Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

रात्रशाळा विभागात पहिले तिघेही नगरच्या भाई सथ्था विद्यालयाचे
नगर, २५ जून/प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत रात्रशाळा विभागात नगरच्या भाई सथ्था रात्रशाळा विद्यालयाच्या तिघा कष्टकरी विद्यार्थ्यांनी पहिले तीनही क्रमांक पटकावले! सुमितकुमार दिलीप ठुबे (५०२ गुण, ७७.२३ टक्के), हनुमान रोहिदास डोंगरे (४९० गुण, ७५.३८ टक्के) व सुनीता विठ्ठल गाढवे (४८८ गुण, ७५.०७ टक्के) यांनी पुणे विभागात अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकावला. शाळेने सलग चौथ्या वर्षी असे देदिप्यमान यश मिळविले.

पुणे विभागात अपंगांमध्ये संगमनेरची श्रिया गुणे प्रथम
संगमनेर, २५ जून/वार्ताहर

येथील दि. गं. सराफ विद्यालयाची विद्यार्थिनी श्रिया गुणे हिने दहावीच्या परीक्षेत ६०५ गुण मिळवून अपंग विद्यार्थ्यांत पुणे विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला. भा. गुं. पा. सह्य़ाद्री विद्यालयाचा प्रशांत पारेकर ९४ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला. याच विद्यालयाच्या सुशन्स आहेर याने संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले. तालुक्याचा निकाल ८८.२६ टक्के लागला. तालुक्यातील १७ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.

‘विळद-पुणे रस्ता बाह्य़वळण मार्ग ऑगस्टअखेर खुला करा’ राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
नगर, २५ जून/प्रतिनिधी

शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी विळदघाट ते पुणे रस्ता हा १५ किलोमीटर लांबीचा बाह्य़वळण रस्ता ऑगस्टअखेर खुला करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. बी. राजपूत यांच्याकडे केली.

उड्डाणपुलासाठी ‘मनसे’चा ‘रास्ता रोको’
नगर, २५ जून/प्रतिनिधी
स्टेशन रस्त्यावर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दुपारी मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या या रस्त्यावर १ हजार २०० मीटर लांब व ८.५० मीटर रुंदीचा सक्कर चौक ते कोठीपर्यंतचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

‘मुलीच वंशाचा खरा दिवा’ गौरीच्या यशावर आजीची कौतुकाची थाप
श्रीरामपूर, २५जून/प्रतिनिधी
वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, अशी समाजात असलेली समजूत खोटी असल्याचे गौरीने सिध्द केले, अशी प्रतिक्रिया दहावीच्या परीक्षेत पुणे विभागात तिसरी आलेल्या पाटणी विद्यालयाची विद्यार्थिनी गौरी भालेची आजी शांताबाई भाले यांनी व्यक्त केली. गौरीने ९१.८४ टक्के गुण मिळविले, तर संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविले. शहरवासीयांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षांव केला.

नचिकेतला संशोधक व्हायचंय! ‘समर्थ’मध्ये जल्लोष
नगर, २५ जून/प्रतिनिधी
पुणे विभागात पहिल्या आलेल्या नचिकेत कुंटला याला संशोधक व्हायचं आहे. ‘हसत खेळत अभ्यास’ हेच आपल्या यशाचे रहस्य असल्याचे त्याने सांगितले. नचिकेत त्याच्या श्रीसमर्थ विद्यामंदिर (सांगळे गल्ली) शाळेत येताच सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी जल्लोष करून त्याचे स्वागत केले. एकांकिका, वक्तृत्व स्पर्धामध्ये चमकणाऱ्या नचिकेतला उत्तम गुण मिळतील असा आत्मविश्वास होताच, परंतु विभागात प्रथम येऊ असे मात्र अपेक्षित नव्हते. सकाळी ११च्या सुमारास तो घरीच असताना शेजारी राहणाऱ्या मित्रांनी त्याचे नाव दूरचित्रवाणीवर झळकू लागल्याचे त्याला सांगितले. निकाल ऐकताच त्याला खूप आनंद झाला.

कात्रणांची किमया
प्रदर्शने अनेक स्वरूपांची, प्रकारची आजपर्यंत पाहिली. शनिवार, २० जून २००९ रोजी एका कर्णबधिर मुलांच्या शाळेत बघितलेले प्रदर्शन पाहून थक्क झालो. कुठेही जाहिरात नाही, मांडव नाही, सजावट नाही, संगीत नाही, भपकेबाजी नाही, स्वयंसेवकांचा गराडा नाही, लाईटिंग नाही; पण खचाखच भरलेली गुणवत्ता, कमालीचा साधेपणा, उच्च प्रतीचा व्यवस्थितपणा, १५ वर्षे सातत्याने केलेले कष्ट, आजही चालू असलेली कृती मनावर एक वेगळाच ठसा निर्माण करून गेली. साधेपणात किती सामथ्र्य आहे, ताकद आहे, परिणामकारकता आहे याची जाणीव झाली. प्रदर्शनाचे नाव होते कात्रणांची किमया! आयोजक होत्या निवृत्त शिक्षिका शुभदा जोशी. वय वर्षे ८०. शुभदा जोशी या एस.एन.डी.टी. कन्याशाळा पुणे येथून सेवानिवृत्त झाल्या.

पिचड यांचीही जीवितास धोका असल्याची फिर्याद
राजूर, २५ जून/वार्ताहर
बांधकाम व्यावसायिक मंगेश नवले यांच्यापासून माझ्या जीवितास धोका असल्याची फिर्याद आमदार मधुकरराव पिचड यांनी राजूर पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, पिचड यांनीही दमबाजी केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.

रामोशी सेवा समितीतर्फे रविवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
संगमनेर, २५ जून/वार्ताहर
अखिल भारतीय बेडर रामोशी सेवा समिती व ज्ञानप्रबोधिनी (पुणे) यांच्या विद्यमाने दि. २८ रोजी पुणे येथे समाजातील पदवीधर युवक-युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेवा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र बोऱ्हुडे यांनी दिली. रामोशी समाजबांधवांच्या बैठकीसाठी बोऱ्हुडे येथे आले होते. समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षांत सहभागी व्हावे, उच्च ध्येय ठेवावे, यासाठी रामोशी सेवा समिती विविध उपक्रम राबविते. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. विनय कुलकर्णी, प्राचार्य अरविंद हर्षे, सुनील भडांगे आदी मार्गदर्शन करणार आहेत.

गतिरोधक बसविण्याची मागणी
राहुरी, २५ जून/वार्ताहर

राहुरी कारखाना येथील शिवाजीमहाराज पुतळ्यासमोरील मनमाड रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावे; अन्यथा केव्हाही ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर वने यांनी दिला आहे. डॉ. तनपुरे कारखान्यावरील कार्यस्थळावर प्राथमिक, माध्यमिक शाळा, पब्लिक स्कूल, नियोजित अभियांत्रिकी महाविद्यालय, आयुर्वेद कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, तसेच हॉस्पिटल, नागरी वसाहती आहेत. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. विद्यार्थी, नागरिक, महिलांना जीव मुठीत ठेवून रस्ता ओलांडावा लागतो. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.

माही गावात मंदिरातून मूर्तीसह दागिन्यांची चोरी
कर्जत, २५ जून/वार्ताहर
तालुक्यातील माही येथील ग्रामदैवत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती, तसेच अंगावरील सोन्याचे दागिने असा २५ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कर्जत पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद देण्यात आली. दरम्यान, चोरीचा तपास आठ दिवसांत न लागल्यास कर्जत पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच कर्जतचे पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी तात्काळ दोन कर्मचारी पाठवून पंचनामा करून गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. ऐन आषाढी वारीच्या दरम्यान पांडुरंग-रुक्मिणीची मूर्ती मध्यवस्तीतून चोरीला गेल्याने गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
नगर, २५ जून/प्रतिनिधी

वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण करण्याची घटना बुधवारी दुपारी पुन्हा घडली. गेल्याच पंधरवडय़ात चांदणी चौकात वाहतूक पोलीस व उपनिरीक्षकास एका टोळीने मारहाण केली होती. पोलीस अधीक्षक विजय चव्हाण यांनी ‘पोलिसांचा आत्मविश्वास वाढवू’, असे सांगितल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांचे नीतिधैर्य खचवणाऱ्या या घटना वारंवार घडत आहेत. कालच्या घटनेसंदर्भात केशव यशवंत वाबळे (शहर वाहतूक पोलीस) यांनी कोतवाली ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह संतोष भिंगारदिवे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. वाबळे कोठी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करीत असताना आरोपी टेम्पोतून आले. वाबळे यांनी त्यांना टेम्पो कोठीमार्गे वळवा असे सांगितले. त्याचा राग आरोपींना आला. हे दोघे नंतर मोटरसायकलवर आले व त्यांनी वाबळे यांना शिवीगाळ व मारहाण केली.

मतिमंद तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दूधवाल्यास अटक
नगर, २५ जून/प्रतिनिधी
मतिमंद तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रेय भागुजी मेहत्रे (३१ वर्षे, रा. अकोळनेर) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गेल्या सोमवारी केडगाव येथे घडला. या तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे. बलात्कार करणारा मेहत्रे त्यांच्या घरी दूध घालायचा. सोमवारी दुपारी मेहेत्रे दूध घालण्यासाठी आला. घरात मतिमंद तरुणी एकटी आहे असे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला. स्नेहालय संस्थेच्या मदतीने या तरुणीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद
दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.