Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पद्मसिंहांच्या उस्मानाबाद, तेर येथील घरांना सील
उस्मानाबाद, २५ जून/वार्ताहर

काँग्रेसचे दिवंगत नेते पवन राजेनिंबाळकर यांच्या खुनाच्या गुन्ह्य़ात अटकेत असलेल्या डॉ.

 

पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद आणि तेर येथील घरांवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज छापा टाकला. या दोन्ही घरांना टाळे ठोकण्यात आले आहे. वादग्रस्त ‘तेरणा ट्रस्ट’च्या कार्यालयालाही टाळे ठोकण्यात आले.
या गुन्ह्य़ात अटकेत असलेल्या आरोपी सतीश मंदाडे व मोहन शुल्क यांच्या घरांवरही छापा टाकण्यात आला. घरांना टाळे ठोकल्यानंतर सी. बी. आय.च्या अधिकाऱ्यांनी तेरणा साखर कारखान्यातील कागदपत्रांचीही छाननी केली. सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. सन २००३-०७ या कालावधीतील आवश्यक त्या कागदपत्रांची मागणी करण्यात येणार असल्याचे सी. बी. आय.चे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना पूर्वकल्पना देऊन सी. बी. आय.च्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास डॉ. पाटील यांच्या उस्मानाबाद येथील बंगल्यावर छापा टाकला. घरात कोणीच नसल्यामुळे त्यांनी दरवाजे ‘सील’ केले. दरम्यान तेरणा ट्रस्टच्या कार्यालयासही सी. बी. आय.च्या पथकाने टाळे ठोकले. दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास पद्मसिंह पाटील यांच्या मूळ गावी, तेर येथील घरावर छापा टाकण्यात आला. घरांची झडती मात्र घेण्यात आली नाही. एकाच वेळी सतीश मंदाडे, पारसमल जैन व मोहन शुल्क यांच्या घरावरही छापे टाकल्याची माहिती श्री. ऋषिराजसिंह यांनी दिली.