२४ जून) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये मिळून सरासरी ३३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण (८१ मिमी), गुहागर (५५ मिमी), संगमेश्वर (४७ मिमी) आणि रत्नागिरी (३६.८ मिमी) या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडला.
आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २८.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील गुहागर (५४ मिमी), राजापूर (४१ मिमी), खेड (३१ मिमी) आणि दापोली (३० मिमी) या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या १ जूनपासून आजअखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी १९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे.