Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

देशातील प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्याची योजना
नंदन नीलेकणी यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली, २५ जून/खास प्रतिनिधी

भारतातील सव्वाशे कोटी लोकांना राष्ट्रीय ओळखपत्रे प्रदान करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती

 

घेताना आज मनमोहन सिंग सरकारने त्यासाठी स्थापन केलेल्या भारतीय विशेष ओळखपत्र प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) अध्यक्षपदी इंफोसिस टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांची नियुक्ती केली. नीलेकणी यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला असून ते येत्या ९ जुलै रोजी इंफोसिसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील.
आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नीलेकणी यांची युआयडीएआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अंबिका सोनी यांनी ही माहिती दिली. देशातील प्रत्येक नागरिकाला विशेष ओळख क्रमांक प्रदान करण्याच्या प्रकल्पाची योजना आणि धोरणे निश्चित करून ती अंमलात आणणे आणि विशेष ओळख क्रमांकांचा केंद्रीय डाटाबेस तयार करून तो सतत अद्ययावत करण्याचे काम हे प्राधिकरण करणार आहे.
देशवासियांना विशेष ओळख क्रमांक देण्याचा प्रस्ताव गेल्या एक-दीड दशकांपासून केंद्रातील विविध सरकारांच्या विचाराधीन होता. पण मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जमध्ये या प्रकल्पाला चालना मिळत आहे. सुमारे १० ते १२ हजार कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय नियोजन आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून येत्या तीन वर्षांत तो कार्यान्वित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. इंफोसिससारख्या देशातील सर्वात मोठय़ा माहिती तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष म्हणून नंदन नीलेकणी यांचा अनुभव या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संसदेत मांडलेल्या लेखानुदान प्रस्तावात या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती.