Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

प्रादेशिक

इंडियन ज्युडिशिअल अ‍ॅकॅडेमीच्या अपूर्ण इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपती येणार
मुंबई, २५ जून/प्रतिनिधी

येत्या २७ जून रोजी उत्तन येथे ज्या इंडियन ज्युडिशिअल अ‍ॅकॅडेमी या संस्थेच्या इमारतीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायचे आहे, ती पूर्ण करण्यासाठी तब्बल १५०० कामगार लावून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. या इमारतीचे येत्या २७ जून रोजी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व्हायचे असून या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याने सर्वशक्तीने अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता सध्याचे काम पाहता फारच कमी वाटते.

..तर अकरावी प्रवेश कठीण
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी
आयसीएसई, सीबीएसई बोर्डातील टॉपर्सच्या तुलनेत राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागातील टॉपर्सना खूपच कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशामध्ये ९०:१० कोटा लागू झाला नाही तर एसएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील मोकळ्या जागांच्या व्यवस्थापनासाठी उच्चाधिकार समिती नेमा
खासदार मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई, २५ जून/प्रतिनिधी
मुंबईतील मोकळ्या जागा वा भूखंड देखभालीसाठी खाजगी क्लब, केअर टेकर आणि पालकत्व तत्त्वावर देण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या घोषणेविरोधात मुंबईतील प्रसिद्धी माध्यमे, विविध संस्था यांनी आवाज उठविल्याची दखल घेत आता दक्षिण मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून यात तातडीने हस्तक्षेप करून अशा मोकळ्या जागांच्या व्यवस्थापनासाठी एक उच्चाधिकार समिती नेमली जावी, अशी विनंती केली आहे.

मोकळ्या जागा खासगी संस्थांना देण्याचा वाद
कोर्टात जाण्यासाठी महापौरांना प्रशासनाची साथ नाही
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी
महानगरपालिकेची मैदाने, उद्याने खासगी संस्थांना काळजीवाहू तत्त्वावर देण्यास राज्य सरकारने दिलेली स्थगिती रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर शुभा राऊळ यांनी दिला आहे. पालिका प्रशासनाने मात्र याबाबतीत वेगळी भूमिका घेतली असून महापौर आपल्या अधिकारात उच्च न्यायालयात दाद मागू शकतात, असे पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी स्पष्ट केले आहे.

गॅस गळतीने दगावलेल्या तिघींच्या वारसांना १० लाखांची भरपाई
मुंबई, २५ जून/प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी कल्याण (प.) येथील एका घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत दगावलेल्या तीन महिलांच्या कायदेशीर वारसांना गॅस कंपनी, विमा कंपन्या आणि गॅस वितरक यांनी १० लाख रुपये भरपाई संयुक्तरीत्या व वैयक्तिकरीत्या द्यावी, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.

उपायुक्त सुरेश पवार याच्याकडे सव्वा कोटीची मालमत्ता
कल्याण, २५ जून /प्रतिनिधी

अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या उपायुक्त सुरेश पवार याला कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एन. इंगळे यांनी २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरमहा २२ हजार रुपये पगार असणाऱ्या पवारकडे अंदाजे सव्वा कोटींची मालमत्ता असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यात रोख रक्कम, दागिने, फ्लॅट, दुकाने व क्वालिस गाडीचा समावेश आहे.

जोडप्यांना लुटणारी टोळी गजाआड
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

वांद्रे- बॅण्ड स्टॅण्ड येथे जोडप्यांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या पाचजणांच्या टोळीला गजाआड करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट नऊच्या अधिकाऱ्यांना आज यश आले. या टोळीत एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. बॅण्ड स्टॅण्ड येथे गेल्या काही महिन्यांपासून जोडप्यांना लुटल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस जोडप्यांना लुटणाऱ्या या टोळीच्या मागावर होते. आज दुपारी अखेर या पाचजणांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. गोविंद ऊर्फ जोगिंदर गोपाल राणा (२३), मुश्ताक आलम अमजद खान (२४), कय्यूम शेख (२४), समीर खान (१९) अशी चौघांची नावे असून पाचवा अल्पवयीन आहे.

‘राज्यपालांनाही प्रधान समितीचा अहवाल नाही’
मुंबई, २५ जून / प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आश्वासन देऊनही मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासंदर्भातील राम प्रधान समितीचा अहवाल विधिमंडळात ठेवण्यात आला नाही. याबाबत आता राज्यपालांनी न्याय द्यावा व चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करण्याकरिता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल एस. सी. जमीर यांची भेट घेतली. यावेळी राम प्रधान समितीचा अहवाल आपल्यालाही सरकारने दिलेला नाही, असे राज्यपालांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले व खेद प्रकट केला, अशी माहिती कदम यांनी दिली. प्रधान समितीच्या अहवालाच्या मुद्दय़ावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.